मतदान करतोे; पण चर्चा आवर !

संपादकीय

लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यावर सर्वत्र त्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. यात मुख्यत्वे सर्व वृत्तवाहिन्या आघाडीवर आहेत. गेले ६ महिने निवडणुकांच्या विषयी विविध कार्यक्रम घेणे, शहरांमध्ये जाऊन लोकांच्या मुलाखती घेणे, जाहीर चर्चासत्रे आयोजित करणे, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्येच मोदी आणि राहुल गांधी यांच्या समर्थकांचे गट करून त्यांच्यात प्रश्‍नोत्तरे घेणे चालू आहे. विविध पक्षांचे प्रवक्ते वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये येऊन अथवा जाहीर चर्चासत्रांमध्ये घंटोन्घंटे पक्षाची भूमिका, प्रश्‍न पोटतिडकीने मांडण्याचा आव आणत बोलतात. ‘तुमच्या पक्षाचे सरकार असतांना या गोष्टी केल्या नाहीत. आमचे सरकार आल्यावर हे करू, ते करू’, अशी आश्‍वासनेही त्यातून दिली जातात. त्यामुळे राजकीय पक्षही हे कार्यक्रम प्रचाराची आणि विरोधकांवर कुरघोडी करण्याची संधी म्हणूनच पहात आहेत.

अगदी अलीकडच्या दिवसांमधील चर्चांमध्ये कोणाला तिकीट मिळाले ? कोणाला नाही ? कोण नाराज आहेत ? कोण कोणासमवेत कोणत्या गाडीतून कुठे गेले ? अशा निरर्थक प्रश्‍नांची जंत्री मांडत त्यांची उत्तरे शोधण्याचा आटापिटा आणि स्पर्धा वाहिन्यांमध्ये चालू आहे. कोणत्या आमदाराने कोणत्या उपाहारगृहात बसून कोणत्या पदार्थाचा आस्वाद घेत कोणाच्या उमेदवारीवर चर्चा केली, ही बातमी दिली जाते. कोणता राजकीय नेता पक्ष बदलून कुठली उमेदवारी मिळवणार, तो जिंकणार कि हरणार ? याची माहिती दिली जाते. कोणत्या राजकीय पक्षाची कुठे सभा आहे आणि ते कोणावर टीकास्त्र सोडणार ?, हे ऐकवले जाते. देशातील सर्वच प्रश्‍न संपल्याप्रमाणे जनतेवर हा राजकीय धुरळा उडवून त्यांना बलपूर्वक गदारोळात ओढले जाते. मागील निवडणुकांच्या वेळीही हाच कित्ता गिरवण्यात आला होता. या वेळी तो अधिक प्रमाणात जाणवतो. ‘प्रसारमाध्यमांनाच निवडणुकीचा ज्वर चढला आहे’, असे या सर्व कारभारातून वाटते. यातून ही लोकशाही नव्हे, तर ‘शोकशाही’ झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे या सर्व राजकीय खलबतांच्या प्रक्षेपणाला कंटाळलेली जनता म्हणत असेल, ‘मतदान करतो; पण चर्चा आवर !’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now