बालाकोट (पाकिस्तान) येथील जैश-ए-महंमदचे आतंकवादी प्रशिक्षण केंद्र आणि त्याची कार्यप्रणाली

आतंकवाद्यांचे नामोनिशाण नष्ट करण्यासाठी तीव्र राजकीय इच्छाशक्ती आवश्यक !

  • जैश-ए-महंमद ही पाक सरकार पुरस्कृत आतंकवादी संघटना आहे ! त्यामुळे तिच्यावर पाककडून कोणतीही कारवाई करण्याची अपेक्षा करता येणार नाही; म्हणून आता भारताने मसूद अझहरसह या संघटनेचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारवाई करावी !  पाकला धडा शिकवण्यासाठी भारत पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्याच्या विरोधात युद्ध का पुकारत नाही ?

  • जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला आणि आतंकवादाच्या विचारसरणीला संपवले जात नाही, तोपर्यंत भारतातील आतंकवाद कधीही संपणार नाही, हे लक्षात घ्या !

भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ‘एअर स्ट्राईक’ करून पाकमधील खैबर पख्तुनख्वा या प्रांतातील बालाकोट येथे असणार्‍या जैश-ए-महंमदच्या आतंकवादी संघटनेचे प्रशिक्षण केंद्र बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केेले. या केंद्रात भारत, पाकव्याप्त काश्मीर, अफगाणिस्तान, तसेच तालिबानी मुसलमान तरुणांना आतंकवादी बनवण्यासाठी आणले जात होते. त्यातील काही जणांना आत्मघातकी आतंकवादी बनवले जात होते. हे आतंकवादी या केंद्रात असणार्‍या ५ ते ६ मोठ्या इमारतींमध्ये रहात होते. या आतंकवाद्यांना ‘आयशा सादिक’ या मदरशांच्या नावाखाली हे प्रशिक्षण देण्यात येत होते. या केंद्रामध्ये जैशचे सूत्रधार आणि प्रमुख या तरुणांना आतंकवादी बनवण्याचे कसे प्रशिक्षण देत होते, याची माहिती भारतीय गुप्तचरांनी मिळवलेली होती. यातील काही माहिती पुढे देत आहोत. या माहितीतून जिहादी आतंकवादी कसे बनवले जातात, हे याची थोडी कल्पना वाचकांना येऊ शकते. पाकमध्ये अशा आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांची संख्या अधिक आहे आणि तेथे गेल्या काही दशकांपासून सहस्रोंच्या संख्येने आतंकवाद्यांना प्रशिक्षित केेले जात आहे. जैशचे मुख्य कार्यालय पाकव्याप्त काश्मीरच्या बहावलपूर येथे आहे. जैशचा प्रमुख मसूद अझहर येथेच रहात होता. तेथे असलेल्या मदरशांमध्ये ६०० हून अधिक जण शिकत आहेत. यातील मुलांनाच पुढे आतंकवादी बनवले जाते. या तळावरही आक्रमण करण्याचा भारतीय वायूदलाचा प्रथम विचार होता; मात्र तेथे आतंकवादी नसणारेही ठार होतील, या शक्यतेने तो विचार टाळण्यात आला होता, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. एक आतंकवादी तळ नष्ट केल्याने पाकमधील आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यासाठी पाकमधील प्रत्येक आतंकवादी तळ नष्ट करण्याची आवश्यकता आहे. तसेच असे तळ पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी त्यांच्या सूत्रधारांनाही नष्ट करण्याची आवश्यकता आहे. आतंकवाद्यांच्या कार्यप्रणालीविषयी माहिती होण्यासाठी ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील माहितीवरून सिद्ध केलेला हा विशेष लेख प्रसिद्ध करत आहोत.

आतंकवादी बनवण्याची प्रक्रिया

पहिला टप्पा

१. सर्वप्रथम पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथील ‘सवाई नाला’ येथे असणार्‍या जैश-ए-महंमदच्या कार्यालयात आतंकवादी बनण्यासाठी आणलेल्या मुसलमान तरुणांची छाननी केली जाते. त्यानंतर त्यांना ते ‘आतंकवादी’ आणि ‘आत्मघाती आतंकवादी’ बनण्यासाठी सिद्ध असल्याचे त्यांच्याकडून लिहून घेतले जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यावर त्यांना या कार्यालयाच्या प्रमुखाकडून पत्र दिले जाते. या पत्रावर ‘अल रहमत ट्रस्ट’चा शिक्का मारलेला असतो. या शिक्क्याचा अर्थ म्हणजे या तरुणांना जैशमध्ये भरती करण्यात आले आहे.

२. जैशच्या कार्यालयात या तरुणांना आणण्यापूर्वी त्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यात आलेले असते. धर्मानुसार जिहाद करणे पवित्र कार्य आहे. ‘धर्मासाठी प्राणत्याग केल्यास स्वर्गामध्ये ७२ अप्सरांना भोगायला मिळते’, अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनावर बिंबवले जातात. या कार्यालयात एक रात्र राहिल्यानंतर या तरुणांना दुसर्‍या दिवशी बालाकोट येथील ‘आयशा सादिक’ मदरशामध्ये नेण्यात येते. येथे त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेले पत्र जमा करून घेतले जाते. या मदरशांमध्येच आतंकवादी प्रशिक्षण केंद्र आहे. येथे त्यांचे प्रशिक्षण चालू होते.

दुसरा टप्पा

१. या प्रशिक्षण केंद्रावर एकाच वेळेस सुमारे ६०० जण राहू शकतात. ज्या वेळी भारताने एअर स्ट्राईक केले, तेव्हा येथे मोठ्या संख्येने आतंकवादी होते. जवळपास ३०० हून अधिक भ्रमणभाष येथे चालू होते, असे समोर आले. या ३०० मधूनच २५० जण ठार झाले, असे सांगण्यात येत आहे.

२. येथे आत्मघाती आतंकवादी बनणार्‍यांकडून वेगळा अर्ज भरून घेतला जातो. त्यानंतर त्यांना उत्तरदायी कमांडरकडे सोपवले जाते.

३. या केंद्रामध्ये अनेक ‘उस्ताद’ होते. त्यांना वेगवेगळे काम दिले जात होते. जेवण बनवणे आणि गृहव्यवस्थापन सांभाळणारे होते.

भारतात घुसण्यासाठीचे मार्ग

बालाकोट येथे आतंकवादी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या आतंकवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी काही मार्ग आहेत. यापैकी

१. बालाकोटपासून ९८ किमी मार्गावरून त्यांना पाकव्याप्त येथील केल आणि दूधनियाल या गावांतील लाँचपॅडवर नेण्यात येऊन काश्मीरच्या कुपवाडा येथील सीमेवरून भारतात घुसवले जात होते.

२. बालाकोटपासून कैथनवाली आणि मगाम जंगलमार्गातून कुपवाडापर्यंत या आतंकवाद्यांना पोहोचवण्याचे काम पाकचे लोक करत होते.

३. तिसर्‍या मार्गात बालाकोटवरून केल लाँचपॅडवर आल्यावर ते लोलाब येथून पुढे कुपवाडामध्ये घुसत होते.

४. चौथ्या मार्गात बालाकोटवरून केल लाँचपॅडवर पोहोचल्यावर तेथून क्षमाकर्लापोरा येथून कुपवाडामध्ये घुसत होते.

काश्मिरी मुसलमान तरुण दुय्यम दर्जाचे !

महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमधून येथे आतंकवादी बनण्यासाठी आलेल्या काश्मिरी मुसलमान तरुणांना दुय्यम दर्जाचे समजले जात होते. त्याच वेळेस तालिबानकडून आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या मुसलमान तरुणांना श्रेष्ठ समजले जात होते. या आतंकवाद्यांना आत्मघातकी आक्रमण करण्याचे प्रशिक्षण अफगाणी तालिबानी आतंकवाद्यांसमवेत दिले जात होते. अफगाणी आतंकवाद्यांना आयईडी (एक प्रकारचे स्फोटक) तज्ञ आणि हत्यार चालवण्यात निष्णात असे समजले जात असल्याने त्यांच्यासमवेत असलेल्या काश्मीर मुसलमान तरुणांना प्रारंभी जेवण बनवणे आणि साफसफाई करण्याचे काम दिले जात होते.

सांकेतिक शब्द

घुसखोरीच्या वेळी आतंकवाद्यांना काही सांकेतिक शब्द देण्यात येत होते. या आतंकवाद्यांना हाताळणार्‍यांना (हँडरल) या सांकेतिक शब्दांचे प्रशिक्षण देण्यात येत होते. याचा वापर करतच घुसखोरी करायण्यास सांगण्यात येत होते. अशा वेळी कोणत्याही बिनतारी संदेशवहनाचा वापर करण्यात येत नसे.

रोमियो : पाकव्याप्त काश्मीरमधून या आतंकवाद्यांना हाताळणार्‍याचा (हँडलरचा) सांकेतिक शब्द. ही व्यक्ती पाकव्याप्त काश्मीरमधील लाँचपॅडवर असायची.

टँगो २ : याचा अर्थ ५ आतंकवाद्यांना एकाच वेळी भारतात घुसवायचे आहे.

अली@अल्फा : याचा अर्थ आतंकवादी आणि त्याचे नाव

कोड @ माईक : आय.एस्.आय.चा व्यक्ती मार्ग दाखवणार

कोड @हॉटेल : काश्मीर खोर्‍यातील हँडरल साहाय्यासाठी सिद्ध

कोड @हॉटेल२ : दुसरा हँडलरही सिद्ध

नियंत्रण कक्ष

मुझफ्फराबाद येथील कार्यालयातून त्यांच्यावर नियंत्रण राखण्यात येत होते. यासाठी एक नियंत्रण कक्ष होते. या नियंत्रण कक्षाला ‘कंट्रोल ८८’ असे म्हटले जात होते. आय.एस्.आय.च्या साहाय्याने या नियंत्रण कक्षातून घुसखोरी करणार्‍या आतंकवाद्यांसाठी सूचना दिल्या जात असत. सीमारेषा पार केल्यावर या आतंकवाद्यांना हाताळणारे सांकेतिक शब्द वापरून आतंकवाद्यांना माहिती देत होते. घुसखोरी केल्यावर हे आतंकवादी संभाषण करण्यासाठी सांकेतिक भाषेचा उपयोग करत होते. यासाठी त्यांना ‘मेट्रीक्स सीट’ दिली जात होती.

(संदर्भ : ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे संकेतस्थळ)

बालाकोट आतंकवादी प्रशिक्षण केंद्र

हे केंद्र ६ एकर परिसरात पसरलेले आहे. हे ‘आयशा सादिक’ या मदरशाने प्रसिद्ध होते. या मदरशाला २ दरवाजे आहेत. या मदरशामध्ये उत्तर दिशेला ‘शीश महल’ आणि दक्षिणेकडे ‘मस्कीन महल’ या २ महत्त्वाच्या जागा होत्या. येथे ‘थ्री स्टार’ सुविधा दिल्या जात होत्या. पाक सैन्य आणि आय.एस्.आय. त्यांच्या खर्चाने ही सुविधा येथे रहाणार्‍या आतंकवाद्यांना देत होती. भारताच्या कारवाईत हे सर्व नष्ट झाले आहे, असे म्हटले जात आहे.

बालाकोट येथील याच प्रशिक्षण तळावर भारताने हवाई आक्रमण केले ! आक्रमणापूर्वी आणि नंतर उपग्रहांतून मिळालेले छायाचित्र

शीशमहल

या शीशमहलमध्ये स्वागतकक्ष, रहाण्यासाठी खोल्या आणि वेगवेगळे कक्ष होेते. यामध्ये या आतंकवाद्यांना विविध सुविधा दिल्या जात होत्या. येथे जैशचे प्रमुख या आतंकवाद्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यासह त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जात होत्या. जेणेकरून हे आतंकवादी माघारी परतू नयेत.

मस्कीन महल

मस्कीन महलमध्ये जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ, अन्य नातेवाईक रहात होते. येथेही सर्वप्रकारच्या सुविधा होत्या. तसेच विशेष पाहुण्यांसाठीही सोय करण्यात आली होती. या पाहुण्यांमध्ये पाक सैन्याचे अधिकारी, गुप्तचर अधिकारी आणि तसेच निवृत्त अधिकारी येत होते. हे अधिकारी या आतंकवाद्यांना सैनिकी शिक्षण, उदा. शस्त्र चालवणे, बॉम्बचा वापर करणे आदी प्रशिक्षण देत होते.

आत्मघातकी पथकांसाठी विशेष जागा

या तळावर आत्मघाती प्रशिक्षण घेणार्‍या आतंकवाद्यांसाठी रहाण्याची वेगळी व्यवस्था केली जात होती. या आतंकवाद्यांना कोणालाही भेटता येऊ नये, यासाठी शीशमहल आणि मस्कीन महल या दोन्हींच्या मध्ये असलेल्या खोल्यांमध्ये ठेवले जात होते. आत्मघातकी प्रशिक्षण घेणार्‍यांकडून आतंकवाद्यांचे प्रमुख आधीच मुझफ्फराबाद येथे तसा अर्ज भरून घेत असत. याच्या आधारे या लोकांची रहाण्याची व्यवस्था केली जात असे आणि त्यांचे प्रशिक्षण विशेष पद्धतीने घेतले जात होते.

३ मासांचे प्रशिक्षण

येथे जैशच्या आतंकवाद्यांना ३ महिने प्रशिक्षण दिले जात होते. हे प्रशिक्षण ३ टप्प्यात विभागले होते.

१. ‘दौर-ए-खास’ म्हणजे ‘अ‍ॅडव्हान्स कॉम्बेट कोर्स’

२. ‘दौर-अल-राद’ म्हणजे ‘अ‍ॅडव्हान्स आर्मड् ट्रेनिंग कोर्स’

३. रिफ्रेशर ट्रेनिंग प्रोग्राम

आतंकवाद्यांना एकेे ४७, पीआयकेए, एलएम्जी, रॉकेट लाँचर, युबीजीएल् आणि हातबॉम्ब चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. तसेच जंगलात रहाणे, गनिमी युद्ध, संपर्क, इंटरनेट आणि ‘जीपीएस् मॅप’ यांविषयी प्रशिक्षण दिले जात होते. इतकेच नव्हे, तर या आतंकवाद्यांना तलवार चालवणे, धनुष्यबाण चालवणे आणि घोड्यावर स्वार होणे याचेही प्रशिक्षण दिले जात होते.

प्रत्यक्ष हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण

जैशचे कमांडर आणि आतंकवाद्यांना हाताळणारे प्रशिक्षक आतंकवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. प्रशिक्षण घेणार्‍या एका आतंकवाद्याला प्रतिदिन एके-४७ चे १० राउंड्स, पीका गनचे ५ राऊंड्स, २ हातबॉम्ब उडवणे आणि पिस्तुलाचे ७ राऊंड्स दिले जात होते.

प्रतिदिन खर्चासाठी आठवड्याला २०० रुपये

या केंद्रापासून १ किलोमीटर अंतरावर जंगलात आतंकवाद्यांसाठी ‘फायरिंग रेंज’ बनवले होते. या फायरिंग रेंजमध्ये आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिल्यावर त्याच्या बदल्यात प्रत्येक आतंकवाद्याला त्यांच्या प्रतिदिनच्या खर्चासाठी आठवड्याला २०० रुपये दिले जात असत. यातून तो त्याचा दिवसभराचा खर्च चालवेल.

आय.एस्.आय. आणि पाकच्या सैन्याच्या अधिकार्‍यांच्या भेटी

काश्मीर खोर्‍यात आतंकवाद पसरवण्यासाठी मसूद अझहर, रौफ आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. हे पाकच्या सैन्याचे साहाय्य घेत होते. मौलाना अजहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ आणि मौलाना उमर हे आतंकवाद्यांचे प्रमुख या तळाला नेहमी भेट देत असत. या वेळी ते गुजरात दंगल, बाबरी मशीद आणि अशा प्रकारच्या अन्य ध्वनीचित्रफिती दाखवून आतंकवाद्यांचा ‘ब्रेनवॉश’ करत असत. काही वेळा आय.एस्.आय. आणि पाकिस्तान सैन्याचे प्रतिनिधीही या आतंकवाद्यांच्या तळांना भेटी देत असत.

प्रशिक्षणानंतर भारतात घुसवण्यासाठी ‘लाँचपॅड’वर नेणे

प्रशिक्षण झाल्यावर या आतंकवाद्यांना पाकव्याप्त काश्मीरमधील सीमेजवळील मुझफ्फराबाद ‘लाँचपॅड’वर (येथून आतंकवाद्यांना भारतात घुसखोरी करून पाठवण्यात येते) आणले जात होते. मुझफ्फराबादमध्ये ‘सवाई नाला’ येथे जैशचा तात्पुरता निवासी तळ (ट्रांझिट) तळ होता. तेथून जवळजवळ ९८ किलोमीटर अंतरावर येथे हे लाँचिंग पॅड आहे. या ठिकाणाहून या आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये घुसवले जात होते. या घुसखोरी करणार्‍या आतंकवाद्यांना या तळावर आणल्यावर मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे कमांडर भेटत असत.

इतकेच नव्हे, तर मुझफ्फराबादमध्ये जैशच्या ट्रान्झिस्ट तळापासून ५०० मीटरवर लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे प्रशिक्षण केंद्र आहे.


Multi Language |Offline reading | PDF