देवदर्शनासाठी ‘व्ही.आय.पी.’ पास का ?

नोंद

देवाचे दर्शन लवकर मिळावे, यासाठी राज्यातील काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये पैसे भरून ‘व्ही. आय.पी.’ पास दिला जातो. त्यामुळे त्यांना रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या तुलनेत लवकर दर्शन मिळते. शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मुंबईचे श्री सिद्धीविनायक मंदिर आदी प्रसिद्ध मंदिरांत अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. समाजातील विविध कार्यक्रमांमध्ये ‘व्ही.आय.पी.’ (अतिमहनीय व्यक्ती) म्हणून सामान्यजनांपेक्षा विशेष वागणूक देणे समजण्यासारखे आहे; मात्र ‘व्ही.आय्.पी.’ म्हणून देवाच्या दर्शनासाठी वेगळी व्यवस्था असणे, हे अध्यात्मशास्त्राला धरून नाही. देवदर्शनाला एखाद्या सामाजिक समारंभाप्रमाणे लेखत असल्याचा हा प्रकार आहे. भगवंताचे स्थान व्यवहारातील गोष्टींपेक्षा उच्च आहे. हे जाणणारी व्यक्ती मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून वेळ काढते. त्यामध्ये ती कोणता ‘शॉर्टकट’ पहात नाही.

या संतभूमीत अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, पंढरीचा पांडुरंग भक्ताच्या घरी सेवेसाठी आला. देवाचे अस्तित्व चराचरात आहे आणि तो भावाचा भुकेला असतो. भगवंताचे जेथे स्मरण आहे, तेथे भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी ‘व्ही.आय.पी.’ पासची व्यवस्था करणारे मंदिर व्यवस्थापन देवदर्शनापेक्षा वेळ, आर्थिक आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असा संदेशच नकळत समाजाला देत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आदी दायित्व असलेल्या व्यक्ती दर्शनासाठी आल्यास त्यांच्याकडील दायित्व आणि सुरक्षाव्यवस्था यांचा विचार करता, तसेच वयोवृद्ध, आजारी, अपंग, गरोदर महिला आदींना तत्परतेने दर्शन मिळण्याची व्यवस्था करणे समजण्यासारखे आहे. पूर्वीच्या मंदिरांची रचना पाहिली, तर मंदिरे खूप भव्य असली, तरी मंदिरांचे प्रवेशद्वार मात्र छोटे असायचे. मंदिरामध्ये प्रवेश करतांना वाकून म्हणजे नम्र होऊन, अहंकाराचा त्याग करून देवाच्या पुढे जावे, हे त्यामागील अध्यात्मशास्त्र आहे. स्वत:चे अस्तित्व विसरून भगवंताच्या चरणी शरण गेल्याने भगवंताची कृपा होते, हे अध्यात्मशास्त्र सांगते; मात्र मंदिरात ‘व्ही.आय्.पी. पास’ची व्यवस्था करणे म्हणजे दर्शनासाठी येणार्‍या भाविकाला अंतर्मुख करण्याऐवजी बहिर्मुख करणे. आज अनेक तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळांचा दर्जा दिल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटक मौजमजा करण्यासाठी जातात, मांसाहाराची दुकाने, बार चालू झाले आहेत. हे सर्व प्रकार तेथील पावित्र्य नष्ट करणारे आहेत. हिंदूंची मंदिरे ही आध्यात्मिक शक्तीचे स्रोत आहेत. हे लक्षात घेतल्यास मंदिर व्यवस्थापन असो वा दर्शनासाठी येणारे भाविक, मंदिरात दर्शनासाठी आल्यावर आध्यात्मिक लाभ मिळण्याकडे लक्ष देतील. त्या वेळी ‘व्ही.आय.पी.’ पास सारख्या व्यवस्थेची आवश्यकता भासणार नाही.

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now