गायनाचा सूर हा अंतरंगातील आनंदमय कोषातून न आल्यास श्रीकृष्णाच्या येण्याचा मार्ग बंद होतो ! – प.पू. देवबाबा, किन्नीगोळी, मंगळूरू

संगीत सदर

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

१. संगीतातून साधना करायची असेल, तर सुराला सूर जुळणे आवश्यक असणे, तर बेसूर गायनामुळे सुरांच्या माध्यमातून अंतरंगात जाता न येणे

‘गायनाचा सूर हा आपल्या अंतरंगातील आनंदमय कोषातून आला पाहिजे. याप्रमाणे सूर जुळला नाही, तर श्रीकृष्णाच्या येण्याचा मार्ग बंद होतो. संगीतातून साधना करायची असेल, अंतरंगात जायचे असेल, तर सुराला सूर जुळायला हवा. गायन बेसूर नको. बेसूर गायनामुळे सुरांच्या माध्यमातून अंतरंगात जाता येत नाही. आपण ज्या पट्टीत (टीप) गातो, त्या पट्टीत गातांना आपला सूर योग्य जुळायला हवा.

(टीप : ‘गायन किंवा वादन करतांना स्वरांच्या वेगवेगळ्या उंचीवरून प्रारंभ करतात. या स्वरांची विशिष्ट उंची निवडून त्या सप्तकात गाणे किंवा वादन करणे, यालाच गायन किंवा वादन यांची ‘पट्टी’ किंवा ‘स्केल’, असे म्हणतात.’ – कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)

प.पू. देवबाबा

२. सूर आणि ताल, म्हणजे राधा आणि कृष्ण असणे

गायन सुरात असेल, तरच ते देवापर्यंत पोहोचते. सूर आणि ताल, म्हणजे राधा आणि कृष्ण आहेत. सूर नाही मिळाला, तर कृष्णाशिवाय राधा आणि ताल नाही मिळाला, तर राधेशिवाय कृष्ण, असे होईल.’

– प.पू. देवबाबा, किन्नीगोळी, मंगळूरू (२७.५.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF