बोईसर येथे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष पथकातील २ पोलिसांचेच लाच घेतल्याप्रकरणी स्थानांतर

  • असे पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक !
  • दुसरीकडे लाच घेण्यासाठी अशा भ्रष्ट पोलिसांचे स्थानांतर करण्यात येते का ? अशा पोलिसांचे निलंबन करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, तर पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचार अल्प होण्यास साहाय्य होईल !

मुंबई – पालघर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पथकातील पोलीसच हप्ते घेत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला असून या दोन्ही पोलिसांचे स्थानांतर करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या प्रकरणी विभागीय अन्वेषण चालू असून अन्वेषणाअंती पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधीक्षकांकडून या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. २५ फेब्रुवारी या दिवशी बोईसर भंडारवाडा येथील एका दुकानामध्ये तंबाखू आणि गुटखा ठेवण्याच्या कारणावरून या पथकाने दुकानावर धाड टाकली. या वेळी गंभीर गुन्हा न नोंदवण्यासाठी पोलिसांनी दुकानदाराकडून १० सहस्र रुपयांची लाच घेतली. याविषयी दुकानदाराने तक्रार केल्यावर पोलिसांनी लाच घेणार्‍या राजू दुबे हस्तकाला अटक केले. तो पोलिसांचाच हस्तक असल्याचे पुढे आले असून त्याने सुरेंद्र शिवदे आणि मल्हार थोरात या २ पोलिसांची नावे घेतली. काही दिवसांपूर्वीही बोईसर येथे २ पोलीस अधिकार्‍यांना ३ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी कह्यात घेतले होते. त्यानंतर लगेचच लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांवर ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF