विवाहबाह्य संबंधातून घडणार्‍या गुन्ह्यांना मालिका आणि चित्रपट कारणीभूत आहेत का, हे शोधा !

मद्रास उच्च न्यायालयाचा केंद्र आणि तमिळनाडू सरकारला आदेश

  • न्यायालयाला जे वाटते, ते सरकारला आतापर्यंत का वाटले नाही ? आणि त्याचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे का सुचले नाही ?
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ढोल पिटणारे अशा गोष्टींविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
  • मालिका आणि चित्रपट यांतून आपण काय बोध घेत आहोत, हे जाणण्याची तरी बौद्धीक आणि मानसिक क्षमता जनतेमध्ये राहिली आहे का ?
  • अशा गोष्टी टाळण्यासाठी भारतीय संस्कृती आणि धर्म यांचे शिक्षण शाळेतून देण्यासह साधना शिकवणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या !

चेन्नई – विवाहबाह्य संबंधामध्ये झपाट्याने होणार्‍या वाढीमागे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा चित्रपट कारणीभूत आहे का ?, याचा शोध घ्या, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र आणि तमिळनाडू सरकार यांना दिला आहे, तसेच गेल्या १० वर्षांत घडलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. विवाहबाह्य संबंधातून वर्ष २०१७ मध्ये एक हत्या झाली होती. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन्. किरुबाकरन् यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने या खटल्यातील आरोपीची पोलीस कोठडी रहित करतांना काही निरीक्षणे नोंदवून वरील आदेश आणि निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या जून महिन्यात होणार आहे.

मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयाने या वेळी म्हटले की,

१. विवाहबाह्य संबंध एक सामाजिक विकृती बनली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे.

२. पती-पत्नीचे आर्थिक स्वातंत्र्य, लैंगिक असमर्थता, सामाजिक माध्यमे, पाश्‍चिमात्य विचारसरणीचा प्रभाव, कुटुंबाला योग्य वेळ न देणे ही विवाहबाह्य संबंधांची प्राथमिक कारणे आहेत, हे न्यायालयाला जाणून घ्यायचे आहे.

३. अनैतिक संबंधातून हत्या, अपहरण आणि आक्रमण यांसारख्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये पती किंवा पत्नी स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये आड येणार्‍या साथीदाराची हत्या करतात, तसेच अनेकदा लहान मुलांचा देखील यामध्ये हकनाक बळी घेतला जातो.

४. या सुनावणीवेळी त्यांनी निवृत्त न्यायाधीश आणि तज्ञ यांची एक समिती नेमण्याचा सल्ला न्यायालयाने दिला. या समितीकडून सामाजिक परिस्थितीला समजून घेत हे संकट दूर करून नागरिकांसाठी समुपदेशन केंद्रे उभी करण्यात यावीत. प्रत्येक जिल्ह्यात असे समुपदेशन केंद्र असणे आवश्यक आहे.

५. भारतात लग्नसंस्था ही प्रेम, श्रद्धा, विश्‍वास आणि नैतिक मूल्यांना धरून असलेल्या अपेक्षांवर आधारित आहे. येथे विवाहाला पवित्र मानले जाते. त्यामुळे संस्थेला मोठे महत्त्व आहे. असे असतांनाही अनैतिक संबंधामुळे या पवित्र अशा विधीनंतर देखील कुटुंब व्यवस्थेला तडे जात आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now