आमदार संदीप नाईक यांच्यावर कारवाई न केल्यास शिवसेना आंदोलन करणार ! – खासदार राजन विचारे

आरोपीवर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींवरच आंदोलन करण्याची वेळ येणे हे गृहमंत्र्यांचे अपयश नव्हे काय ? जे गृहमंत्री सहकारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना न्याय देऊ शकत नाहीत, ते सर्वसामान्य जनतेला न्यायाचे राज्य देण्याची शक्यता आहे का ?

नवी मुंबई – ऐरोली येथील हाणामारीप्रकरणी आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांना कह्यात न घेतल्यास शिवसेना पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करील, अशी चेतावणी खासदार राजन विचारे यांनी ६ मार्च या दिवशी वाशी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी शिवसेना उपनेते विजय नाहट म्हणाले की, ऐरोलीतील कार्यक्रमानंतर ‘नगरसेवक मनोहर मढवी यांना दिसेल तेथे तुडवा’ असे संदेश ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर विरोधकांनी पसरवले आहेत. विरोधकांचे मानसिक संतुलन गेले आहे. ते मनपा त्यांच्या मालकीची असल्यासारखे वागत आहेत. अनंत सुतार, संदीप नाईक हे कार्यकर्त्यांना भडकवून पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जणांना अटक केली; परंतु मुख्य आरोपी अनंत सुतार, संदीप नाईक यांना अद्याप कह्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी केली नाही. ही कारवाई त्वरित केली नाही, तर शिवसेना पद्धतीने याला उत्तर दिले जाईल.

नगरसेवक मनोहर मढवी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्या कुटुंबियांच्या जिवाला धोका आहे. आमदार संदीप नाईक यांच्या गाडीची काच करण मढवी यांनी फोडली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच बाहेर जाऊन ती काच फोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अगोदरच कार्यक्रमात गोंधळ करण्याचे नियोजन केले होते.

खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील सत्ताधार्‍यांचे ‘खाणेपिणे’ बंद केल्याने गणेश नाईक पालिकेच्या आयुक्तांना ‘धोंडा’ म्हणत असल्याची टीका केली. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये मिळणार होते, ते नवी मुंबईतील सत्ताधार्‍यांनी नाकारले. रुग्णालयात भाजलेल्या रुग्णांचा विभाग करण्यासाठी खासदार निधीतून अडीच कोटी रुपये संमत करूनही पालिकेत ३ वर्षे धारिका फिरत आहे. महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे केली जात नाहीत. झालेल्या कामांचे श्रेय शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळू नये म्हणून महापौरांकडून उद्घाटन केले जात नाही. इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव केंद्राकडून संमत झाला तरी मनपा अद्याप संमत करत नाही. या उदाहरणावरून नवी मुंबईच्या विकासात कोण अडथळा आणत आहे, हे जनतेनेच ठरवावे, असे विचारे या वेळी म्हणाले. (शहराच्या विकासातही राजकारण करून सुविधांपासून जनतेला वंचित ठेवणार्‍या अशा राजकारण्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF