साम्यवादाच्या नावाखाली स्टॅलिनने केलेली हिंसक आक्रमणे आणि त्याचे अमानुष क्रौर्य !

विवेकवाद, पुरोगामीवाद आणि सुधारणावाद यांच्या बुरख्याआडून हिंदुत्वनिष्ठांवर वार करणार्‍या साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड करणारी लेखमालिका : ‘साम्यवाद्यांचा रक्तरंजित इतिहास’ !

साम्यवादाचा बुरखा फाडण्यासाठी भारतियांना निष्पक्ष दृष्टीकोनातून खरा इतिहास शिकवणे आवश्यक !

३.३.२०१९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखमालिकेतील पहिल्या भागात आपण साम्यवाद्यांनी रशियात केलेल्या वंशविच्छेदाविषयी जाणून घेतले. सामूहिक आतंकवादाचा पुरस्कर्ता लेनिन, रशियातील कोसॅक जातीचा लेनिनने केलेला वंशविच्छेद, तसेच ५० लाख कुलकांची हत्या, रशियाच्या राजकारणात स्टॅलिनचा उदय कसा झाला, हेही लेखमालिकेच्या पहिल्या भागात प्रसिद्ध करण्यात आला होता. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

ही लेखमालिका हा साम्यवादी विचारधारेचा संपूर्ण अभ्यास नसून साम्यवाद्यांनी केलेल्या हिंसेचा एक त्रोटक आढावा आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी. खरेतर साम्यवाद्यांच्या क्रौर्यावर पुस्तके, लेख लिहिले गेले पाहिजेत. यावर चित्रपटही निघाले पाहिजेत. दुर्दैवाने ही माध्यमेही त्यांच्याच प्रभावाखाली आहेत. सतत हिंदुत्वनिष्ठांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या साम्यवाद्यांचा हिंदुत्वनिष्ठांना प्रतिवाद करता यावा, यासाठी ही लेखमलिका प्रसिद्ध करत आहोत.

भाग २

संकलक : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

१. जर्मनीमध्ये साम्यवाद्यांचा विरोधक असलेल्या हिटलरच्या नेतृत्वाचा उदय

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘स्टॅलिन सत्तेवर आल्यानंतरच्या काळात पहिल्या युद्धात हरलेल्या आणि त्या पराभवाच्या जखमा काळजात बाळगणार्‍या जर्मनीमध्ये हिटलरच्या नेतृत्वाचा उदय झाला. जर्मनीतही साम्यवाद वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्नात होताच. त्याला टक्कर देत हिटलरने एकहाती सत्ता बळकावली. अर्थात जे स्थान जर्मनीत हिटलरचे होते, साधारण ते आणि तसेच स्थान रशियात स्टॅलिनचे होते. दोघेही एकहाती सत्ता राखण्यावर विश्‍वास ठेवणारे होते. आवश्यकता पडली, तर स्वतःच्याच साथीदारांचे बळी देऊन स्वत:ला सत्तास्थानी ठेवण्यात कुशल होते.

हिटलर साम्यवाद्यांच्या विरोधात होता. त्याला पहिल्या महायुद्धातील अपमान धुवून काढायचे होते. ज्यूंची हकालपट्टी करायची होती आणि प्रदेशविस्तार करायचा होता. स्टॅलिनलाही काही वेगळे करायचे नव्हते. केवळ ज्यूंऐवजी त्याचा राग कथित भांडवलदारांवर होता.

२. जर्मनी आणि रशिया यांच्यातील अनाक्रमणाच्या कराराने हिटलर अन् साम्यवादी स्टॅलिन हे विरोधक एकत्र !

हिटलरविरुद्ध मित्र राष्ट्रे, असा रागरंग हळूहळू आंतरराष्ट्रीय राजकारणात येत होता. स्वत:चे तोडून टाकलेले प्रांत हिटलरने पुन्हा बळकावले. त्याने ऑस्ट्रियाचे नियंत्रण मिळवले. पुढचे त्याचे लक्ष्य होते झेकोस्लोव्हाकिया. इंग्लंड आणि फ्रान्स अशा मित्र राष्ट्रांची शिष्टमंडळे या प्रकरणात हिटलरविरोधातील आघाडीत रशियाला सहभागी करून घेण्यासाठी मॉस्कोमध्ये ठाण मांडून बसली होती. याच काळात हिटलरने आपल्या युद्धखोरीतील घास रशियाला देऊ केला आणि स्टॅलिनने तो घेतला.

मित्र राष्ट्रांची शिष्टमंडळे मॉस्कोत बसलेली असतांना त्यांना अंधारात ठेवून रशिया आणि जर्मनी या दोघांच्यात अनाक्रमणाचा (non aggression) करार करण्यात आला.

३. अनाक्रमणाच्या तहाचा लाभ घेऊन रशियाने फिनलंडवर केलेली स्वारी !

पुढे जेव्हा झेकोस्लोव्हाकियावर हिटलरने (जर्मनीने) स्वारी केली, तेव्हा त्यांच्या काही भागांचे लचके तोडण्यासाठी रशियानेही (स्टॅलिननेही) स्वारी केली. अनाक्रमणाच्या तहाचा लाभ घेऊन जर्मनीला अंधारात ठेवून रशियाने फिनलंडवर स्वारी करून तो कह्यात घेतला. हिटलरने झेकोस्लोव्हाकिया जिंकल्यानंतर पुढची स्वारी पोलंडवर केली. पोलंडवरची स्वारी हे दुसर्‍या महायुद्धाचा भडका पेटण्याचे निमित्त ठरले. त्या पोलंडचाही काही भाग या साम्यवादी हिवाळी अस्वलाने (रशियाने) बळकवला. इस्टोनिया, लाटव्हिया, रोमानियाचे काही भाग आणि लिथुआनियाही रशियाने असाच घशात घातला. रशियाने जर्मनीचीही फसवणूकच केली. स्वातंत्र्य आणि समता यांत हे कसे बसते ?

४. जर्मनीचे भांडवलदार राष्ट्रांशी चालू असलेले युद्ध रशियाकडे वळल्यानंतर त्याला साम्यवाद्यांकडून न्याय-अन्यायाचे युद्ध असल्याचा मुलामा !

साम्यवाद्यांनी पोलंडच्या सहस्रो सेनाधिकार्‍यांचीही कत्तल अशीच राजरोस केली. जेव्हा जर्मनीचे आक्रमण फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यावर होत होते, तेव्हा रशियाकडून जर्मनीला अन्नधान्य, तेल आदी रसद दिली जात होती; परंतु जर्मनीकडून युद्धसामग्री आल्यानंतरच हे पाठवले जात होते. या परिस्थितीचा लाभ रशियाने घेतला.

हे सर्व चालू असतांना जगभरातील साम्यवाद्यांसाठी हे युद्ध भांडवलशाहीचे युद्ध होते; कारण रशिया युद्धात नव्हता. जेव्हा वैतागून जर्मनीने रशियावर स्वारी केली, तेव्हा हे अचानक न्याय-अन्यायाचे युद्ध झाले. भारतातील साम्यवादी तेव्हा अचानक मित्र राष्ट्रांच्या बाजूने झाले. हा शुद्ध दुटप्पीपणा, क्रूरपणा आणि संधीसाधूपणा साम्यवाद्यांना कसा काय पचतो ? यासाठी कोणी स्टॅलिनची निर्भत्सना केलेली नाही.

५. जर्मनी-रशिया युद्धात स्टॅलिनने दाखवलेले अमानवी क्रौर्य !

५ अ. रशियात पोहोचलेल्या जर्मन सैन्याची माघार ! : स्टॅलिनचे क्रौर्य अशा छोट्या गोष्टींवर संपत नाही. खरेतर क्रूरकर्मा स्टॅलिनवर वेगळी पुस्तके लिहिली गेली पाहिजेत. रशियातील कडाक्याचा हिवाळा आणि युद्धात मृत्यूमुखी पडणारी माणसे, संपत चाललेले युद्धसाहित्य अशांनी जर्मनी मेटाकुटीला आला अन् जर्मनीची वाटचाल पराभवाच्या दिशेने होऊ लागली. मॉस्कोच्या उपनगरांपर्यंत पोहोचलेले जर्मन सैन्य माघार घेऊ लागले.

५ आ. रशिया-जर्मनी यांची युद्धभूमी झालेल्या पोलंडच्या स्वातंत्र्यसैनिकांकडून रशियाच्या साहाय्यासाठी जर्मन सैन्याचा कडवा प्रतिकार ! : रशियन फौजांनी जर्मन सैन्याला रशियातून मागे रेटत नेले. पुन्हा पोलंड देशाची युद्धभूमी झाली. जर्मन फौजा तिथेही हरू लागल्या आणि एक स्थिती अशी आली की, पोलंडची राजधानी वॉर्साच्या काही किलोमीटर अंतरावर रशियन सैन्याचा तळ पडला. परिस्थिती अशी होती की, रशियन सैन्य कधीही वॉर्सा शहरात घुसू शकत होते. वॉर्सा जर्मनीच्या वर्चस्वातून मुक्त करू शकत होते. वॉर्साच काय अख्खा पोलंड देश या काळात शांत नव्हता. पराभूत झाले असले, तरी पोलंडचे नागरिक तरी हताश नव्हते. पोलंडचे स्वातंत्र्यसैनिक लढत होते. वॉर्साच्या गटारांचा वापर करून संदेशांची देवाणघेवाण आणि जर्मन सैन्यावर आक्रमण करत होते. त्यांना उधाण आले. बाहेरून येणार्‍या रशियान सैन्याला साहाय्य करावे, या उद्देशाने पोलंडच्या जनतेने वॉर्सामध्ये कडवा प्रतिकार चालू केला.

५ इ. जर्मन सैन्याकडून पोलंडच्या स्वातंत्र्यसैनिकांचे शिरकाण : जर्मन सैन्याची दाणादाण उडू लागली. पोलीश लोक आतुरतेने रशियन सैन्याची वाट पहात होते; परंतु ही परिस्थिती कळताच स्टॅलिनने रशियन सैन्याला पुढे न जाण्याचा हुकूम सोडला. रशियाचे लाल सैन्य पोलंडच्या विरांची आक्रमणे केवळ पहात राहिले. जर्मनीने ही स्थिती जाणली आणि पोलंडच्या या नागरी क्रांतीविरांचे शिरकाण चालू केले. ज्या भुयारी गटारांचा वापर केला जात होता, त्यात प्रचंड बॉम्बवर्षाव केला आणि किमान १५ ते २० सहस्र क्रांतीकारकांची हत्या जर्मन सैन्याने केली.

५ ई. पोलंडच्या स्वातंत्र्यसैनिकांनी रशियाला विरोध करू नये, यासाठी जर्मन सैन्याकडून त्यांची हत्या होऊ देणारा स्टॅलिन : पोलीश क्रांतीकारक आणि जर्मन सैन्य यांची ही लढाई आता शमली आहे, हे स्पष्ट झाल्यानंतरच लाल सैन्य पुढे निघाले. उलट्या काळजाच्या स्टॅलिनचे नागडेउघडे गणित स्पष्ट होते, ‘‘पोलंडवर उद्या रशियाचे वर्चस्व निर्माण झाले की, हेच पोलीश क्रांतीकारक साम्यवाद्यांना त्रास देणार. त्यापेक्षा बरे आहे, पाहुण्याच्या काठीने साप मारू ! आपल्याला राज्य करायला सोपे.’’

६. इतरांवर कुरघोडी करून स्वतःला हवा तो भूभाग मिळवण्यासाठी ४ लाख सैनिकांचा बळी देणारा रशिया !

