म्हार्दोळ (गोवा) येथील शास्त्रीय नृत्य महोत्सवात नृत्यांगनांनी भावपूर्ण सादर केलेल्या नृत्यामुळे उपस्थितांना आली देवतेची अनुभूती !

म्हार्दोळ – येथे ८ मार्च ते १० मार्च या कालावधीत झालेल्या नुपूर या शास्त्रीय नृत्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पूर्वार्धात कला अकादमीच्या अध्यापिका सौ. वरदा फडके-बेडेकर यांनी कथक नृत्यातील त्रितालातील परण, तत्कार, गतभाव आदी सादर केले. भरतनाट्यम् नृत्यांगना सौ. मंदिरा जोशी यांनी महालक्ष्मीचे अष्टक, तर सौ. सपना नाईक यांनी शिवावर आधारित भरतनाट्यम् नृत्य सादर केले. भरतनाट्यम् या नृत्याच्या सादरीकरणाचा शेवट सौ. मंदिरा आणि सौ. सपना यांनी एकत्रित केलेल्या ‘तिल्लाना’ या नृत्यप्रकाराने झाला. सौ. मंदिरा जोशी यांनी सादर केलेेले नृत्य पहातांना प्रेक्षकांना देवी महालक्ष्मीच्या अस्तित्वाची अनुभूती आली. या सत्राची सांगता सौ. वरदा फडके-बेडेकर, सौ. मंदिरा जोशी आणि सौ. सपना नाईक यांनी एकत्रित केलेल्या ‘या देवी सर्वभूतेषू…’ या श्‍लोकावर आधारित नृत्याने झाली.

बेंगळूरू येथील कुचीपुडी नृत्यांगना कु. प्रतीक्षा काशी यांनी प्रथम देवीसंदर्भातील स्तुती सादर केली. त्यानंतर त्यांनी दशावतार, श्रीकृष्ण पत्नी सत्यभामा यांच्या चरित्रावर आधारित कथानक ‘भामा कल्पम्’, नारायण तीर्थ रचित ‘कृष्णलीला तरंगिणी’ वर आधारित ‘थारांगम्’ हे कुचीपूडी नृत्यातील प्रकार उत्कृष्टरीत्या सादर करत रसिकांची दाद मिळवली. ‘थारांगम्’ सादरीकरणाच्या शेवटी कु. प्रतीक्षा यांनी त्याला थाळीनृत्याचीही जोड दिली. कु. प्रतीक्षा काशी यांनी परिपूर्ण आणि भावपूर्णरित्या सादर केलेल्या नृत्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. नृत्य सादर करत असतांना त्यांच्या भावभक्तीमुळे प्रत्येक नृत्यात संबंधित देवतेची अनुभूती उपस्थितांनी घेतली. त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भगवंतच नृत्य करत असल्याचे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या’ साधिकांनी अनुभवले. त्यांच्या नृत्यातून नृत्य आणि अभिनय यांचा सुरेख संगम सर्वांना पहायला मिळाला.

संपूर्ण कार्यक्रमात ओघवत्या वाणीत होणारे निवेदन, तसेच तबला, पेटी, मृदंग, बासरी, व्हायोलीन, अशा विविध वाद्यांचा सुरेख संगम, त्यास गायकांची लाभलेली संगत आणि शास्त्रीय नृत्याचे भावपूर्ण अन् उत्कृष्ट सादरीकरण यांमुळे नुपूर महोत्सवाचे वातावरण नृत्यसंगीतमय झाले होते. सूत्रसंचालन सौ. रूपा च्यारी यांनी केले. सर्व कलाकारांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित काही विदेशी नागरिक भाषेचे ज्ञान नसतांना कलेच्या उत्कृष्ट सादरीकरणाचा आनंदाने अनुभव घेत होते. या महोत्सवास तरुणवर्गाची उपस्थिती देखील लक्षणीय होती.


Multi Language |Offline reading | PDF