महिलांनो, साधना आणि धर्माचरण करून, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थाने सबला व्हा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

कल्याण येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखेचा’ वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सौ. नयना भगत आणि वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

कल्याण, ४ मार्च (वार्ता.) – आज हिंदु धर्मियांवर लव्ह जिहाद, लोकसंख्या जिहाद, लॅण्ड जिहाद, चित्रपट जिहाद यांसारखे विविध प्रकारचे जिहाद आसपास घडत आहेत, याचे गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवे. मागील काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ‘लव्ह जिहाद’ नामक षड्यंत्र समाजात मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. या माध्यमातून हिंदू मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांच्याशी निकाह करून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे, आतंकवादी कारवायांसाठी त्यांचा उपयोग करणे यांसारखे अनेक प्रकार आज उघडकीस आले आहेत. हिंदु महिलांनी धर्माचरण केल्यास अशा प्रकारांना त्या बळी पडणार नाहीत. यासाठी राजमाता जिजाऊ, अहल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घ्या आणि नियमित साधना अन् आत्मरक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थाने सक्षम व्हा, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत यांनी केले. कल्याण (पश्‍चिम) येथील टिळक चौकातील बालकमंदिर शाळेच्या सभागृहात ३ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वर्धापनदिन सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शंखनाद झाल्यानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

घरातील स्त्रीने धर्माचरण केल्यास त्याचा लाभ कुटुंबाला होईल ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, हिंदु जनजागृती समिती

स्वरक्षणासह रणरागिणीला भगवंताचे अधिष्ठान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज महिला हीच आपल्या कुटुंबाला संस्कारक्षम बनवू शकते. महिलाच संस्कारहीन झाली, तर ती पुढच्या पिढीला काय संस्कार देणार ? घरातल्या स्त्रीने धर्माचरण केल्यास त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल. स्वातंत्रपूर्वकाळातही अनेक रणरागिणींनी प्राणांचे बलीदान दिले, तेव्हा कुठे हे स्वातंत्र मिळाले ! हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर होणारे आघात रोखणे ही आपली साधनाच आहे. यासाठी रणरागिणी शाखेच्या कार्यात सहभागी व्हा !

क्षणचित्रे

१. लव्ह जिहादला हिंदू तरुणी कशा प्रकारे बळी पडत आहेत, याची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

२. उपस्थित महिलांनी उभे राहून हात उंचावत वज्रमूठ करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा केली.

३. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF