५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चिंचवड (पुणे) येथील चि. तन्वी अतुल पेठे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. तन्वी पेठे ही एक आहे !

चि. तन्वी पेठे

१. गर्भधारणा होण्यापूर्वी घरगुती अडचणी दूर होणे

‘तन्वीच्या वेळी गर्भधारणा होण्यापूर्वी काही मास माझ्या जीवनात अनुकूलता निर्माण झाली होती. त्या आधी मला काही घरगुती अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या सर्व अडचणी गर्भधारणा होण्यापूर्वी काही मास आपोआपच दूर झाल्या.

२. गर्भारपण

२ अ. परदेशातील अनोळखी वातावरणातही भगवंताने घेतलेली काळजी ! : मला गर्भधारणा झाली, त्या वेळी मी अमेरिकेत अटलांटा येथे होते. पहिले साडेपाच मास मी तेथेच होते. तेव्हा मला आणि माझ्या यजमानांना भीती वाटत होती, ‘मला काही त्रास झाला, तर इथे ओळखीचे आणि वडीलधारे असे कुणीच नाही.’ प्रत्यक्षात देवाच्या कृपेने तेथे आम्हाला ३ – ४ मराठी कुटुंबे भेटली. ते माझी विचारपूस करत आणि काळजीही घेत असत. तेथे मला तपासणार्‍या आणि सोनोग्राफी करणार्‍या आधुनिक वैद्या पुष्कळ प्रेमळ होत्या. त्या पुष्कळ प्रेमाने माझी विचारपूस करत असत.

२ आ. अमेरिकेतील आधुनिक वैद्यांनी भारताविषयी काढलेले गौरवोद्गार ! : सोनोग्राफी करणार्‍या आधुनिक वैद्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही भारतातून आलात ना ? मलाही एकदा भारतात येण्याची संधी मिळाली. मला तुमचा देश फार आवडला. भारतीय संस्कृती पुष्कळ चांगली आहे. तुम्ही भाग्यवान आहात की, अशा देशात तुमचा जन्म झाला.’’

२ उ. भारतात आल्यावर देवाच्या कृपेने सतत सत्मध्ये रहाता येणे : भारतात आल्यानंतर मी मिरज येथे माहेरी गेले. तेथे देवाच्या कृपेने मला मिरज आश्रमात जाण्याची संधी मिळाली. प्रत्येक शनिवारी मला मारुतीच्या देवळातील प्रदर्शनकक्षावर सेवेत सहभागी होता आले. पंचांगांची मोजणी आणि वितरण या सेवाही मला मिळाल्या.

२ ऊ. देवीकवच ऐकतांना आणि दैनिक सनातन प्रभात वाचतांना पोटातील गर्भाची जास्त हालचाल होत असल्याचे मला जाणवत असे.

३. जन्म ते एक वर्ष

अ. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाचे डोळे बंद असतात; परंतु तन्वीचे डोळे उघडे होते आणि ती सगळीकडे टकमक बघत होती.

आ. बारशाच्या वेळी पूर्ण विधी होईपर्यंत तन्वी जागी होती. ‘आजूबाजूला काय चालले आहे ?’, याचे ती निरीक्षण करत होती. विधी पूर्ण होईपर्यंत तिला भूक लागली नाही, तसेच ती जराही रडली नाही.

इ. नवजात बालके दिवसभर झोपतात आणि रात्री जागी रहातात; परंतु तन्वी मात्र रात्री ३ – ४ घंटे सलग झोपत असे. – सौ. रेवती अतुल पेठे (आई), चिंचवड, पुणे.

ई. ‘काही वेळा ‘तन्वी हातांच्या मुद्रा करत आहे’, असे मला वाटत असे. काही वेळा ती एक हात उंच करत असे. त्या वेळी ‘ती जयघोष करत आहे’, असे मला जाणवत असे.’ – सौ. उमा यशवंत लेले (आजी), मिरज

४. वय १ ते ३ वर्षे

४ अ. व्यवस्थितपणा : तन्वी प्रत्येक वस्तू जागेवर नेऊन ठेवते. तिला ‘तुझे कपडे बालदीत धुवायला टाक’, असे सांगितल्यावर कपडे बालदीत तसेच न टाकता ते व्यवस्थितपणे नेऊन बालदीत ठेवते. घरातील कपाटाचे दार उघडे राहिले, तर ‘ते लाव’, असे सांगते. दार लावल्याची निश्‍चिती झाल्याविना ती तेथून जात नाही.

एकदा भाववृद्धी सत्संगाला जाण्यासाठी मी तिचे आवरले आणि माझे आवरेपर्यंत तिला खेळण्यासाठी खेळणी काढून दिली. माझे आवरल्यावर मी तिला ‘चल जाऊया’, असे म्हटले. तेव्हा ती मला ‘थांब’ म्हणाली. तिने आधी सर्व खेळणी खोक्यात भरून ठेवली. खोके जागेवर ठेवले. मग मला म्हणाली, ‘‘आता चल.’’

४ आ. निरीक्षणक्षमता : तिला लादीवर पडलेला पदार्थाचा छोटासा कण किंवा केससुद्धा दिसतो. ती लगेच ‘कचरा आहे’, असे म्हणून माझ्या हातात देते आणि ‘केरात टाक’, असे सांगते. घरातील प्रत्येक वस्तूची जागा तिला ठाऊक आहे. जेवणाचा घास घेतांनासुद्धा ‘तिला काय भरवते आहे ?’, याकडे तिचे बारीक लक्ष असते.

४ इ. खाण्या-पिण्याची विशेष आवड नसणे : तिला भूक असेल, तेव्हाच आणि जेवढी भूक आहे, तेवढेच ती खाते. एकदा तिचे पोट भरले की, तिच्या आवडीचा पदार्थ पुढे केला, तरीही ती खात नाही.

४ ई. घरकामात साहाय्य करणे

१. मी तिची पसरलेली खेळणी आवरायला लागले की, ती लगेच मला साहाय्य करते.

२. घासलेली भांडी मला आणून देते आणि ‘जागेवर ठेव’, असे सांगते. ‘कोणते भांडे कशासाठी वापरतो ?’, हेही तिला ठाऊक आहे.

३. धुलाईयंत्रामध्ये कपडे धुवायला टाकले की, मी तिला ‘बालदी जागेवर ठेव’, असे सांगते. ती तत्परतेने बालदी जागेवर नेऊन ठेवते.

४. ती मटार, कोथिंबीर अशा भाज्या निवडायला आवडीने साहाय्य करते.

५. मी केर काढायला लागले की, ती लगेच केर भरायला सुपली आणून देते.

६. घरात कुणाचाही भ्रमणभाष वाजत असेल, तर ती ज्याचा भ्रमणभाष आहे, त्याला नेऊन देते.

७. लहानपणी लादीवर पाणी सांडले की, ती आपणहून कापड घेऊन पुसायला येत असे. ती मोठ्या माणसांप्रमाणे लादी पुसते.

४ उ. नामजप करायला आवडणे : तिला श्रीरामाचा जप करायला आवडतो. ती आता श्रीकृष्णाचा जप करायलाही शिकली आहे. एकदा रात्री झोपण्यापूर्वी ती बराच वेळ शांत बसली होती आणि एकाग्र झाली होती. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तू नामजप करत आहेस का ?’’ तेव्हा ती ‘हो’ म्हणाली.

४ ऊ. आध्यात्मिक उपाय करायला आवडणे : सध्या तिला मोरपिसाने आवरण काढायला पुष्कळ आवडते. उपाय करतांना कापूर किंवा अत्तराची बाटली चुकून पडली की, ती लगेच ‘अत्तर किंवा कापूर पडला’, असे मला सांगते आणि उचलून ठेवते. उपाय केल्यावर ‘उपायांचे साहित्य जागेवर नेऊन ठेव’, असे मला सांगते. तन्वी मधूनच कधीतरी हाताच्या बोटांची मुद्रा करते आणि एकदम एकाग्र होऊन बसते.

४ ए. भजने आणि भक्तीगीते यांमध्ये रमणारी तन्वी ! : तिला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा पाळणा, तसेच इतर भक्तीगीते पुष्कळ आवडतात. एकदा तिच्या आजीने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे ‘नादातूनी या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम…’ हे भजन भ्रमणभाषवर लावले होते. तन्वीला ते भजन इतके आवडले की, त्या दिवशी ती दिवसभर ‘तेच भजन लाव’, असे सांगत होती आणि स्वतःसुद्धा म्हणत होती.

४ ऐ. भाववृद्धी सत्संगाच्या आणि प्रसाराच्या वेळी त्रास न देणे : ती काही मासांची असल्यापासून भाववृद्धी सत्संगात शांतपणे बसते. सत्संग चालू असतांना तिने कधीच दंगा केला नाही किंवा ती रडली नाही. तन्वी आमच्यासह प्रसाराला येते, तेव्हा ती जराही त्रास देत नाही. साधक घरी आले की, तिला पुष्कळ आनंद होतो.

४ ओ. लहान वयातही स्वतःच्या चुकांविषयी खंत वाटणे : एकदा तन्वी आणि मी दोघीच घरी असतांना तिने चुकून मी स्नानगृहामध्ये असतांना बाहेरून कडी लावली. तिचे बाबा अर्ध्या घंट्याने घरी परत आले. तेव्हा त्यांनी कडी उघडून मला बाहेर काढले. आम्ही दोघे याविषयी बोलत असतांना तिच्या तोंडवळ्यावर चुकीविषयी खंत जाणवत होती. एरव्हीसुद्धा ‘आपल्या हातून काहीतरी चुकीची कृती घडलेली आहे’, हे तिला समजते आणि तिच्या तोंडवळ्यावर खंत जाणवते. ‘एवढ्या लहान वयात चुकीची जाणीव होणे, ती स्वीकारणे आणि त्याबद्दल खंत वाटणे’, हे वैशिष्ट्यपूर्ण वाटते.

५. स्वभावदोष

५ अ. रागीटपणा : तन्वीच्या मनाविरुद्ध काही झाले की, तिला पुष्कळ राग येतो. तिच्या रागाची तीव्रता बरीच असते. तिला आलेला राग शांत व्हायला बराच वेळ लागतो.

५ आ. तन्वी कोणतीही कृती तिच्या मनात असेल, तरच करते.

अशी मुलगी दिल्याबद्दल प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! ‘हे भगवंता, अशा जिवाला सांभाळण्याची पात्रता तूच आमच्यात निर्माण कर’, ही तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. रेवती अतुल पेठे (६.१.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now