परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज

१. महानिर्वाण करण्यापूर्वी माघ पौर्णिमेला परात्पर गुरु परशराम पांडे महाराज आणि यमदेव यांच्यामध्ये झालेला संवाद

कु. मधुरा भोसले

‘१९.२.२०१९ या दिवशी माघ पौर्णिमा होती. त्या दिवशी यमाचे कालरूप पृथ्वीच्या जवळ आले आणि तो गुराख्याचे रूप घेऊन परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे लांबून दर्शन घेण्यासाठी गेला. अंतर्यामी परात्पर गुरु पांडे महाराजांनी त्याला ओळखले आणि ‘तो यमदेव आहे’, या भावाने त्याला भावपूर्ण नमस्कार केला आणि जवळ येण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्यामध्ये झालेला संवाद पुढीलप्रमाणे आहे.

गुराख्याच्या रूपातील यमदेव : मला सर्व जण ‘दूर जा. जवळ येऊ नकोस’, असे म्हणतात. तुम्ही मात्र मला जवळ बोलावत आहात. याचे कारण काय ?’’

परात्पर गुरु पांडे महाराज : सर्वसामान्य व्यक्तीला मृत्यूचे भय असते. मला मृत्यूचे भय वाटत नाही; कारण मी देह नसून आत्मा आहे, याची मी नित्य अनुभूती घेतो. मरण देहाला असते, आत्म्याला नसते.

यमदेव : तुम्ही मला तुमच्या जवळ बोलावत आहात; परंतु त्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो.

परात्पर गुरु पांडे महाराज : तू येथे तुझ्या इच्छेने मला भेटण्यासाठी आलेला नसून भगवंताच्याच इच्छेने येथे मला भेटण्यासाठी आलेला आहेस. त्यामुळे मी भगवंताची इच्छा जाणूनच तुला माझ्याजवळ बोलावत आहे. माझा पृथ्वीवरील कार्यकाळ आता संपलेला आहे. त्यामुळे भगवंताने मला बोलावणे पाठवले आहे. तू केवळ निमित्त मात्र आहेस. (यावरून परात्पर गुरु पांडे महाराज किती ईश्‍वरेच्छेने वागत होते, याची थोडीफार कल्पना येते. – संकलक)

परात्पर गुरु पांडे महाराजांची मृत्यूंजयी स्थितप्रज्ञ अवस्था पाहून यमदेव गुराख्याचे रूप त्यागून त्याच्या मूळ रूपात प्रकट झाला आणि त्याने परात्पर गुरु पांडे महाराजांना साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये पुढील संभाषण झाले.

यमदेव : परात्पर गुरु पांडे महाराज, तुम्ही मला तुमच्याजवळ बोलवले आहे. तुमचा पृथ्वीवरील कार्यकाळ संपल्यामुळेच तुम्हाला देवाचे बोलावणे आले आहे, तर मी तुमच्या जवळ येऊ शकतो का ? हेच विचारण्यासाठी मी ‘काळ’ स्वत: तुमच्याकडे आलो आहे. मला तुमच्या देहातून प्राणांचे हरण करण्याची अनुमती द्यावी, ही तुमच्या चरणी नम्र विनंती आहे.

परात्पर गुरु पांडे महाराज : तुला अनुमती आहे.

यमदेव : मी तुमच्यावर माझा यमपाश महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी टाकेन. तोपर्यंत माझी छाया (मृत्यूची छाया) तुमच्या देहाला व्यापेल आणि प्रकृती अस्वास्थ्याचे निमित्त करून तुमचे प्राण हरण करीन.

परात्पर गुरु पांडे महाराज : (हसून) जशी भगवंताची इच्छा.

२. स्वत:च्या मृत्यूकडे साक्षीभावाने पहाणारे ऋषितुल्य परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु पांडे महाराज यांना त्यांच्या मृत्यूची पूर्वसूचना काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यांनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून तशी पूर्वसूचना साधकांकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तही केली होती. ते जीवनमुक्त आणि स्थितप्रज्ञ अवस्थेला असल्यामुळे ‘मृत्यू टप्प्याटप्प्याने देह आणि प्राण यांचे नियंत्रण कसे मिळवतो ?’, हे ते साक्षीभावाने पहात होते. अशी अवस्था लाखो वर्षे तपश्‍चर्या करूनही प्राप्त होणे कठीण असते. परात्पर गुरु पांडे महाराज हे आधुनिक काळातील (कलियुगातील) ऋषीच असल्यामुळे ते मृत्यूंजय स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचले होते.

३. माघ कृष्ण पक्ष त्रयोदशीला, म्हणजे ३.३.२०१९ या दिवशी सायंकाळी ५.२२ वाजता परात्पर गुरु पांडे महाराजांनी देहत्याग करून महानिर्वाण करणे

परात्पर गुरु पांडे महाराज हे परात्पर गुरुपदावर आरूढ असून सच्चिदानंद स्थितीला होते. त्यामुळे जेव्हा यमदेवाने त्यांच्यावर यमपाश टाकला, तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यातील दिव्य चैतन्याचा स्पर्श यमपाशाला होऊन यमपाशाच्या काळ्या रंगाचे रूपांतर सोनेरी रंगामध्ये झाले आणि त्याचे रूपांतर एका देवतेत होऊन तो आज्ञाधारी सेवकाप्रमाणे हात जोडून परात्पर गुरु पांडे महाराजांपुढे उभा राहिला. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराजांनी त्याला आशीर्वाद देऊन, ‘‘तू तुझे निहित कार्य कर’’, असा आदेश दिला. त्यानंतर यमपाश परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहाभोवती गुंडाळला गेला आणि त्यांच्या नाभिस्थित पंचप्राणांचा प्रवास उर्ध्व दिशेने चालू झाला. त्यानंतर ‘ॐ नम: शिवाय ।’ आणि ‘हर हर महादेव’ असा जयघोष करत यमपाशाने परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मस्तकावर हळुवारपणे प्रहार केला. यमपाशाचे कार्य चालू होण्यापूर्वीच परात्पर गुरु पांडे महाराज योगनिद्रेत (उच्चतम आध्यात्मिक अवस्थेत) गेले आणि जेव्हा यमपाशाने त्यांच्या मस्तकावर प्रहार केला, तेव्हा यमपाशाच्या प्रहारामुळे त्यांचे ब्रह्मरंध्र उघडले गेले आणि त्यातून प्रथम पंचप्राण बाहेर पडले आणि नंतर आत्मज्योतीने स्थूलदेहाचा त्याग करून ती देहातून बाहेर आली. जे मोक्षाचे अधिकारी असतात, अशा थोर विभूतींच्याच ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर पडतात. अशा प्रकारे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी प्रथम देहत्याग केला आणि त्यानंतर त्यांच्या आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी महानिर्वाण (महान किंवा दैवी प्रवास आरंभ) केला. अशा प्रकारे माघ कृष्ण पक्ष त्रयोदशीला, म्हणजे ३.३.२०१९ या दिवशी सायंकाळी ५.२२ वाजता परात्पर गुरु पांडे महाराजांनी देहत्याग करून महानिर्वाण केला.

४. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी भुवलोक, पितरलोक आणि स्वर्गलोक येथील समस्त पुण्यात्म्यांनी तेज अन् वायू यांचे एकत्रित रूप असणार्‍या गोळ्यांचे रूप धारण करून सनातनच्या देवद आश्रमामध्ये दाटी करणे

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी गोळ्यांच्या रूपात आलेले पुण्यात्मे

सुमारे एक आठवड्यापासून परात्पर गुरु पांडे महाराजांवर मृत्यूची छाया पडल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि ते रुग्णाईत होते. तेव्हा त्यांच्याभोवती शिवाची लयकारी शक्ती मृत्यूची छाया बनून करड्या रंगाच्या आभेच्या रूपाने कार्यरत झाली होती. माघ कृष्ण पक्ष त्रयोदशीला, म्हणजे ३.३.२०१९ या दिवशी देहत्यागापूर्वी परात्पर गुरु पांडे महाराजांच्या देहातील तेज पुष्कळ वाढले होते आणि त्यांच्या देहातून फिकट पिवळसर-पांढर्‍या रंगाचा दैवी प्रकाश बाहेर पडतांना दिसत होता. त्यामुळे ते अन्य दिवसांच्या तुलनेत देहत्यागाच्या दिवशी अधिक दीप्तीमान दिसत होते. तेव्हा आश्रमात आणि आश्रमाभोवती विष्णुतत्त्व कार्यरत झाल्यामुळे सर्वत्र निळसर प्रकाश सूक्ष्मातून पसरला होता. (परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर एका साधकाने काढलेल्या छायाचित्रात आश्रमाभोवतीच्या आकाशात, झाडांवर आणि वातावरणात निळसर रंगाचा प्रकाश पसरलेला स्थुलातून दिसत आहे. – संकलक) जेव्हा त्यांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण चालू झाले. या चैतन्याच्या लहरी सूर्याच्या प्रखर प्रकाशाप्रमाणे तेजस्वी दिसत होत्या. या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी भारतातील भुवलोकातील, तसेच विदेशातील काही पुण्यात्म्ये देवद आश्रमाच्या परिसरात वावरत होते. ते परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाचे भावपूर्ण दर्शन घेऊन त्यांना वंदन करत होते. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा प्रवाह त्यांच्या दिशेने जाऊन त्या पुण्यात्म्यांच्या भोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊन त्यांना सद्गती मिळत होती. त्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराजांच्या पार्थिवाचे भावपूर्ण दर्शन घेण्यासाठी भुवलोक, पितरलोक आणि स्वर्गलोक येथील समस्त पुण्यात्म्यांनी तेज आणि वायू यांचे एकत्रित रूप असणार्‍या गोळ्यांचे रूप धारण करून सनातनच्या देवद आश्रमामध्ये दाटी केली होती. एका साधकाने आश्रमाच्या परिसराची छायाचित्रे काढल्यावर त्यांतील एका छायाचित्रात स्थुलातून पोपटी, फिकट पांढर्‍या आणि विरळ पांढर्‍या रंगांचे तीन-चार ऑर्ब्ज दिसत आहेत. या ऑर्ब्जकडे पहातांना चांगले वाटते; कारण ते पुण्यात्मे आहेत.

५. ‘ज्योत’ ही आत्मतत्त्वाचे द्योतक असल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पवित्र लिंगदेहाने अंगठ्या एवढ्या आकाराच्या ज्योतीचे रूप धारण करणे

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामध्ये ईश्‍वराचे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे त्यांच्या लिंगदेहावर स्थुलदेहाच्या आसक्तीचा लेषमात्रही प्रभाव नव्हता. (सर्वसामान्य मृत व्यक्तीला तिच्या स्थूलदेहाविषयी वाटणार्‍या आसक्तीमुळे तिचा लिंगदेह व्यक्तीच्या स्थूल देहाशी मिळते-जुळते असणारे रूप धारण करतो) ‘ज्योत’ ही आत्मतत्त्वाचे द्योतक असल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पवित्र लिंगदेहाने अंगठ्या एवढ्या आकाराच्या ज्योतीचे रूप धारण केले होते.

६. देहत्यागानंतर परात्पर गुरु पांडे महाराजांचा लिंगदेह जेव्हा पृथ्वीवरून उच्च लोकांकडे निघाला, तेव्हा सूक्ष्मातून घडलेल्या घटना

ज्याप्रमाणे जेट विमान क्षणार्धात कित्येक किलोमीटरचे अंतर पार करते, त्याप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांचा लिंगदेह देहातून बाहेर पडल्यावर तो जन, तप किंवा सत्य या लोकांकडे वेगाने प्रयाण करतो. लिंगदेह सूक्ष्म असल्यामुळे त्याचा आकार अंगठ्या एवढा लहान असतो; परंतु उन्नतांच्या लिंगदेहामध्ये ईश्‍वरी ऊर्जा प्रचंड प्रमाणात कार्यरत असल्यामुळे हा लिंगदेह लहान असूनही कोट्यवधी कि.मी. चे अंतर काही क्षणांमध्ये पार करू शकतो. अंगठ्या एवढ्या लहान आकाराचा उन्नतांचा लिंगदेह मृत्यूनंतरचा प्रवास करत असतांना त्याचा संपर्क सूक्ष्म जगतातील चांगल्या आणि वाईट शक्तींशी आल्यामुळे त्याला या प्रवासात चांगले आणि त्रासदायक अनुभव येतात. परात्पर गुरु पांडे महाराजांचा लिंगदेह जेव्हा पृथ्वीवरून उच्च लोकांकडे निघाला, तेव्हा सूक्ष्मातून पुढील घटना घडल्या.

६ अ. पृथ्वी ते भुवलोक : परात्पर गुरु पांडे महाराजांची आत्मज्योत पृथ्वी ते भुवलोक हा प्रवास करतांना तिला वाईट शक्तींनी विशेष विरोध केला नाही. त्यामुळे हा प्रवास लवकर पूर्ण झाला. हा प्रवास चालू असतांना आत्मज्योतीचा रंग पिवळसर पांढरा होता आणि ती स्थिर होती.

६ आ. भुवलोक ते स्वर्गलोक : भुवलोक ते स्वर्गलोक हा प्रवास करतांना भुवलोकात अंधार असल्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीने काही सहस्र कि.मी. चा प्रवास अंधारातून केला. तेव्हा पाताळातील वाईट शक्ती भुवलोकातील वाईट शक्तींना साहाय्य करून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीच्या प्रवासाला सूक्ष्मातून अवरोध निर्माण करू लागल्या. त्यामुळे भुवलोकातील महानिर्वाणाच्या मार्गात अंधार दाटला होता आणि ज्योतीच्या प्रवासाच्या विरुद्ध दिशेने जोराने वारा वहात होता. या विरोधाला सामोरे जाण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीने फुललेल्या निखार्‍याप्रमाणे रूप धारण केले आणि त्यातून श्रीगणेशाची मारक शक्ती मोठ-मोठ्या ठिणग्यांच्या रूपाने बाहेर पडत होत्या. (परात्पर गुरु पांडे महाराजांनी श्रीगणेशाची उपासना केल्यामुळे त्यांच्यामध्ये आवश्यकतेनुसार गणेशतत्त्व कार्यरत झाले.- संकलक) जेव्हा वाईट शक्तींनी वायू आणि अंधार यांचे रूप धारण करून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीरूपी निखार्‍यावर झडप घातली, तेव्हा त्या निखार्‍याचे रूपांतर यज्ञज्वालेमध्ये झाले आणि त्यांतून रामबाण, सुदर्शनचक्र, त्रिशूळ, तलवार आणि परशू यांसारखी दिव्य शस्त्रे वाईट शक्तींच्या दिशेने प्रक्षेपित झाली. या शस्त्रांच्या प्रहारामुळे अनेक वाईट शक्ती नष्ट झाल्या. ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांची दृष्टी आपल्यावर पडावी आणि त्यांनी सोडलेली शस्त्रे स्वत:ला लागून स्वत:ची वाईट योनीतून सुटका व्हावी’, यासाठी अनेक वाईट शक्ती परात्पर गुरु पांडे महाराजांच्या लिंगदेहाला पुढील प्रवास करतांना त्रास देण्यासाठी आल्या आहेत’, असे जाणवले.

