मराठीला गाडणारा महाराष्ट्राचा महामूर्ख माणूस !

मराठीचे आणि हिंदुत्वाचे राजकारण करणारे अनेक जण आहेत; पण त्यांचे हे राजकारण तत्त्वासाठी असतेच, असे नाही. एकीकडे मराठीपणाविषयी बोलणार्‍या; पण प्रत्यक्षात इंग्रजी माध्यमाची शाळा काढण्यासाठी आग्रही असणार्‍या एका पुढार्‍याविषयी एका मराठीप्रेमी व्यक्तीला आलेला अनुभव रूपक कथेतून मांडला आहे. तो प्रसिद्ध करत आहोत.

‘मराठी आणि हिंदू असण्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक प्रांतात त्यांची-त्यांची भाषा आहे. देशभरात प्रामुख्याने १३ – १४ भाषा बोलल्या जात असाव्यात. त्या-त्या प्रांतात ती-ती भाषा बोलली जाणे आणि त्यांना त्याचा अभिमान असणे, योग्यच आहे. ब्रिटीश काळातही इंग्रजांनी प्रादेशिक भाषांना विशेष आडकाठी केली नव्हती.

लहानपणापासून मला गावोगावी फिरण्याची हौस होती. भटकंती करण्याचा छंद जोपासत मी एका गावात गेलो. तेथे माझा बालपणापासूनचा एक मित्र रहात होता. मी त्याच्या घरी गेलो. पूर्वीच्या आठवणींना उजाळा देत आनंद घेता-घेता त्याने त्या गावची एक वार्ता मला सांगितली. ती ऐकून मला धक्काच बसला, तसेच संतापही आला.

माझ्या मित्राने मला सांगितले, ‘‘येथे या गावात स्वतःला मोठा पुढारी समजणारा माणूस आपल्या व्यक्तीमत्त्वाचा मोठेपणा दाखवण्यासाठी आणि मराठीची पायमल्ली करण्यासाठी ‘इंग्रजी शिका, इंग्रजी शिका’, अशी घोकंपट्टी करत आहे. गावातील लोकांनी त्याला सांगितले की, आपली भाषा मराठी आहे, तरी तो इंग्रजी शाळा काढण्याच्या त्याच्या इच्छेवर अडून होता. ज्या काळात महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाजाची भाषाही मराठी होत आहे आणि मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषिकांची संमेलने होत आहेत, त्या काळात हा कथित पुढारी मराठी पायाखाली चिरडून त्यावर इंग्रजीचे मजले बांधू पहात आहे. त्याला काय करायचे ?’’

त्यावर मी म्हटले, ‘‘नियतीच या महामूर्खाला खाली पाडील. बस् ! तुम्ही काही करू नका.’’

जय हिंद, जय महाराष्ट्र ।’

– एक मर्द मराठा (४.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF