हिंदुत्वाची ‘भीती’ (?)

संपादकीय

हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात वक्तव्ये किंवा गरळओक करणार्‍यांची संख्या आज भारतात अधिक आहे. अन्य धर्म किंवा पंथ यांच्या संदर्भात अशा विधानांचे प्रमाण नगण्य असते; कारण ‘हिंदुत्वाला विरोध केला, त्याच्यावर टीका केली, काहीही बरळले, हिंदु धर्माला न्यून लेखले, तरी चालते. हिंदू सहिष्णु आहे. त्यामुळे तो काय आपल्याला विरोध करणार नाही’, या मानसिकतेमुळेच ‘कुणीही यावे आणि टपली मारून जावे’, अशी हिंदु धर्माची आज केविलवाणी स्थिती झाली आहे. ‘कपाळावर कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणार्‍यांची भीती वाटते !’, असे काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेले विधान हे याचेच एक उदाहरण आहे. खरेतर अशी एकांगी करण्यात आलेली विधाने केवळ ऐकून सोडून न देता त्यांचा सडेतोड प्रतिवाद करायला हवा, तसेच असे बोलणार्‍यांवर कारवाईही करायला हवी. सिद्धरामय्या जरी माजी मुख्यमंत्री असले, तरी ते ‘काँग्रेस’चे आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही; कारण काँग्रेसचा आजवरचा इतिहास ‘हिंदु धर्मविरोधी’च होता. काँग्रेसींनी त्यांच्या कृत्यातून ते दाखवले आहेच. दिग्विजय सिंह, शशी थरूर, सुशीलकुमार शिंदे किंवा कपिल सिब्बल यांसारख्या काँग्रेसच्या वाचाळविरांनीही अशा प्रकारची बडबड अनेकदा केली आहे. या बरळण्यातून हिंदु संस्कृती, हिंदु धर्म नष्ट करण्याच्या काँग्रेसच्या षड्यंत्राचा सामना तिच्या सत्ताकाळात अनेक निरपराध हिंदूंना करावा लागला आहे. आताही निवडणुका जवळ आल्याने अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांना खूष करण्यासाठी सिद्धरामय्यांसारखी विधाने अनेक काँग्रेसींकडून होतच रहातील. अशा धर्मविरोधी विधानांना वैध मार्गाने प्रत्युत्तर देण्यासाठी धर्मनिष्ठ हिंदूंनी सिद्धच रहायला हवे.

सिद्धरामय्याच घाबरले कि काय ?

ही झाली नाण्याची एक बाजू ! नाण्याची दुसरी बाजू म्हणजे सिद्धरामय्या यांनी उल्लेख केलेला टिळा आणि भस्म यांच्या भीतीचा ! त्यांच्या विधानानंतर अनेक तरुणांनी सामाजिक संकेतस्थळांवर ‘#selfiewithtilak’ (भ्रमणभाषमधून स्वतःचे टिळा लावलेले छायाचित्र काढून ते संकेतस्थळावर ठेवणे) अशी मोहीम चालू केली. रोखठोक उत्तर देण्यासाठी हिंदु अशा प्रकारे कृतीशील होणे हे कौतुकास्पदच आहे. या मोहिमेत अनेकांनी सहभागी होऊन आपल्या कपाळावर टिळा, कुंकू, भस्म लावल्याची छायाचित्रे ‘शेअर’ केली आहेत. काहींनी तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचीही कपाळावर टिळा अन् भस्म लावल्याची छायाचित्रे ‘पोस्ट’ केली आहेत. स्वपक्षियांच्या या छायाचित्रांविषयी सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया काय बरे असेल ? ती ऐकायला हिंदू उत्सुक आहेत. त्यांच्या कपाळावरील लावलेला टिळा आणि भस्म यांना घाबरून सिद्धरामय्या कुठल्या बिळात जाऊन लपले कि काय, ते शोधायलाच हवे. अनेक विदेशीही भारतात आल्यावर हिंदु संस्कृतीनुसार आचरण करतात. कपाळावर कुंकवाचा टिळा लावल्यावर होणारे आध्यात्मिक लाभही ते अनुभवतात. हिंदु धर्म किती महान आहे, याचेही ते गुणगान गातात. अर्थात टिळा आणि भस्म यांतून मिळणार्‍या सात्त्विकतेचा लाभ तमप्रधान व्यक्ती कधी अनुभवूच शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे. गोवा येथील एका वृत्तपत्राचे संपादक सॅव्हिओ रॉड्रिक्स हे ख्रिस्ती आहेत. त्यांनीही टिळा लावलेले स्वतःचे छायाचित्र ‘पोस्ट’ करत म्हटले, ‘‘मी जरी ख्रिस्ती असलो, तरी माझ्यावर हिंदु धर्माचे संस्कार आहेत. त्यामुळे मी टिळा लावतो.’’ तरुणांनी मोहिमेद्वारे दाखवलेली सतर्कता, तत्परता, तसेच रॉड्रिक्स यांचे विधान म्हणजे सिद्धरामय्यांना एकप्रकारे मिळालेली चपराकच म्हणावी लागेल.

कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणे ही हिंदु संस्कृतीची अनादि काळापासून चालत आलेली परंपराच आहे. त्यामुळे तिचे पालन हिंदु धर्मीय करत आहेत. कुंकवाचा टिळा लावल्याने व्यक्तीला ईश्‍वरी तत्त्वाचा लाभ होतो. तिच्या आत्मविश्‍वासात वाढ होते, तसेच शांती आणि समाधान लाभते. हे आध्यात्मिक स्तरावरील लाभ आहेतच; पण वैज्ञानिकतेच्या दृष्टीने पाहिल्यासही या कृती लाभदायी आहेत. टिळा लावल्याने उत्साह वाढतो. त्यातून तणाव आणि डोकेदुखी न्यून होते. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो. तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा होतो, तसेच कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन तोंडवळाही उजळ दिसू लागतो. भस्मामध्ये शरिरातील बाष्पता शोषून घेण्याची क्षमता असल्याने डोकेदुखी आणि सर्दी या व्याधींसाठी त्याचा उपयोग होतो.

वाचाळविरांवर कारवाई कधी ?

सिद्धरामय्या यांना समस्त हिंदु धर्मियांच्या वतीने प्रश्‍न विचारावेसे वाटतात, ‘कपाळावर कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणार्‍यांची जर इतकी भीती वाटते, तर मग हातात एके ४७ किंवा रायफली किंवा तलवारी घेऊन उजळमाथ्याने फिरणार्‍यांची, तसेच शरिरावर बॉम्ब लावून आत्मघातकी आक्रमणे घडवणार्‍यांची भीती वाटत नाही का ? देशात वारंवार होणार्‍या आतंकवादी आक्रमणांची भीती वाटत नाही का ?’ केवळ टिळा आणि भस्म यांच्या भीतीची कारणे पुढे करून त्याआडून हिंदुत्वाला लक्ष्य करू पहाणार्‍यांवर कारवाई कधी होणार, याचीच हिंदू वाट पहात आहेत. ‘हिंदु समाज गोमूत्र पिणारा समाज आहे’, तसेच ‘भारतात पाकिस्तानचा सामना करण्याचे धाडस नाही’, अशी धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही विधाने केल्याने पाक सरकारमधील माहिती अन् सांस्कृतिक मंत्री फय्याज यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी होते; पण बेताल विधाने करणार्‍या भारतातील आजी-माजी मंत्र्यांवर कारवाई होत नाही, हे दुर्दैवीच आहे. हिंदूंची मते मिळवण्यासाठी टिळा लावून मंदिरांत जाणारे राहुल गांधी सिद्धरामय्या यांच्यावर कारवाई करतील का ? तसे न झाल्यास अशा वाचाळविरांचा ‘भीती’चा बागुलबुवा नष्ट करण्यासाठी हिंदूंनाच आता निवडणुकीच्या रणांगणातून काँग्रेसला धडा शिकवावा लागेल !


Multi Language |Offline reading | PDF