सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा थोडक्यात परिचय !

भावी भीषण आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी विविध उपाय सांगणारे ग्रंथ आधीच प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्यांची तीव्रता आणखी वाढेल. या आपत्तींमध्ये तिसर्‍या महायुद्धाचीही भर पडेल. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध करत असून आतापर्यंत या मालिकेतील २१ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. हे ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत. या सर्व ग्रंथांची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी प्रस्तुत सदरात ग्रंथांचे मनोगत प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत; कारण ते भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृतीही करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

अग्नीशमन प्रशिक्षण

(आगामी महायुद्धकाळात उद्भवणार्‍या समस्यांच्या वेळी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !)

ग्रंथाचे संकलक : श्री. नितीन विनायक सहकारी (बी.ई.(एम्.) मुख्य अभियंता, मर्चंट नेव्ही)

ग्रंथाचे मनोगत

‘एका छोट्याशा ठिणगीपासून उद्भवलेल्या आगीचा शेवट हा छोटाच असतो असे नाही’, या आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. केवळ या म्हणीवरून आगीची दाहकता, संहारकता किंवा तिचे भीषण परिणाम यांतील गांभीर्य लक्षात येत नाही; तर आगीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांनाच त्याची कल्पना असते. ‘आग’ ही दैनंदिन जीवन-व्यापारातील एक अत्यावश्यक घटक असली, तरी तिच्या संदर्भात नियंत्रित आणि अनियंत्रित यांमधील लक्ष्मणरेषा पुष्कळ महत्त्वाची असते. सर्वसाधारणतः मनुष्य उपयोगात आणत असलेल्या सर्व आगी नियंत्रित असतात; पण एखाद्या प्रसंगी आग नियंत्रणाची लक्ष्मणरेषा ओलांडू शकते. असे झाल्यास त्यावर काय उपाययोजना करायची, याचे ज्ञान ती आग हाताळणार्‍यांना असणे महत्त्वाचे असते. अग्नीशमनाविषयीचे प्रशिक्षण मोठमोठे कारखाने, प्रवासी नौका (जहाजे), विमाने आदींमध्ये दिले जाते; परंतु खेदाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य मनुष्य, तसेच दिवसातील ५-६ घंटे आगीवर स्वयंपाक करणारी गृहिणी आगीचे शास्त्र आणि अग्नीशमनाचे उपाय या संदर्भात पूर्णतः अनभिज्ञ असते. या अज्ञानातून कित्येक अपघात घडतात. आगीचे शास्त्र, अग्नीशमनाची विविध माध्यमे आणि त्यांचा उपयोग करण्याच्या पद्धती, चुकीची माध्यमे वापरल्याने होणारे दुष्परिणाम इत्यादींविषयी शास्त्रीयदृष्ट्या आणि सोप्या भाषेत ज्ञान देणे, हा प्रस्तुत ग्रंथ संकलित करण्याचा मुख्य उद्देश आहे.

हिंदु धर्मात देवऋण, पितृऋण, ऋषीऋण आणि समाजऋण, ही चार ऋणे प्रत्येक मनुष्याने फेडणे हे त्याचे विहित कर्तव्य मानले आहे. यांपैकी परस्पर सहकार्य आणि परोपकार यांनी समाजऋण फेडता येते. अग्नीशमन प्रशिक्षणाचे ज्ञान आत्मसात करून वेळप्रसंगी त्याचा समाजासाठी उपयोग करणे, हा समाजऋण फेडण्याचाच एक भाग आहे.

अग्नीप्रलयाच्या आपत्तीमुळे राष्ट्राची जीवित आणि वित्त अशी दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. ही हानी रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होणे म्हणजे राष्ट्रहित आणि राष्ट्ररक्षण यांच्या कार्यात सहभागी होणे. राष्ट्राच्या आयुष्यातच समष्टीचे जीवन अंतर्भूत असते; कारण राष्ट्र्र जगले, तरच समाज जगेल आणि समाज जगला, तरच व्यक्ती जगेल. व्यक्ती जगली, तरच साधना करू शकते. म्हणूनच स्वहित आणि राष्ट्ररक्षण यांसाठी ‘अग्नीशमन प्रशिक्षण’ या विषयाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.

या ग्रंथातील ज्ञान वाचून अग्नीप्रकोपाच्या आपत्तीपासून स्वतःचे, तसेच साधना म्हणून समाज आणि राष्ट्र यांचे रक्षण करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये निर्माण होवो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना. – संकलक

सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाइन’ खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !

विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !

स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७


Multi Language |Offline reading | PDF