राज्यात ‘वैद्यकीय आस्थापना कायदा’ लागू करण्याची हिंदु जनजागृती समितीची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कायदा करण्याच्या प्रकरणात लक्ष घालतो !  आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

असा कायदा केंद्रसरकारने स्वतःहून संपूर्ण देशभरातच करणे अपेक्षित आहे !

डावीकडून श्री. सतीश सोनार, आमदार श्री. सुरेश गोरे आणि श्री. अजय संभूस

मुंबई, ४ मार्च (वार्ता.)  रुग्णांची होणारी लुटमार थांबवण्यासाठी, तसेच गरीब रुग्णांना परवडणारे आणि स्वस्तातील उपचार मिळावेत; म्हणून केंद्रशासनाने ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ संमत केला होता. तो लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार देशातील कर्नाटक, राजस्थान यांसह अनेक राज्यांनी हा कायदा लागू केला आहे.

त्याप्रमाणे महाराष्ट्राने राज्यात हा कायदा लागू करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने आरोग्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावर आरोग्यमंत्री म्हणाले, ‘‘हा महत्त्वाचा आणि चांगला विषय आहे. मी या विषयात लक्ष घालतो.’’

विधान भवनात समितीचे श्री. सतीश सोनार, श्री. अजय संभूस आणि समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वरील विषयाचे निवेदन दिले.

याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील आमदार श्री. सुरेश गोरे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील आमदार श्री. प्रकाश आबिटकर यांनाही निवेदन देण्यात आले. त्यावर आमदार श्री. सुरेश गोरे आणि आमदार श्री. प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘याविषयी आम्ही आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. विधीमंडळातही हा विषय मांडू.’’

गेली तीन वर्षे हिंदु जनजागृती समितीने वरील मागणी सतत लावून धरली आहे. या विषयावर आंदोलन केले आहे. अनेक आमदारांना विधीमंडळात मांडण्यासाठी हा विषय दिला आहे. आमदारांनीही हा विषय विधीमंडळात मांडला आहे; मात्र हा कायदा अद्याप लागू करण्याचा निर्णय झालेला नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now