दोस्त राष्ट्रांच्या म्हणजेच अमेरिका, इंग्लंड, रशिया आदींच्या सेना पुढे जर्मनीत घुसल्या. अमेरिका, इंग्लंड यांची सेना एकत्र होती; परंतु रशियन सेना स्वत:च पुढे जात होती. दोन सेना दलांची दिशा वेगळी होती. जणू दोन बाजूंनी मिटत येणारा तो एक जबडा होता. रशियाने कह्यात घेतलेला आणि अमेरिका, इंग्लंड आदी दोस्त राष्ट्रांनी कह्यात घेतलेला जर्मन भूभाग वेगळा राहिला.

युद्ध चालू झाले, तेव्हा जर्मनी आणि रशिया मित्र होते; परंतु त्यांचा एकमेकांवर विश्‍वास नव्हता. रशियाने तेथेही जर्मनीला त्रास देऊन स्वत:चा लाभ करून घेण्याची संधी सोडली नाही. युद्ध संपत आले, तेव्हा रशियाची मैत्री अमेरिका, इंग्लंड अशा देशांशी होती; परंतु तेथेही विश्‍वास नव्हता. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होता. जर्मनीत घुसल्यावरही स्टॅलिनने बर्लिन स्वत:च्या कह्यात घेण्याची घाई केली; परंतु तेही अनुकूल परिस्थिती आल्यावर ! इतिहासकार स्टॅलिनवर एक आरोप असाही करतात की, त्याने जाणीवपूर्वक लढाईत दिरंगाई केली, जेणेकरून त्याला पाहिजे असणारे भूभाग मिळेपर्यंत थांबता येईल. या प्रक्रियेत ४ लाख रशियन सैन्याचा बळी गेला.

७. सैन्याने महिलांवर केलेल्या बलात्कारांचे स्टॅलिनकडून अत्यंत अश्‍लाघ्य समर्थन !

बर्लिन कह्यात आल्यावर रशियनांनी जर्मन महिला आणि तरुणी यांच्यावर बलात्कार केले. या राजमान्य आणि राजरोस झालेल्या बलात्कारांची संख्या काही लाखांत होती. तीच गत हंगेरी आणि अन्य ठिकाणच्या स्त्रियांची झाली.

युगोस्लावियात झालेल्या अशा बलात्कारांविषयी एकाने केलेल्या तक्रारीवर स्टॅलिन म्हणाला, ‘जे सैनिक सहस्रो किलोमीटर चालून आलेले आहेत, युद्धरत आहेत, त्यांनी थोडी मजा केली, तर बिघडले कुठे ?’ रशियन सैनिकांनी केलेल्या लुटमारीसाठीही त्याने शिक्षा केली नाही.

८. विभाजनानंतर एक होणारा जर्मनी, तर पाक, बांगलादेश यांना भारतीय भूभागाची खिरापत वाटणारा भारत !

रशियाने त्याच्या कह्यात आलेला जर्मन भूभाग सोडला नाही. तो वेगळा देश बनवण्यात आला. जगाचा इतिहास काढून पहा. हा प्रदेश पूर्व जर्मनी म्हणून वेगळा देश बनवला गेला. तो नंतर रशियाचे बाहुले बनला. दोस्त राष्ट्रांच्या कह्यात असलेला जर्मनी पश्‍चिम जर्मनी म्हणून वेगळा देश निर्माण झाला. जर्मनीतील साम्यवाद्यांना वेचून वेचून त्यांच्या हातात राज्यकारभार देण्यात आला. पूर्व जर्मनीचा विकास झाला नाही. वर्ष १९९१ पर्यंत पूर्व जर्मनीतील लोक पळून पश्‍चिम जर्मनीत जात होते. ते थांबवण्यासाठी साम्यवाद्यांनी ती कुप्रसिद्ध ‘बर्लिनची भिंत’ बांधली. वर्ष १९९१ मध्ये पूर्व जर्मनी आणि पश्‍चिम जर्मनी पुन्हा एकत्र होऊन पुन्हा एकसंध जर्मनी बनला. तो आताचा जर्मनी आहे. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी लाहोरपर्यंत जिंकलेला पाकिस्तान असाच वेगळा देश म्हणून बनवायला पाहिजे होता. इंदिरा गांधींनी भारतातून फुटून निघालेला बांगलादेश असाच पुन्हा घ्यायला पाहिजे होता. आम्हीच शांततेची कबुतरे उडवत बसलो.

९. हिंसक आणि कारस्थानी स्टॅलिनचे भारतीय साम्यवादी समर्थन करणार का ?

जसे पूर्व जर्मनीचे झाले, तसेच पोलंड, झेकोस्लोव्हाकिया अशा ‘बाल्कन’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या छोट्या राष्ट्रांचे झाले. रशियाने त्यांना बलपूर्वक लाल करून टाकले. तेथील नद्यांचे पाणीही स्थानिकांच्या रक्ताने लाल झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. या साम्यवाद्यांनी वर्षानुवर्षे त्यांच्यावर बलपूर्वक राज्य केले.

हा इतिहास कधी सांगितला जात नाही; कारण हिटलर पराजित झाला. त्यामुळे त्यांचे विद्रूपीकरण आणि खलनायकीकरण करण्यात येत आहे. वस्तूस्थिती अशी आहे, त्या क्रौर्यात आणि कुटीलपणात स्टॅलिन अन् हिटलर यांची तुलना केली, तर स्टॅलिन हिटलरपेक्षा कणभर नाही, तर काही किलोंनी अधिक भरेल; परंतु साम्यवाद्यांना टीका करायला कठीण जाईल. भारतातील साम्यवादी स्टॅलिनचे समर्थन करणार आहेत का ? ‘रशियामुळे हिटलरला हरवता आले’, अशी डिंग जगभरातील साम्यवादी मारतात; परंतु आरंभीची स्टॅलिनची हिटलरशी हातमिळवणी, नंतरचा साम्राज्यवाद, क्रौर्य कसे विसरता येईल ?

खरेतर स्टॅलिन मेल्यावर त्याची सर्वाधिक नालस्ती त्याचा उत्तराधिकारी निकिता ख्रुश्‍चेव्ह याने केली. त्याचे बंद पडद्यामागचे भाषण फुटले आणि जग अवाक् झाले. ‘ख्रुश्‍चेव्ह चांगला होता’, असे म्हणण्याचे कारण नाही; कारण त्याने तीच गादी पुढे चालवली. केवळ स्टॅलिनमुळे जे एकव्यक्तीनुकरण चालले होते, त्यामुळे इतरांना नेतृत्व मिळण्याची शक्यता नव्हती. त्यासाठी त्याने स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी ती संधी वापरली, इतकेच !

१०. इतिहासातील खोट्या उपमा आणि व्यक्ती यांची लक्तरे काढून वेशीवर टांगणे आवश्यक !

एका भारतियाच्या दृष्टीने पहायचे, तर आपल्याला कोणाचीच बाजू घेण्याचे कारण नाही. कोणीच तत्त्वाची लढाई लढले नव्हते. एकतर ती अस्तित्वाची, सुडाची किंवा महत्त्वाकांक्षेची लढाई होती. जवळजवळ सगळेच साम्राज्यवादी होते. त्यामुळे आम्ही चर्चिलला महान म्हणावे आणि स्टॅलिनची स्तुतीसुमने गावी, असे काहीच कारण नाही. अभ्यास करायला हवा तो त्यांच्या ढोंगांचा ! खरेतर एक निष्पक्ष इतिहास भारतियाच्या दृष्टीकोनातून शिकवला जायला हवा. तो आज दोस्त राष्ट्रांच्या दृष्टीतून शिकवला जात आहे. या इतिहासातील खोट्या उपमा आणि व्यक्ती यांची लक्तरे काढून वेशीवर टांगली पाहिजेत, तर कुठेतरी आपला भोळेपणा कमी होईल.’


Multi Language |Offline reading | PDF