सरकारी कर्मचार्‍याने अनधिकृतपणे दुसरा विवाह केला, तर दुसर्‍या पत्नीला कुटुंब सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही ! – उच्च न्यायालय

मुंबई – सरकारी कर्मचार्‍याचा पहिला विवाह संपुष्टात आला नसतांनाही त्याने अनधिकृतपणे दुसरा विवाह केला, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दुसर्‍या पत्नीला कुटुंब सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. संबंधित सरकारी कर्मचार्‍यांने इच्छापत्र करून सेवानिवृत्ती वेतन दुसर्‍या पत्नीच्या नावे केले असले, तरी कुटुंब सेवानिवृत्ती वेतन ही त्या कर्मचार्‍यांची संपत्ती नाही. कुटुंब सेवानिवृत्त वेतन हे कर्मचार्‍यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी असते आणि महाराष्ट्र नागरी सेवा (सेवानिवृत्त वेतन) नियम, १९८२ मधील नियम ११६ मध्ये ‘कुटुंबा’ची व्याख्या देण्यात आली आहे. त्यामध्ये कर्मचार्‍यांचा पहिला विवाह कायदेशीररीत्या संपुष्टात आला नसतांनाही त्याने दुसरा विवाह केल्यास, त्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे या नियमांतर्गत सरकारी कर्मचार्‍यांच्या दुसर्‍या पत्नीला कुटुंब सेवानिवृत्त वेतनाचा लाभ मिळू शकत नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

सांगलीचे महालिंग रामचंद्र पाटील यांनी मृत्यूपूर्वी इच्छापत्र करून त्यांची सर्व संपत्ती आणि कुटुंब सेवानिवृत्ती वेतन त्यांची दुसरी पत्नी कमल महालिंग पाटील यांच्या नावे केले. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब सेवानिवृत्ती वेतन अधिकृतपणे आपल्या नावे व्हावे, यासाठी कमल यांनी उपनिबंधक आणि जिल्हा परिषदेत केलेली विनंती दुसरा विवाह अनधिकृत असल्याने अमान्य करण्यात आली. याविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. कमल यांच्या अधिवक्त्यांनी सुनावणीच्या वेळी ‘महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमध्ये कर्मचार्‍यांच्या एकापेक्षा अधिक विधवांना समान भागात कुटुंब सेवानिवृत्ती वेतन वाटून देण्याची तरतूद आहे’, या सूत्रावर केलेेेला युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला.

या वेळी न्यायालयाने म्हटले की, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवा निवृत्ती वेतन) नियम मधील ११६ व्या नियमानुसार, जर सरकारी कर्मचार्‍यांच्या पत्नीला/पतीला व्यभिचारामुळे न्यायालयाने घटस्फोट संमत केला असला, तरी संबंधित व्यक्तीला सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचार्‍यांचा पहिला विवाह अस्तित्वात असतांनाही दुसरा विवाह केलेल्या कर्मचार्‍यांच्या दुसर्‍या पत्नीला सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ कसा मिळू शकेल ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now