६ इ. स्वर्गलोक : परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीने स्वर्गलोकात प्रवेश केल्यावर इंद्र, अग्नि, वरुण, वायू, चंद्र, सूर्य इत्यादी देवता आणि देवगुरु बृहस्पती यांनी ‘स्वस्ती मंत्र आणि मंगलाष्टके’ म्हणत पुष्पवृष्टी करून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीचे स्वागत केले. तेव्हा आत्मज्योतीतून परात्पर गुरु पांडे महाराज यांचे सूक्ष्म रूप प्रगट झाले आणि सर्व देवतांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सूक्ष्म रूपाला विनम्रभावाने वंदन करून त्यांचे चरणस्पर्श केले. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सूक्ष्म रूपाने सर्वांना आशीर्वाद दिले आणि पृथ्वीवरील सनातनच्या साधकांना पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी मनापासून साहाय्य करण्याची आज्ञा केली. तेव्हा सर्व देवतांनी परात्पर गुरु पांडे महाराजांनी दिलेली आज्ञा स्वीकारून साधकांना साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांचे सूक्ष्म रूप पुन्हा आत्मज्योतीमध्ये विलीन झाले.

६ ई. धर्मलोक : परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीचा प्रवास स्वर्गलोकातून महर्लोकाकडे चालू असतांना मध्येच धर्मलोक लागला. तेव्हा तेथील धर्मविरांनी सर्वत्र भगवे ध्वज आणि झेंडूच्या फुलांच्या माळा लावून परात्पर गुरु पांडे महाराज यांचे स्वागत केले. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे सूक्ष्म रूप आत्मज्योतीतून प्रकटले आणि त्यांनी धर्मविरांना, ‘तुम्ही व्यष्टी स्तरावर काळानुसार अष्टांग साधना करा आणि समष्टी स्तरावर पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना साहाय्य करा’, असे मार्गदर्शन केले अन् त्यांना पुढील आध्यात्मिक उन्नती करण्याचा आशीर्वाद दिला. जेव्हा आत्मज्योतीस्वरूप परात्पर गुरु पांडे महाराजांनी प्रयाण केले, तेव्हा सर्व धर्मविरांनी ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’ असा जयघोष उच्च स्वरात केला.

६ उ. गणेशलोक : महर्लोकाच्या जवळ आल्यावर परात्पर गुरु पांडे महाराजांच्या सूक्ष्म रूपाने गणेशलोकात प्रवेश केल्यावर प्रथम पूज्य श्रीगणेशाने परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या गळ्यात दूर्वा आणि जास्वंदी या फुलांची माळ घालून त्यांचे औक्षण केले. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांचे एक रूप (व्यष्टी रूप) श्रीगणेशामध्ये विलीन झाले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी श्रीगणेशाची उपासना केल्यामुळे त्यांच्या व्यष्टी रूपाला श्रीगणेशाच्या रूपाशी एकरूप होता आले, म्हणजे सायुज्य मुक्ती मिळाल्याचे जाणवले (परात्पर गुरु पांडे महाराज यांचे समष्टी रूप मोक्षप्राप्त करण्यासाठी सत्यलोकाकडे जात असल्याचे जाणवले. – मधुरा)

६ ऊ. गोलोक आणि कृष्णलोक : परात्पर गुरु पांडे महाराज यांचे समष्टी रूप आत्मज्योतीच्या रूपाने विराजमान होते. गणेशलोकानंतर महर्लोकाच्या जवळ ‘गोलोक आणि कृष्णलोक’ लागले. गोलोकातील कामधेनूने तिचा पान्हा सोडून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सूक्ष्म रूपावर दैवी दुधाने दुग्धाभिषेक केला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या पाषर्र्दांनी (देवाप्रमाणे दिसणारे आणि देवाच्या जवळ राहून सेवा करणारे) त्यांना श्रीकृष्णाजवळ आदरपूर्वक आणले. श्रीकृष्णाने पांचजन्य शंख वाजवून आणि पुष्पवृष्टी करून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सूक्ष्म रूपाचे स्वागत केले अन् त्यांचे पाद्यपूजन करून ते गुरुचरणतीर्थ प्राशन केले. श्रीकृष्णाने जेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सूक्ष्म रूपाकडे पहात स्मितहास्य केले, तेव्हा मला त्याचे रूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याप्रमाणे दिसले.

६ ए. महर्लोक, जनलोक आणि तपोलोक : त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज आत्मज्योतीच्या रूपाने महर्लोक, जनलोक आणि तपोलोक यांतून प्रवास करून पुढे जात होते. तेव्हा तेथील सनातनचे दिवंगत साधक, संत आणि विविध ऋषिमुनी यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आत्मज्योतीचे भावपूर्ण दर्शन घेतले. अनेक ठिकाणी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मार्गाच्या दुतर्फा अनेक ऋषिमुनी ज्योतीचे रूप धारण करून उपस्थित असल्याचे जाणवले. सर्वांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आणि साधकांचे वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण करण्यासाठी साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना साहाय्य करण्यास सांगितले. तसेच त्यांना शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्याचा आशीर्वाद दिला.

७. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या आत्मज्योतीने सत्यलोकात प्रवेश केल्यावर घडलेल्या सूक्ष्म घटना

७ अ. परात्पर गुरु पांडे महाराजांची आत्मज्योत गुरुतत्त्वामध्ये विलीन होण्यास आतुर असल्याचे जाणवणे : परात्पर गुरु पांडे महाराजांची आत्मज्योत जेव्हा सत्यलोकात पोहोचली, तेव्हा तेथे कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वामध्ये त्यांची आत्मज्योत विलीन होण्यास आतुर असल्याचे जाणवले. या गुरुतत्त्वामध्ये आद्य शंकराचार्य, तोटकाचार्य, प.पू. चंद्रशेखरानंदजी, प.पू. अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. डॉक्टर आठवले या गुरुपरंपरेचे अस्तित्व सूक्ष्मातून जाणवले.

७ आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे सूक्ष्म रूप ब्रह्मज्योतीत विलीन होणे, ते गुरुतत्त्वाच्या रूपाने कार्यरत झाल्याचे जाणवणे आणि ते तत्त्वरूपाने कार्यरत रहाणार असून साधकांना आणि संतांना सूक्ष्मातून मार्गदर्शन करणार असणे : परात्पर गुरु पांडे महाराज सत्यलोकातील वातावरणाशी एकरूप होतांना प्रथम त्यांच्या आत्मज्योतीतून शक्तीस्वरूप लालसर रंगाच्या प्रकाशाची आभा बाहेर पडून निर्गुणात विलीन झाली. त्यानंतर भावाची निळी आभा वातावरणातील चैतन्याशी एकरूप झाली. त्यानंतर ज्योतीतील पिंडस्वरूपात कार्यरत असणारी चैतन्याची पिवळी आभा व्यापक होऊन सत्यलोकातील निर्गुण चैतन्यात विलीन झाली. आनंदाची फिकट गुलाबी आभा सूक्ष्म होऊन अदृश्य झाली आणि शांतीची पांढरी आभा व्यापक होऊन अनंतात विलीन झाली. त्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराजांचे सूक्ष्म रूप पांढर्‍या रंगाच्या आत्मज्योतीमध्ये कायमचे विलीन झाले आणि त्यांची पांढर्‍या रंगाची आत्मज्योत सत्यलोकामध्ये विराजमान असणार्‍या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाली. तेव्हा निर्गुणवाचक ‘ॐ’काराचा मंगल ध्वनी सूक्ष्मातून ऐकू आला; जणू परात्पर गुरु पांडे महाराज ‘ॐ’चा कार स्वरूप परब्रह्मात विलीन झाल्याचे हे सूचक असल्याचे जाणवले. अशा प्रकारे परात्पर गुरु पांडे महाराज यांचे सूक्ष्म रूप ब्रह्मतत्त्वात विलीन झाले आणि ते गुरुतत्त्वाच्या रूपाने कार्यरत झाल्याचे जाणवले. त्यामुळे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा पार्थिव देह जरी पंचमहाभूतांमध्ये विलीन झालेला असला, तरी त्यांचे सूक्ष्म रूप ब्रह्मज्योतीच्या स्वरूपात गुरुतत्त्वात विलीन झाल्यामुळे ते तत्त्वरूपाने कार्यरत रहाणार असून साधकांना आणि संतांना सूक्ष्मातून मार्गदर्शन करणार आहेत.

टीप

टीप १. सर्वसामान्य व्यक्तीचे प्राण हरण करण्यासाठी यमदूत येतात; परंतु परात्पर गुरु पांडे महाराज थोर संत, परात्पर गुरु आणि भगवंताचे परम प्रिय भक्त असल्यामुळे ते आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी होते. त्यामुळे त्यांचे प्राण हरण करण्यासाठी यमदेव आला होता. सर्वसामान्य व्यक्तीचे प्राण हरण करतांना यमदूत त्यांची अनुमती न घेता, प्राण थेट हरण करतात; परंतु परात्पर गुरु पांडे महाराज आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी असल्यामुळे यमदेवाने प्रथम परात्पर गुरु पांडे महाराज यांची प्रथम अनुमती घेतली आणि त्यांच्या अनुमतीनेच प्राण हरण केले. यावरून परात्पर गुरु पांडे महाराज भीष्माचार्यांप्रमाणे इच्छामरणी असल्याचे सिद्ध झाले. कलियुगात अशी थोर विभूती पहावयास आणि अनुभवण्यास मिळाली, यासाठी गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्ती केली, तरी ती अल्पच आहे.

टीप २. उन्नतांच्या मृत्यूला ‘देहत्याग’ आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाला ‘महानिर्वाण’ असे संबोधण्यामागील आध्यात्मिक कारणे : सामान्य व्यक्तीचा मृत्यू होतो, तर उन्नत इच्छा मरणी असल्यामुळे त्यांच्या मृत्यूला ‘देहत्याग’ असे संबोधले जाते; कारण त्यांनी त्यांच्या इच्छेने देहाचा त्याग केलेला असतो. उन्नतांच्या लिंगदेहाने पृथ्वीवरून जन, तप किंवा सत्य या लोकांकडे प्रयाण करण्याच्या कृतीला ‘महानिर्वाण करणे’, असे आध्यात्मिक परिभाषेत संबोधले जाते.

टीप ३. परात्पर गुरु पांडे महाराजांनी सूक्ष्मातील सगुण रूपात आणि आत्मज्योतीरूपी निर्गुण रूपात दर्शन देण्यामागील कारण : जोपर्यंत परात्पर गुरु पांडे महाराज यांचा स्वर्गलोक, धर्मलोक, गणेशलोक आणि कृष्णलोक या सगुण लोकांशी संबंध होता, तोपर्यंत त्यांच्यामध्ये सगुणतत्त्व कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या आत्मज्योतीतून त्यांचे सूक्ष्म सगुण रूप बाहेर येऊन त्यांचे सूक्ष्मातून दर्शन होत होते. जेव्हा त्यांचा महर्लोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक या निर्गुण लोकांशी संपर्क आला, तेव्हा त्यांच्यामध्ये ईश्‍वराचे निर्गुण तत्त्व कार्यरत झाल्यामुळे आत्मज्योतीच्या रूपाने, म्हणजे निर्गुण रूपात दर्शन दिले.

कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले, तुमच्या कृपेमुळे परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या देहत्यागाचे आणि महानिर्वाणाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा माझ्याकडून झाली आणि सूक्ष्मातील अनेक नवीन सूत्रे शिकण्याची संधी मिळाली, यासाठी हे गुरुमाऊली, मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०१९, रात्री १०.१५)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF