५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नवीन पनवेल (जि. रायगड) येथील कु. सोहम् संदीप नलावडे (वय १२ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !

कु. सोहम् नलावडे

१. जन्मापूर्वी – पोटाला विभूती लावल्यावर प्रसूतीच्या वेळी कोणताही त्रास न होणे

‘सोहम्च्या जन्मापूर्वी मी कांदळी येथील संत भक्तराज महाराज यांच्या समाधीस्थानी गेले होते आणि तेथून विभूती आणली होती. प्रसूतीपूर्वी माझे पोट दुखायला लागल्यावर मी ती विभूती पोटाला लावली. नंतर कोणताही त्रास न होता अर्ध्या घंट्याने माझी नैसर्गिक प्रसूती झाली.

२. जन्म ते २ वर्षे

अ. सातव्या दिवसापासूनच बाळ पालथे होऊ लागले.

आ. माझ्या माहेरी सोहम्च्या पाळण्यासमोरच पंचमुखी हनुमानाचे चित्र लावले होते. सोहम् त्या चित्राकडे एकटक पहायचा. त्या चित्राकडे पाहून खेळायचा आणि खळखळून हसायचा. त्याचे हे वागणे पाहून ‘तो हनुमानासह खेळत आहे’, असे सर्वजण म्हणायचे.

इ. सोहम् कधीही विनाकारण रडत नसे. त्याने कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. त्याला खेळणी दिली की, तो शांतपणे खेळायचा.’

– सौ. सुप्रिया संदीप नलावडे (सोहम्ची आई)

३. उत्साही आणि समजूतदार

‘सोहम् खूप समजूतदार आहे. तो साडेतीन वर्षांचा असतांना आम्ही गुजरातमधील गिरनार पर्वतावर श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे तो ५०० पायर्‍या चढला. पूर्ण प्रवासात त्याने कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही.

४. वय – ६ ते १२ वर्षे

४ अ. हट्ट न करणे : सोहम् त्याचा शाळेतील अभ्यास स्वतःहून पूर्ण करतो. तो कधीही कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करत नाही.

४ आ. उत्तम स्मरणशक्ती आणि आकलनक्षमता : सोहम्ची स्मरणशक्ती चांगली आहे. तो १ वर्षाचा असल्यापासूनचे काही प्रसंग त्याला अजूनही जसेच्या तसे आठवतात. तो अभ्यासात हुशार आहे. त्याची चित्रकला चांगली आहे. त्याला देवतांची चित्रे काढायला आवडतात. तो पेटी वाजवायला शिकत आहे. पेटी शिकवणार्‍या त्याच्या बाईंनी सांगितले, ‘‘त्याची आकलनक्षमता चांगली असून तो शिकवलेल्या सर्व गोष्टी इतर मुलांपेक्षा लवकर आत्मसात करतो.’’

४ इ. जिज्ञासू वृत्ती : त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा असते. वाहन, संगणक, अध्यात्म इत्यादी सर्वच गोष्टींविषयी त्याला जिज्ञासा आहे. त्याला आलेल्या शंकांचे तोे त्वरित निरसन करून घेतो. त्याला देवादिकांच्या, महाभारत, रामायण, तसेच शूर राजे इत्यादींच्या गोष्टी ऐकायला आवडतात.

४ ई. प्राणी आणि पक्षी यांच्याप्रती प्रेम : सोहम्ला प्राणी आणि पक्षी यांच्याविषयी पुष्कळ प्रेम आहे. त्याला देशी गाय-वासरू आवडते. गावी गेल्यावर तो तेथील प्राण्यांशी बराच वेळ खेळतो. त्याच्या मावशीकडे देशी गाय आहे. तिच्याकडे गेल्यावर त्याने ‘गायीचे दूध कसे काढायचे ?’, ते शिकून घेतले.

४ उ. साहाय्य करण्याची वृत्ती : सोहम् कचरा टाकणे, दळण आणणे यांसारख्या घरकामांत साहाय्य करतो. शेजार्‍यांनी त्याला कोणतेही काम सांगितले, तर तो विनातक्रार लगेच ते करतो.

४ ऊ. सात्त्विक कृतींची ओढ

४ ऊ १. भजने आणि आरती म्हणण्याची आवड : त्याला संत भक्तराज महाराज यांनी रचलेली आणि गायलेली भजने म्हणायला, तसेच ऐकायला आवडतात. ६ वर्षांचा असल्यापासून तो प्रतिदिन सायंकाळी आरतीलाही जातो.

४ ऊ २. कपाळावर नियमितपणे टिळा लावणे : सोहम् तीन वर्षांचा असल्यापासून कपाळावर नियमितपणे टिळा लावतो. एखाद्या दिवशी टिळा लावला नाही, तर त्याला चैन पडत नाही. तो टिळा लावून शाळेत जात असल्यामुळे मुले त्याला चिडवायची. त्याने मुलांना टिळा लावण्यामागचे शास्त्र सांगितले; पण शाळेत टिळा लावून जाणे बंद केले नाही. हळूहळू मुलांनी त्याला चिडवणे बंद केले.

४ ए. अन्यायाची चीड : कोणत्याही प्रसंगात त्याच्यावर अन्याय झाला, तर तो प्रतिकार करतो आणि निषेध व्यक्त करतो. समोरच्या व्यक्तीला तो त्याची लगेच जाणीवही करून देतो.

४ ऐ. सेवेची आवड : तो संकुलातील साधकांकडून दैनिक सनातन प्रभातची देयके जमा करणे, विनंती अर्ज नेऊन देणे, साप्ताहिक सनातन प्रभातचे अंक नेऊन देणे इत्यादी सेवांत साहाय्य करतो. संस्था, तसेच समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायला त्याला पुष्कळ आवडते. सभेच्या वेळी तो उत्स्फूर्तपणे घोषणा देतो.

५. सोहम्मध्ये असलेले स्वभावदोष

राग येणे, अव्यवस्थितपणा आणि उद्धटपणा.’

– श्री. संदीप नलावडे (सोहम्चे वडील) आणि सौ. सुप्रिया नलावडे ( सोहम्ची आई), सनातन संकुल, देवद, नवीन पनवेल. (१६.७.२०१८)

६. बालसंस्कारवर्गात मनापासून सहभागी होणारा सोहम् !

‘तो बालसंस्कारवर्गात सांगितल्या जाणार्‍या कृती मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. संस्कारवर्गात भावप्रयोग घेतले जातात. तेव्हा त्याला नेहमी शंखनाद ऐकू येतो आणि सुदर्शनचक्र दिसते. एकदा ‘सर्व बालसाधकांनी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाऊन त्यांना आपल्या मनातील गोष्टी सांगायच्या’, असा भावप्रयोग घेतला होता. त्या वेळी सोहम्ने स्वतःची चूक परात्पर गुरुदेवांना सांगून त्यांची क्षमा मागितली.’

– सौ. मांडवी बुगडे, नवीन पनवेल


Multi Language |Offline reading | PDF