परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

श्री. राम होनप

‘३.३.२०१९ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सायंकाळी ५.२२ मिनिटांनी देहत्याग केला. त्यानंतर देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

सायंकाळी ५.४० : परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लिंगदेह पांढर्‍या रंगाच्या गोळ्याच्या स्वरूपात दिसत होता. त्यांच्या देहत्यागानंतर रॉकेट आकाशात झेपावतांना दिसते त्याहून अधिक वेगाने ते सत्यलोकात पोहोचल्याचे दिसले. ही प्रक्रिया होत असतांना त्यांच्याद्वारे पांढर्‍या रंगाचे चैतन्याचे तरंग बाहेर पडत होते. या दैवी तरंगांचा आध्यात्मिक लाभ पृथ्वीवरील साधना करणार्‍या अनेक जिवांना झाला.

सायंकाळी ५.५२ : परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लिंगदेह सत्यलोकात काही क्षण अस्थिर दिसत होता; कारण त्यांच्या चित्तातील पृथ्वीवरील काही स्मृती जागृत होत्या. जेव्हा या स्मृती लोप पावतात किंवा अव्यक्त होतात, तेव्हा लिंगदेह स्थिर दिसतो. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य १ – २ संतांविषयीचे स्मरण चालू होते.

सायंकाळी ६ : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी संपूर्ण ब्रह्मांडाचे (ग्रह, तारे, नक्षत्रे इत्यादींचे) अवलोकन, म्हणजे निरीक्षण केले. तेव्हा त्यांना ‘संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वरूप कसे आहे ?’, या विषयीचे प्रत्यक्ष ज्ञान झाले.

सायंकाळी ६.०१ : परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्रासंबंधीच्या धर्मकार्यासाठी पृथ्वीवर परत जन्म घेण्याचा विचार आला; पण हा विचार क्षणार्धात विरून गेला. त्यानंतर त्यांची चित्तवृत्ती स्थिर झाली आणि ते शांतीची अनुभूती घेऊ लागले. त्यानंतर त्यांचा लिंगदेह स्थिर झालेला दिसला.

सायंकाळी ६.०२ : परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लिंगदेह पांढर्‍या आणि फिकट गुलाबी रंगाचा दिसत होता. पांढरा रंग हा निर्गुण तत्त्वाशी संबंधित असून गुलाबी रंग हा त्यांच्यातील समष्टीविषयी असलेल्या प्रीतीचे दर्शक आहे.

देहत्यागानंतरची परात्पर गुरु पांडे महाराज यांची गती ही तपोलोकात निर्धारित होती; परंतु त्यांचे धर्मकार्याविषयीचे आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचे समर्पण यांमुळे त्यांना सत्यलोकात स्थान प्राप्त झाले. सूक्ष्म परीक्षणानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रती माझी आपोआप कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०१९)

 सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now