आतंकवादी संघटनांना साहाय्य करून भारतात फुटीरतावादी कारवाया घडवून आणणारी पाकची सरकारी गुप्तहेर संघटना आयएस्आय !

पाकचे माजी राष्ट्रपती तथा सैन्यदलप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नुकतेच ‘पाकची सरकारी गुप्तहेर संघटना आयएस्आय जैशच्या साहाय्याने भारतात बॉम्बस्फोट घडवून आणत होती’, याची स्वीकृती दिली आहे. त्यानिमित्त आयएस्आयच्या कारवायांचा धावता आढावा !

मे.ज. काथोम (एक ब्रिटिश अधिकारी) यांनी वर्ष १९४७ मध्ये आय.एस्.आय.ची (इंटर सर्व्हिसेस+ इंटेलिजन्सची) स्थापना केली.

१. आय.एस्.आय.चे विविध विभाग आणि त्यांचे कार्य

अ. संयुक्त हेरगिरी विभाग : सचिवालयीन कार्य

आ. संयुक्त इंटेलिजन्स ब्युरो : विदेशात हेरगिरी करणे

इ. प्रतिहेरगिरी : शत्रूराष्ट्राच्या हेरांना अटकाव करणे

ई. जे.डी.पी. : खलिस्तानविषयक हालचाली

उ. जे.ओ.नॉर्थ : भारतामधील पूर्वेकडील राज्यांतील अतिरेक्यांसह संपर्क साधून त्यांना साहाय्य करणे

ऊ. जे.आय.एम्. : भारतात जातीय दंगे घडवून आणणे

ए. तांत्रिक विभाग : बनावट भारतीय नोटा, अर्ज, वगैरे छापणे

ऐ. सिग्नल ब्युरो : संदेशवहन

ओ. वेस्ट : मुसलमान देशांशी संपर्क

क. ज्यूविरोधी कारवाया

२. आय.एस्.आय.चे पाकच्या दृष्टीने राजकीय महत्त्व आणि आर्थिक अंदाजपत्रक

पाकिस्तानच्या राजकारणातही ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावते. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात आय.एस्.आय.साठी सहस्रो कोटी रुपयांची तरतूद असते. याच्याच जोडीला मादक पदार्थांच्या व्यापारातून आय.एस्.आय.ला प्रतिवर्षी भरघोस उत्पन्न प्राप्त होते. अफगाणिस्तान हा जगातील सर्वांत मोठी अफूची शेती असलेला देश म्हणून ओळखला जात आला आहे. तालिबानच्या राजवटीत या अफूच्या शेतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. या शेतीतून प्रतिवर्षी सुमारे सहस्रो टन अफू निघते. पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराण या देशांमधील व्यापारी ही अफू घेतात. तिच्यावर प्रक्रिया करून हेरॉईन बनवतात आणि ते पाश्‍चिमात्य देशांत पाठवतात. ही अफू आणि हेरॉईन अफगाणिस्तानाबाहेर मुख्यतः पाकिस्तानमार्गे नेण्यात येते. आय.एस्.आय.ची या व्यवहारावर चांगलीच पकड आहे. या व्यापारातून आय.एस्.आय.ला प्रतिवर्षी  सहस्रो कोटी रुपये मिळतात.

आय.एस्.आय.कडून काश्मिरी, तसेच विदेशातील अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यात येते. या संघटनेसाठी काम करणार्‍यांना कामाच्या स्वरूपानुसार मोबदला देण्यात येतो. आय.एस्.आय.कडून काश्मिरी आणि विदेशी अतिरेक्यांना वेतन देण्यात येते. त्याचप्रमाणे युनोच्या मादक पदार्थविषयक समितीच्या अहवालानुसार आय.एस्.आय. मादक पदार्थांच्या व्यापारातून तिला मिळालेल्या वाट्यापैकी सुमारे किमान १ सहस्र कोटी रुपये अतिरेक्यांना पुरवत असते.

३. आय.एस्.आय.कडून आतंकवाद्यांना देण्यात येणारे वेतन

३ अ. काश्मिरी आतंकवाद्यांना देण्यात  येणारे वेतन : या आतंकवाद्यांना प्रतिमहा २ सहस्र ५०० ते ५ सहस्र रुपये वेतन देण्यात येते. मारल्या गेलेल्या आतंकवाद्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन म्हणून प्रतिमहा १ सहस्र ५०० ते ३ सहस्र रुपये देण्यात येतात. चोरवाटा दाखवणार्‍यांना वार्षिक ३० सहस्र ते ५० सहस्र रुपये, तर तोफा, दारूगोळा इत्यादी वाहून नेणार्‍या हमालांना वार्षिक ७ सहस्र ५०० ते २० सहस्र रुपये देण्यात येतात.

३ आ. विदेशी आतंकवाद्यांना देण्यात येणारा निधी : विदेशी आतंकवाद्यांना दरमहा ५ सहस्र ते ८ सहस्र रुपये वेतनापोटी मिळतात. त्यांच्याशी ‘दोन वर्षांकरता सात लाख रुपये’ असे कंत्राटसुद्धा केले जाते. यामध्ये आधी दोन लाख रुपये आणि दोन वर्षांनंतर पाच लाख रुपये दिले जातात.

सर्व आतंकवाद्यांना गरम कपडे भत्ता वर्षाला ६ सहस्र रुपये इतका देण्यात येतो. एक हातबाँब फेकल्यास १५० रुपये, लष्करातील एका सैनिकाची हत्या केल्यास ६ सहस्र रुपये, कर्नलला ठार केल्यास ५० सहस्र रुपये, तर ब्रिगेडियर वा त्याहून वरिष्ठ अधिकार्‍याची हत्या केल्यास दीड लाख रुपये इतका बोनस देण्यात येतो. त्याचसह एखाद्याला आतंकवादी होण्यास प्रवृत्त करणार्‍याला ५० सहस्र रुपये दिले जातात.

(ही आकडेवारी वर्ष १९९९ मधील आहे. आता त्यात भयावह वाढ झाली असणार, यात शंकाच नाही ! – संपादक)

४. विविध आतंकवादी संघटनांशी संबंध

आय.एस्.आय.चा भारतात कार्यरत असणार्‍या एकूण ९६ आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानात जन्म झालेल्या, तसेच पूर्णपणे पाकधार्जिण्या अतिरेकी संघटनांशी तर आय.एस्.आय.चा अगदी निकटचा संबंध आहे.

५. भारतातील काही कारवाया

५ अ. भारतातच दरोडे घालून आतंकवादी कारवायांसाठी पैसा उभा करणे : आय.एस्.आय.ला पैशांची चणचण भासू लागल्यावर या संघटनेच्या भारतातील हस्तकांनी पैसा उभा करण्यासाठी भारतातच ठिकठिकाणी दरोडे घातले होते.

५ आ. ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून फोडण्याचा प्रयत्न : गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार आय.एस्.आय.ने बांगलादेशातील अतिरेकी संघटनांच्या सहकार्याने भारताच्या ईशान्येकडील राज्यांत मोठी आघाडी उघडली आहे. बांगलादेशामध्ये ते ‘जागो मुजाहिदीन’ नावाचे मासिकही प्रकाशित करतात. त्यात भारताविषयी अपप्रचार असतो आणि भारताविरुद्ध धर्मयुद्ध पुकारण्यासाठी तरुणांना चिथावणी दिलेली असते. ईशान्येकडील राज्यांतील आतंकवादी संघटनांना शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण देणे, त्यांना आर्थिक साहाय्य करणे, तसेच या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय चलन घुसवणे आदी अनेक प्रकारे आय.एस्.आय. ईशान्य भारतात बंडाळी आणि अराजक माजविण्याचे कार्य करते. त्यासाठी आय.एस्.आय.चे अत्यंत वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले असून त्यांतील काही जण बांगलादेशात तळ ठोकून असल्याचे कळते. मीर मुस्तफिझुर रहमान हा या अधिकार्‍यांचा एकेकाळचा नेता समजला जातो. अफगाण युद्धाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे.

बांगलादेश, तसेच आसाम आणि त्रिपुरामधील मदरशांनाही आय.एस्.आय. मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य करते. त्या बदल्यात या मदरशांमधून आय.एस्.आय.ला लष्कराच्या हालचालींविषयीची माहिती, महत्त्वाच्या आस्थापनांचे नकाशे, छायाचित्रे आणि अन्य आवश्यक ती सर्व माहिती पुरवली जाते.

५ आ १. आसाममधील फुटीरतावादी संघटनांशी हातमिळवणी : मुसलमान लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, मुस्लिम लिबरेशन टायगर्स ऑफ आसाम, इस्लामिक लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम आदि समाजविघातक कृत्ये करणार्‍या आसाममधील संघटनांशी आय.एस्.आय.चा संबंध आहे.

५ आ २. आसाममधील तरुणांना आतंकवादी संघटनांचे सदस्य बनवणे : आसाममधील तरुणांना हरकत-उल्-मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचे सदस्य बनवण्यासाठी आय.एस्.आय.चे हस्तक सातत्याने प्रयत्न करत असतात. आसाममध्ये अटक करण्यात आलेल्या बिलाल अली ऊर्फ लालूमियाँ या आय.एस्.आय.च्या हस्तकाने सांगितल्यानुसार आसाममधील ४० तरुणांना हरकतकडून  बांगलादेशात देण्यात येणारे प्रशिक्षण घेता यावे, यासाठी आय.एस्.आय.ने त्यांना त्या देशात जाण्यास साहाय्य केले होते. आसामचा दक्षिण भाग आणि बराक खोरे येथे मुसलमान बहुसंख्येने रहातात. प्रामुख्याने याच भागात आय.एस्.आय.चे तरुणांना अतिरेकी संघटनांचे सदस्य बनवण्याचे काम चालते.

५ इ. पंजाबमधील आतंकवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न : खलिस्तान कमांडो फोर्स, बब्बर खालसा इंटरनॅशनल, इंटरनॅशनल सीख यूथ फेडरेशन आणि खलिस्तान झिंदाबाद फोर्स या शीख आतंकवाद्यांच्या संघटनांना हाताशी धरून पंजाबमधील आतंकवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे आय.एस्.आय.चे प्रयत्नही चालू आहेत. या चारही संघटनांचे नेते लाहोर आणि रावळपिंडीतच कायमस्वरूपी वास्तव्याला आहेत.

५ ई. देशभरच्या नक्षलवाद्यांना साहाय्य करणे : तत्कालीन केंद्रीय गृहसचिव श्री. कमल पांडे यांनी देशातील पाच राज्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया चालू असून, त्यांना आय.एस्.आय. साहाय्य करत असल्याची माहिती होती. नक्षलवाद्यांचा प्रादुर्भाव आंध्रप्रदेश, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांत आहे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पाकपुरस्कृत अतिरेकी’)


Multi Language |Offline reading | PDF