कुंभमेळा आणि त्याची आवश्यकता !

२ मार्च २०१९ या दिवशी आपण कुंभमेळा आणि त्याची आवश्यकता या लेखाचा आरंभीचा भाग पाहिला होता. आजच्या लेखात पुढील भाग पाहूया.

कै. परात्पर गुरु पांडे महाराज

१०. पूर्वी कुंभमेळ्याच्या वेळी ऋषिमुनींनी एकत्र येऊन विविध आध्यात्मिक विषयांवर चर्चा करून प्रायोगिक सत्य उघड करणे आणि त्याच्या चैतन्याचा परिणाम आजही दिसणे

पूर्वी ऋषिमुनी कुंभमेळ्याच्या वेळी एकत्र येत असत. त्यांची विविध आध्यात्मिक विषयांवर (साधना, धर्माचरण) चर्चा होत असे. त्याला ‘उपनिषद’ म्हणत. अशा वेळी ते विविध विषयांवर आलेल्या अनुभूती प्रतिपादन करून, वादविवाद करून आणि सत्य-असत्य जाणून प्रायोगिक सत्य कायमचे उघड करत.

‘प्रायोगिक सत्य’ म्हणजे स्वतः अनुभव घेऊन सत्य समोर ठेवणे होय. अशा सत्याचा, म्हणजे उपनिषदांचा परिणाम आज सहस्रो वर्षांपासून कायम आहे. त्यातील चैतन्याचे परिणाम आजही दिसतात. आपण त्याचे अनुभव आजही घेऊ शकतो, हे विशेष आहे; कारण त्या वेळी ऋषिमुनींनी ते केवळ विषद केले नसून प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. ‘मनुष्य’ हे यंत्र आजही त्याच स्वरूपात असून त्या यंत्रावर ऋषिमुनींनी केलेले प्रयोग कायम स्वरूपाचे असून ते आजही तंतोतंत लागू पडतात.

कुंभमेळ्याच्या वेळी सांसारिक लोक येत असल्यामुळे पूर्वीच्या ऋषिमुनींद्वारे झालेल्या प्रबोधनाचा लाभ त्यांना होत असे.

११. सध्याच्या कुंभमेळ्यांतील संत-महात्म्यांचे केवळ स्वतःच्या सिद्धींचे प्रदर्शन करण्याकडे अधिक लक्ष असणे आणि त्यांच्याद्वारे राष्ट्र, धर्म अन् मानव यांसाठी काही चांगले निष्पन्न होतांना न दिसणे

आताच्या कुंभमेळ्यांमध्ये पूर्वीसारखे काही दिसत नाही, नुसते मेळावे भरतात. देशभरातून संत-महंत येतात; मात्र त्यांच्याद्वारे राष्ट्र, धर्म आणि मानव यांसाठी काही चांगले निष्पन्न होतांना दिसत नाही. वैज्ञानिक जसे विविध प्रयोगांच्या आधारे एखादे विधान सत्य स्वरूपात सिद्ध करून दाखवतात, तसे आताचे संत-महात्मे काही प्रायोगिक ज्ञान देतांना दिसत नाहीत. ‘नुसते शाहीस्नान केले, हारतुरे केले, भाषणे केली’, असे होतांना दिसते. असेच शेकडो वर्षे चालू आहे. केवळ स्वतःच्या सिद्धींचे प्रदर्शन करण्याकडे त्यांचे अधिक लक्ष असते. ‘सध्याची परिस्थिती काय आहे ? त्यात काय सुधारणा केली पाहिजे ? पुढील पिढ्यांसाठी काय चांगले केले पाहिजे ?’, इत्यादी कार्य त्यांनी केले पाहिजे. ते होतांना दिसत नाही.

१२. चैतन्याच्या अभावामुळे सध्या कुंभमेळ्यांमध्ये एकत्र येणार्‍या सामर्थ्यहीन आणि बलहीन संत-महंतांची महत्ता अन् प्रभाव न दिसणे

सध्या कुंभमेळ्यांमध्ये एकत्र येणार्‍या संत-महंतांची महत्ता आणि प्रभाव दिसत नाही; कारण जेव्हा साधनेद्वारे चैतन्याचे सामर्थ्य वाढते, तेव्हा त्याचा प्रभाव दिसून येतो. सामर्थ्यहीन आणि बलहीन संतांना कुणी महत्त्व देत नाही. लोक त्यांना केवळ हारतुरे देऊन आणि नमस्कार करून निघून जातात. त्याचा ठोस प्रभाव पडत नाही.

वास्तविक साधनेचा प्रभाव महान आहे. साधनेमुळे मनुष्य जग हलवू शकतो. त्याच्यात असलेल्या चैतन्याच्या प्रभावामुळे राष्ट्रसुद्धा सामर्थ्यवान होते. संत-महंतांकडे असे चैतन्य असते, तर आतापर्यंत त्याचा कितीतरी प्रभाव पडला असता; मात्र तसे काही दिसत नाही.

१३. ऋषिमुनींप्रमाणे पुढील कित्येक पिढ्यांच्या कल्याणासाठी ग्रंथांचे लिखाण करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले !

पूर्वीच्या ऋषिमुनींनी त्याग करून प्रायोगिक ज्ञान पुढे आणले. त्यानंतर आता काही सुधारणा दिसत नाही; परंतु सध्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले पुढील कित्येक पिढ्यांच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहित आहेत. सध्याच्या जगात असे करून दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेव आहेत.

१४. कुंभमेळा हा नाममात्रच राहिलेला असला, तरी तेथे हिंदूंमधील जागृतीचे आणि सामर्थ्याचे दर्शन होणे अन् गंगा नदीच्या पवित्र स्नानाने तेथे उपस्थित रहाणार्‍यांच्या पापांचे क्षालन होणे

कुंभमेळ्यात राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची संधी आहे; मात्र सध्या कुंभमेळा हा नाममात्रच राहिला आहे, तरी ईश्‍वरी कृपेने कुंभमेळ्याच्या माध्यमातून हिंदु धर्मीय एकत्रित येतात आणि या ठिकाणी त्यांच्यातील जागृतीचे आणि सामर्थ्याचे दर्शन होते. ईश्‍वरी कृपेने गंगा नदीच्या पवित्र स्नानाने तेथे उपस्थित रहाणार्‍यांच्या पापांचे क्षालन होते.

१५. साधनेचे महत्त्व आणि साधनेच्या अभावामुळे चैतन्याविना झालेली कुंभमेळ्याची सध्याची दयनीय स्थिती

१५ अ. साधनेद्वारे यज्ञकर्म झाल्यास साधकाच्या बुद्धीने मेधा अवस्था प्राप्त करणे आणि त्याच्यामध्ये सहस्रो लोकांना पावन करण्याचे सामर्थ्य निर्माण होणे : ‘साधनेमुळे निर्माण होणार्‍या चैतन्याच्या प्रभावामुळे फलनिष्पत्ती किती महान असते !’, हे त्रिसुपर्ण सूक्तामध्ये सांगितले आहे.

ये ब्राह्मणास्त्रिसुपर्णं पठन्ति । ते सोमं प्राप्नुवन्ति । आ सहस्रात् पङ्क्तिं पुनन्ति ॥

– त्रिसुपर्ण, अनुवाक २

अर्थ : जे ब्राह्मण (साधक) त्रिसुपर्ण सूक्ताचे पठण करतात, ते स्वतः साधनेद्वारे आनंदमय स्थिती प्राप्त करतात, तसेच त्यांच्यात सहस्र लोकांनाही पुनीत करण्याचे सामर्थ्य निर्माण होते.

एवढेच नव्हे, तर ते ब्रह्महत्येपासून झालेल्या पापाचा नाश करतात. त्यांना सोमयागाचे फळ मिळते.

विवरण : त्रिसुपर्ण सूक्ताच्या साधनेमध्ये ‘मेधवा, मेधा आणि मधु’, अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. प्रथम मेधवा म्हणजे प्रत्येक कर्म हे साधनेद्वारे यज्ञकर्म होणे अपेक्षित आहे. असे झाल्यासच त्या साधकाची बुद्धी मेधा अवस्था प्राप्त करते. या अवस्थेमुळे तो भगवंताच्या अनुसंधानात रहातो आणि त्याला ‘सत्य काय ?’, हे कळते. त्यामुळे त्याला सर्व वातावरण आणि सृष्टी मधुवत दिसावयास लागते. अशा आनंदमय अवस्थेत तो रहातो. या अवस्थेमध्ये त्याच्याकडून भ्रूणहत्या, वीरहत्या आणि ब्रह्महत्या अशा तीनही हत्यांचे पाप नाहीसे होते. एवढेच नव्हे, तर त्याच्यामध्ये सहस्रो लोकांना पावन करण्याचे सामर्थ्य निर्माण होते.

१५ आ. संत-महंतांनी कुंभमेळ्यात एकत्र येऊन धर्मशास्त्रात आलेल्या अडचणी सोडवणे अपेक्षित असतांनाही सध्या कृतीवीण वाचाळणार्‍यांची संख्या अधिक असणे : धर्मशास्त्रात काही अडचण असली, तर संत-महंतांनी ती कुंभमेळ्यात एकत्र येऊन सोडवणे अपेक्षित असते; मात्र आज सर्व उलटे चाललेले आहे. असे सर्व जण केवळ कृतीवीण वाचाळणारे झाले आहेत. केवळ अशांचीच संख्या अधिक आहे. प्रत्यक्ष कृतीशील संत-महंतांची संख्या अधिक पाहिजे.’

– कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१.२०१९)

किन्नर आखाड्यांचे जुन्या नागा संन्यासी साधूंच्या आखाड्यात विलीनीकरण करणार्‍या नागा साधूंनी किन्नरांविषयी सतर्क रहाणे आवश्यक !

‘सध्या बर्‍याच किन्नरांवर इस्लाम पंथाचा प्रभाव पडलेला असल्याने ते नमाजपठण करतात. त्यांनी ‘इस्लाम शिकवणुकीच्या मार्गावर जाऊ नये’, अशी आखाड्यातील साधू-संतांची अपेक्षा आहे. किन्नरांनी आखाड्यांना ‘आम्हाला तुमच्या आखाड्यात समाविष्ट करून घेतले नाही, तर आम्ही इस्लाम धर्म स्वीकारू’, अशी चेतावणी दिल्यामुळे किन्नर आखाड्यांचे जुन्या नागा संन्यासी साधूंच्या आखाड्यात विलीनीकरण झाले. (वास्तविक ‘आखाडा म्हणजे ठिकठिकाणचे साधू, संन्यासी आणि आचार्य यांचे वर्गीकरण अन् त्यांचे सुसूत्रीकरण यांची व्यवस्था करणे.’ ‘सनातन हिंदु धर्माचे आचरण, उपासना, प्रसार आणि रक्षण’, हे साधूंचे मुख्य कार्य असते. हेच आद्य शंकराचार्यांना अपेक्षित होते.)

अशा परिस्थितीमुळे पुढे किन्नरांचा आखाड्यांमध्ये समावेश झाल्यामुळे ‘ते आखाड्यांच्या नियमांनुसार चालतील कि नाही ?’, हा संभ्रम निर्माण होऊ शकतो. यासाठी नागा साधूंनी सतर्क रहाणे आवश्यक आहे.’

– कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१.२०१९)

प्रयाग म्हणजे प्रयोगात्मक प्रकर्षाने होणारे यज्ञकर्म होय !

‘मनुष्याला भगवंताने दिलेले शरीर हे प्रयोगात्मक आत्मशोधनासाठी दिलेले यंत्र आहे. प्रयाग = प्र + याग. यातील ‘प्र’ म्हणजे प्रकर्षाने आणि ‘याग’ म्हणजे यज्ञ. प्रयाग म्हणजे प्रयोगात्मक (कृतीदर्शक) प्रकर्षाने होणारे, म्हणजे जिज्ञासा, तळमळ आणि चिकाटी यांनी केलेले यज्ञकर्म होय. जे साधना आणि गुरुकृपा यांद्वारे प्राप्त होते, ते यज्ञकर्मच होते. त्यामुळे साहजिकच अशा यज्ञकर्मामुळे हातून घडणारे कर्मही भगवद्सेवा होऊन ते कौशल्यपूर्ण आणि प्रकाशमय होते. अशा कर्माद्वारे भगवत्प्राप्ती सहजसुलभ होतेेे; म्हणूनच श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे,

योगः कर्मसु कौशलम् ।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५०

अर्थ : प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे

विवरण : हातून जे काही कर्म होईल, ते पूर्ण किंवा अपूर्ण रहाणे, याविषयी आणि त्याच्या फलाविषयी समभाव ठेवणे, म्हणजे समत्व ! समत्व हा कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.

येथे कर्मातील द्योतक गंगा आहे. प्रयाग या ठिकाणी गंगेच्या समवेत भक्तीचे द्योतक असलेली यमुना आणि ज्ञानाचे द्योतक असलेली सरस्वती यांचे पावन मिलन आहे. त्यामुळे कर्म हे ज्ञान आणि भक्ती यांनी युक्त होते. अशा प्रयागक्षेत्री केलेल्या स्नानाने पुण्य मिळते, म्हणजेच भक्तांकडून ते यज्ञकर्म होते. हे यज्ञकर्म श्रद्धा, भक्ती आणि भाव यांनी युक्त (कुशलतापूर्वक) झाल्याने पापक्षालन होऊन सच्चिदानंद मिळतो, म्हणजेच भगवत्प्राप्ती होते.

१. गंगा म्हणजे कर्म. कर्म हे व्यक्त आहे. गंगा ही शिवाच्या जटेतून निघालेली चैतन्यमय शक्ती आहे. ती प्रवाहित आहे. ती प्रत्यक्ष कृतीशील असून दिसणारी आहे.

२. यमुना म्हणजे भक्ती (मधुराभक्ती). श्रीकृष्णाने यमुनेवर प्रेम केले; कारण ती भक्तीमय आहे. यमुना नदी काळ्या रंगात प्रवाहित आहे. येथे काळा रंग हा उच्चावस्था (घनता) दर्शक आहे, म्हणजेच यमुना नदी भक्तीचा उच्चांक (मधुरभाव, मधुराभक्ती) दर्शवते. भक्ती ही अव्यक्त स्वरूपात आहे. ती गंगेत मिसळल्यामुळे व्यक्त होते, म्हणजे प्रयोगात्मक आणि कृतीशील होते.

३. सरस्वती म्हणजे ज्ञान. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. ते गुप्त असते. या ज्ञानालाच ‘मेधा’ असे म्हणतात. ज्ञान अव्यक्त आहे. सरस्वती गुप्त स्वरूपातून गंगेशी मिलन पावते आणि पुढे गंगारूपाने व्यक्त होते, म्हणजेच ज्ञान कर्मातून प्रकट होते.

अशा रितीने जेव्हा कर्म हे ज्ञान आणि भक्ती यांनी युक्त होते, तेव्हा ते यज्ञकर्म ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ होते; म्हणून गंगास्नान हे प्रयोगात्मक कृतीदर्शक, म्हणजेच अनुभूतीजन्य आणि पापहारक आहेे.

म्हणूनच गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाला ‘प्रयागक्षेत्र’ हे नाव दिले आहे.’

– कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१.२०१९)

गंगा नदीचे माहात्म्य

१. ‘श्रीमद् आद्यशंकराचार्य यांनी गंगा नदीवर गंगास्तोत्र रचले आहे. त्यात ते म्हणतात,

वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।
अथवा श्‍वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ॥

– श्रीमद् आद्यशंकराचार्यकृत गङ्गास्तोत्र, श्‍लोक ११

अर्थ : हे गंगे, तुझ्यापासून दूर जाऊन कुलीन राजा बनण्यापेक्षा तुझ्या या पाण्यातील कासव अथवा मासा होणे किंवा तुझ्या तिरावर रहाणारा सरपटणारा क्षुद्र प्राणी अथवा दीन-दुबळा चांडाळ होणे, हे कधीही श्रेष्ठ आहे.

२. पंडितराज जगन्नाथ यांनी गंगा नदीवर समस्त जीवमात्रांना उद्धरणारे ‘गंगालहरी’ हे काव्य लिहिले. त्या वेळी त्यांनी एक श्‍लोक पूर्ण केला आणि गंगेचे पाणी वरच्या पायरीवर आले. अशा प्रकारे प्रत्येक श्‍लोकाला गंगा नदी प्रसन्न होऊन तिचे पाणी एकेक पायरी वर वर चढू लागले. शेवटचा बावन्नावा श्‍लोक म्हटल्यानंतर बावन्नावी पायरी चढून गंगेने जगन्नाथ आणि त्याची पत्नी सौ. लवंगी यांना स्वतःच्या पोटात घेतले. त्या वेळी स्वतः जगन्नाथ पंडित तरून गेले. त्यांच्या या गंगालहरी काव्यातून भक्तही तरून जातात.’

– कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF