श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्ट कारभाराचे अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी !

भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची विधी आयोग आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या कारभारातील अपव्यवहाराविषयी सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे कोथरूड मतदारसंघातील भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी विधी आयोग आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेकडून श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टमधील आर्थिक अपहाराविषयी सविस्तर कागदोपत्रीय पुरावे आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांच्याकडे दिले होते. या पत्रावरून आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी विधी आयोग आणि धर्मादाय आयुक्त यांना पत्र पाठवून भ्रष्टाचाराच्या अन्वेषणाची मागणी केली आहे.

श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने फेब्रुवारी २०१८ मध्ये पत्रकार परिषद घेऊन श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासामधील आर्थिक अपहार पुढे आणला आहे. याविषयीचे पुरावे समितीच्या वतीने शासनाकडे देण्यात आले आहेत. तसेच हिंदु जनजागृती समितीनेही जुलै २०१८ मध्ये पत्रकार परिषद घेऊन श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासामधील भ्रष्टाचार पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धीमाध्यमांपुढे ठेवला होता. यामध्ये शासनाने आखून दिलेल्या आकृतीबंधापेक्षा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाने अधिक कर्मचार्‍यांची शासनाच्या अनुमतीविना नियुक्ती करून देवस्थानच्या पैशाची लूट केली असल्याचा गंभीर आरोप हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. याविषयीचे कागदोपत्री पुरावे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यापूर्वी मुख्यमंत्री आणि विधी अन् न्याय विभाग यांच्याकडे देण्यात आले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now