हिंदुविरोधी विधाने करणार्‍या पाकच्या मंत्र्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी

हिंदुविरोधी विधाने करणार्‍यांवर आता पाकही कारवाई करतो; मात्र भारतात हिंदुविरोधी विधाने करणार्‍यांवर कोणतीही कारवाई होत नाही !

फय्याज अल हसन चौहान

इस्लामाबाद – हिंदूंविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या पाकमधील फय्याज अल हसन चौहान या मंत्र्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकच्या पंजाब प्रांतामधील सरकारमध्ये फय्याज हे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री होते.

१. फय्याज यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये, ‘हिंदु समाज गोमूत्र पिणारा समाज आहे’ असे विधान केले होते. तसेच ‘भारतात पाकिस्तानचा सामना करण्याचे धाडस नाही’, असेही त्यांनी म्हटले होते.

२. या विधानानंतर विरोधी पक्षासमवेत फय्याज यांच्यावर स्वपक्षीय नेत्यांनीही टीका केली, तसेच सामाजिक माध्यमांतूनही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अखेर पंजाब सरकारने फय्याज यांना त्यागपत्र देण्यास सांगितले.

३. तत्पूर्वी फय्याज यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय सैन्य आणि भारतातील प्रसारमाध्यमे यांच्याविषयी बोलतांना ते वक्तव्य केले होते. पाकमध्ये रहाणार्‍या हिंदूंना दुखावण्याच्या उद्देशाने मी कोणतेही वक्तव्य केले नव्हते. जर माझ्या वक्तव्याने पाकमध्ये रहाणार्‍या हिंदूंच्या भावाना दुखावल्या असतील, तर मी त्यांची क्षमा मागतो.’


Multi Language |Offline reading | PDF