अमरावती येथील सनातनची बालसाधिका कु. राधिका मावळे (वय १० वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. राधिका मावळे ही एक आहे !

कु. राधिका हिचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

अमरावती, ८ मार्च (वार्ता.) – येथील सनातनची बालसाधिका कु. राधिका मावळे (वय १० वर्षे) हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी साधकांसाठी आयोजित केलेल्या एका सत्संगात ही आनंदवार्ता दिली. या वेळी कु. राधिकाची आई सौ. अर्चना मावळे आणि भाऊ मेघश्याम मावळे उपस्थित होते. ‘सर्व प.पू. डॉक्टरांनीच करवून घेतले’, असे कृतज्ञतापूर्ण मनोगत सौ. अर्चना मावळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. कु. राधिकाच्या आध्यात्मिक प्रगतीची भावभेट मिळाल्याने तिच्या आईसह उपस्थित सर्वच साधकांची भावजागृती झाली.

कु. राधिका मावळे हिची आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. राधिका मावळे

१. गौरीची सुवासिनी म्हणून जेवायला गेल्यावर लक्ष्मीदेवीला नमस्कार करतांना तिने ‘तुला मुलगी होईल’, असे सांगणे आणि त्याच मासात स्वतः गर्भवती असल्याचे समजणे

‘वर्ष २००८ मध्ये मी गौरीची सुवासिनी म्हणून एका ठिकाणी जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर निघतांना मी लक्ष्मीदेवीला नमस्कार केला. तेव्हा देवीने मला सांगितले, ‘तुला मुलगी होईल’ आणि त्याच मासात मी गर्भवती असल्याचे मला समजले.

२. गर्भारपण

अ. गर्भारपणात मला परात्पर गुरुदेव दिसायचे. त्यामुळे मला आतून शांत वाटायचे.

आ. माझ्याकडून ९ मास सेवा झाली. आठव्या मासात मी सनातन पंचांग मोहिमेची सेवा केली. तेव्हा मला थकवा न जाणवता पुष्कळ उत्साह जाणवायचा.

३. जन्म ते ५ वर्षे

३ अ. जन्माच्या वेळी बाळ अशक्त असूनही त्याच्याकडे बघून चांगले वाटणे : कु. राधिकाचा जन्म झाला, त्या वेळी ती पुष्कळ अशक्त होती, तरी तिला बघायला येणारे नातेवाईक आणि परिचित म्हणायचे, ‘‘बाळाकडे बघितल्यावर पुष्कळ चांगले वाटते.’’

३ आ. राधिकेच्या ३ वर्षे वयाच्या थोरल्या भावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून विचारून ‘बाळाचे नाव राधिका ठेवूया’, असे सांगणे : राधिकाचा मोठा भाऊ मेघश्याम (वय ३ वर्षे) याने तिला सर्वप्रथम मांडीवर घेतले. तेव्हा मी त्याला विचारले, ‘‘हिचे नाव काय ठेवायचे ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘थांब. मी प.पू. आजोबांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) विचारतो.’’ त्याने डोळे बंद केले. डोळे उघडल्यावर तो म्हणाला, ‘‘राधिका !’’ तेव्हा सर्व जण म्हणाले, ‘‘राधिका’ हेेच नाव ठेवूया.’’

३ इ. समंजस : मी महाविद्यालयात शिकवायला जायचे, तेव्हा राधिका अडीच वर्षांची होती. त्या वेळी ती वहीवर काहीतरी लिहित बसायची. तेव्हा सर्व जण तिचे कौतुक करायचे. जेव्हा महाविद्यालयात मुले गोंधळ घालायची, तेव्हा प्राचार्य म्हणायचे, ‘‘बघा, एवढी लहान मुलगी काही त्रास देत नाही. तिच्याकडून किती शिकण्यासारखे आहे !’’

३ ई. धाडसी : राधिका ५ वर्षांची असतांना तिला मोठी सायकल चालवता येत होती. त्या वेळी सर्व जण तिचे कौतुक करायचे आणि म्हणायचे, ‘‘पाय पुरत नाहीत, तरी ही मोठी सायकल चालवते.’’

४. वय ६ ते १० वर्षे

४ अ. राधिकाला वाचायला यायला लागल्यापासून ती दैनिक सनातन प्रभात वाचते.

४ आ. सर्वांना आपलेसे करणे : राधिका सर्वांशी जुळवून घेते. त्यामुळे बघणार्‍यांना वाटते, ‘हिची आणि आपली पुष्कळ जुनी मैैत्री आहे.’ ‘ती सर्वांना आपलेसे करून घेते’, असे आमचे सर्व नातेवाईक म्हणतात.

४ इ. ऐकण्याची वृत्ती : एकदा मी राधिकाला सांगितले, ‘‘ताटात हात धुवायचे नाहीत. ते प.पू. आजोबांना आवडत नाही.’’ तेव्हापासून ती ताटात हात धूत नाही आणि कुणी धुतले, तर त्यांना जाणीव करून देते.

४ ई. आश्रमात जाण्याची आणि तेथे रहाण्याची ओढ

१. राधिकाला आश्रमात रहायला पुष्कळ आवडते. त्यामुळे ती वारंवार म्हणते, ‘‘आपण आश्रमात राहूया.’’ एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा ती परत यायला सिद्ध नव्हती. ती पुष्कळ रडली आणि म्हणाली, ‘‘तुम्ही सर्व जण जा. मी रामनाथी आश्रमात रहाते.’’

२. राधिकाची शाळा सकाळी असल्यामुळे तिला प्रतिदिन लवकर उठावे लागते. त्यामुळे ती रविवारी उशिरा उठते; परंतु तिला रविवारी ‘सेवाकेंद्रात येतेस का ?’, असे विचारल्यावर ती लगेच उठून अंघोळीला जाते. तिला ‘सेवाकेंद्रात अंघोळ कर’, असे म्हटले, तर ती ‘अंघोळ न करता आश्रमात जाऊ नये’, असे ती सांगते.

४ उ. कांजिण्या आल्यावरही नामजप आणि उपाय करणे : राधिकाच्या नवव्या वाढदिवसाच्या दिवशी तिला पुष्कळ कांजिण्या आल्या होत्या. तेव्हा तिला पू. पात्रीकरकाकांनी जप दिला होता. तिला कितीही ताप आला, तरी ती अत्तर आणि कापूर यांचे अन् इतर सर्व उपाय करायची.

४ ऊ. भाव

१. राधिकाला कांजिण्यांमुळे बसता येत नव्हते, तरीही ती सर्व उपाय करायची. त्या काळात तिने वार्षिक परीक्षाही दिली होती. तेव्हा शाळेतील सर्व जण म्हणायचे, ‘‘राधिका, तू किती ग्रेट आहेस ! एखादी असती, तर झोपून राहिली असती.’’ ती मला म्हणाली, ‘‘आई, मी पू. पात्रीकरकाकांमुळे बरी आहे.’’

२. राधिका नेहमी म्हणते, ‘‘मला ४ आजोबा आहेत.’’ ‘ते कोणते ?’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘पहिले आईचे बाबा, दुसरे वडिलांचे बाबा, तिसरे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि चौथे मोठे आजोबा (प.पू. भक्तराज महाराज).’’ मी तिला सांगितले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज आता नाहीत.’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘आश्रमात रहाणारे पू. पात्रीकरआजोबा हे माझे चौथे आजोबा आहेत.’’

५. स्वभावदोष

मोठ्याने बोलणे, अव्यवस्थितपणा आणि राग येणे.’

– सौ. अर्चना मावळे (राधिकाची आई), अमरावती (ऑगस्ट २०१८)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
 – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF