साधकांवरील महामृत्यूयोगाचे संकट दूर होण्यासाठी महर्षि भृगु यांच्या आज्ञेने १३.१.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या महामृत्युंजय यागाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१३.१.२०१९ या दिवशी महर्षि भृगु यांनी नाडीपट्टीच्या माध्यमातून दिलेल्या आदेशानुसार सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर आठवले, संत आणि समस्त साधक यांच्यावरील अपमृत्यूचे संकट टळण्यासाठी महामृत्युंजय याग करण्यात आला. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सनातनचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझे अन् अन्य साधक यांनी मिळून हा याग केला. या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

महामृत्युंजय यागाच्या वेळी यज्ञस्थळी सनातनच्या साधक-पुरोहितांनी केलेली देवतांची भावपूर्ण पूजा

१. काळ्या तिळांकडे सर्व प्रकारची विघ्ने, दोष आणि पाप आकृष्ट झाल्याने समस्त बाधा, पाप अन् दोष नष्ट होणे : शिवाला तुपात भिजवलेल्या काळ्या तिळांची आहुती देण्यात आली. काळ्या तिळांकडे सर्व प्रकारची विघ्ने, दोष आणि पाप आकृष्ट झाल्याने यज्ञात काळ्या तिळांची आहुती दिली. त्यामुळे साधकांच्या जीवनातील समस्त बाधा, पाप आणि दोष नष्ट झाले.

२. काळे तीळ शिवाला प्रिय असल्याने यज्ञात काळ्या तिळांची आहुती दिल्यावर शिवाने तिळाची आहुती ग्रहण करणे : काळे तीळ शिवाला प्रिय असल्याने यज्ञात काळ्या तिळांची आहुती दिल्यावर शिवाने तिळाची आहुती ग्रहण केल्याचे जाणवले. शिवाने आहुती ग्रहण केल्यावर तीळ तडतडण्याचा आवाज येत नव्हता.

कु. मधुरा भोसले

३. यज्ञ चालू असतांना यज्ञकुंडातील अग्नी मंद होऊन विझण्यामागील आध्यात्मिक कारण : यज्ञ चालू असतांना यज्ञकुंडातील अग्नी मंद होऊन विझत होता. साधकांची व्यष्टी आणि समष्टी स्तरावरील पापे, वाईट शक्तींची आक्रमणे, विविध प्रकारच्या पीडा आणि अपमृत्यूचे संकट हे सूक्ष्मातून यज्ञातील अग्नीकडे खेचले जाऊन त्यांची यज्ञात आहुती पडत होती. या सर्वांना भक्षण करतांना अग्नीची शक्ती व्यय झाल्याने यज्ञकुंडातील अग्नी विझत होता. हे एकप्रकारे यज्ञातील विघ्न होते. त्यामुळे अग्नी परत परत प्रज्वलित करावा लागत होता.

४. यज्ञातील लाकडाच्या मोठमोठ्या समिधांकडे पाहिल्यावर त्या चितेतील प्राणी आणि मनुष्य यांच्या अस्थींप्रमाणे दिसणे : यज्ञातील लाकडाच्या मोठमोठ्या समिधांकडे पाहिल्यावर त्या चितेतील प्राणी आणि मनुष्य यांच्या अस्थींप्रमाणे दिसत होत्या. साधकांवर प्राणी आणि मनुष्य यांच्या रूपाने सूक्ष्मातून आक्रमणे करणार्‍या मायावी वाईट शक्ती यज्ञज्वालेत जळून नष्ट झाल्यामुळे यज्ञकुंडातील समिधा अस्थींप्रमाणे दिसत होत्या.

५. काळ्या तिळाच्या आहुत्यांकडे साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींची त्रासदायक शक्ती खेचली जाणे : यज्ञकुंडात दिल्या जाणार्‍या काळ्या तिळाच्या आहुत्यांकडेे साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींची त्रासदायक शक्ती खेचली गेल्याने त्यांची त्रासदायक शक्ती न्यून झाली.

६. यज्ञाच्या माध्यमातून शिवाच्या मारक शक्तीचे वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध होणे : महामृत्युंजय यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या शिवाच्या मारक शक्तीचा आघात यज्ञस्थळी आणि वातावरणात सूक्ष्मातून उपस्थित असणार्‍या वाईट शक्तींवर होऊन त्यांची मायावी रूपे नष्ट होत होती आणि त्यांच्या मूळ रूपाची शक्ती क्षीण होत होती. त्यामुळे यज्ञस्थळी उपस्थित असणार्‍या एका साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला तीव्र त्रास झाला.

७. काळरूपी समुद्राला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा दैवी स्पर्श झाल्यावर त्याची तीव्रता उणावणे आणि त्यामुळे समुद्राचा काळसरपणा न्यून होऊन तो जांभळ्या रंगाचा दिसणे : यज्ञ चालू असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पाठीमागे समुद्राचे अस्तित्व जाणवू लागले आणि थोड्या वेळाने काळ्या रंगाच्या समुद्राच्या लाटांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाठीमागून स्पर्श केले. त्यांना स्पर्श केल्यावर समुद्राच्या पाण्याचा रंग जांभळा झाला. आपत्काळात समुद्राच्या रौद्ररूपापासून, म्हणजे समुद्री आपत्तीपासून भगवान शिवच साधकांचे रक्षण करणार आहेत, याची ही अनुभूती होती. काळरूपी समुद्राला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा दैवी स्पर्श झाल्यावर त्याची तीव्रता उणावली. त्यामुळे समुद्राचा काळसरपणा न्यून होऊन तो जांभळ्या रंगाचा दिसला.

८. ‘प्रथम काळ्या रंगाची सप्तद्वारे उघडलेली दिसणे, त्यानंतर अंधार आणि प्रकाश यांमध्ये सूक्ष्म युद्ध झाल्याचे जाणवणे अन् त्यानंतर सोनेरी रंगाची सप्तद्वारे उघडलेली दिसणे’, याचा आध्यात्मिक भावार्थ : प्रथम काळ्या रंगाची सप्तद्वारे उघडलेली दिसली. त्यानंतर अंधार आणि प्रकाश यांमध्ये सूक्ष्म युद्ध झाल्याचे जाणवले. त्यानंतर सोनेरी रंगाची सप्तद्वारे उघडलेली दिसली. काळ्या रंगाचे पहिले दार हे यमपुरीचे प्रवेशद्वार होते आणि उर्वरित काळ्या रंगाची द्वारे ही नरकातील दारे होती. अंधार आणि प्रकाश यांमध्ये सूक्ष्म युद्ध होणे म्हणजे अंधाररूपी मृत्यू अन् प्रकाशरूपी जीवन यांच्यामध्ये सूक्ष्म युद्ध झाले. साधकांवरील अपमृत्यूचे संकट नष्ट करण्यासाठी यमदेव आणि शिव यांच्यामध्ये सूक्ष्म युद्ध झाले अन् शेवटी शिव जिंकला. त्यामुळे सर्वत्र प्रकाश पसरलेला दिसला आणि साधकांना आध्यात्मिक उन्नती करून प्राप्त होणार्‍या विविध प्रकारच्या मुक्तींचे प्रतीक असणार्‍या सोनेरी रंगाच्या दारांचे दर्शन झाले. ‘ही सोनेरी दारे वैकुंठातील असून साधकाला सलोक (देवलोकात जन्म मिळणे), सार्ष्टी (देवासारखे ऐश्‍वर्य मिळणे), समीप (देवाच्या जवळ जन्म मिळणे), सरूप (देवासारखे रूप मिळणे), आणि सायुज्य (देवाशी एकरूप होणे) या मुक्ती मिळाल्यावर तो टप्प्याटप्प्याने एकेका सोनेरी दारातून पुढे जाऊन शेवटी शेषशायी श्रीविष्णूमध्ये विलीन होणार आहे’, असे देवाने मला सांगितले.

९. शिवाच्या पांढर्‍या मूर्तीमध्ये शिवाचे सगुण, बाणलिंगामध्ये निर्गुण आणि यज्ञामध्ये सगुण-निर्गुण ही तत्त्वे कार्यरत होणे : पूजनाच्या ठिकाणी ठेवलेल्या शिवाच्या पांढर्‍या मूर्तीमध्ये शिवाचे सगुण, बाणलिंगामध्ये निर्गुण आणि यज्ञामध्ये सगुण-निर्गुण ही तत्त्वे कार्यरत होती. त्यामुळे साधकांना शिवाच्या पांढर्‍या मूर्तीकडे पहातांना भाव, यज्ञाकडे पहातांना शक्ती आणि आनंद, तसेच बाणलिंगाकडे पहातांना शांती यांची अनुभूती आली.

१०. सनातनचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझे यांनी शिवाची १०८ नावे उच्चारल्यावर झालेली सूक्ष्म प्रक्रिया : जेव्हा सनातनचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझे यांनी शिवाची १०८ नावे उच्चारली, तेव्हा यज्ञस्थळी शिवाची १०८ रूपे प्रगट झाली आणि त्यांची शक्ती यज्ञाला उपस्थित असणारे साधक आणि संत यांच्या देहांतील १०८ नाड्यांमध्ये कार्यरत झाली. त्यामुळे साधकांना शिवकवच प्राप्त झाले आणि त्यांचे अपमृत्यूच्या संकटापासून रक्षण झाले.

११. यज्ञज्वालेमध्ये हलाहल विष प्राशन करणार्‍या मृत्युंजय महादेवाचे रूप प्रकट होणे आणि त्याने यज्ञज्वाळेकडे आकृष्ट झालेला काळ्या धुराचा प्रचंड मोठा प्रवाह गिळून टाकणे अन् त्यामुळे साधकांवर असणारे विविध प्रकारच्या अपमृत्यूंचे संकट दूर होणे : साधक स्वतःवरील अपमृत्यूचे संकट नष्ट होण्यासाठी शिवाला प्रार्थना करत होते. तेव्हा साधकांची सप्तचक्रे, नवद्वारे, विविध इंद्रिये आणि सूक्ष्म देह यांच्यामध्ये साठलेली काळी शक्ती काळ्या धुराच्या रूपाने यज्ञकुंडाकडे खेचली गेली. यज्ञज्वालेमध्ये हलाहल विष प्राशन करणार्‍या मृत्युंजय महादेवाचे रूप प्रकट झाले आणि त्याने यज्ञज्वाळेकडे आकृष्ट झालेल्या काळ्या धुराचा प्रचंड मोठा प्रवाह गिळून टाकला. त्यामुळे साधकांवर असणारे विविध प्रकारच्या अपमृत्यूचे संकट दूर झाले.

१२. काळ्या तिळांच्या तडतडण्याचा आवाज मोठ्याने येण्याचे कारण : काळ्या तिळांकडे आकृष्ट झालेली बाधा यज्ञातील शिवलहरींनी नष्ट केल्यावर काळ्या तिळांच्या तडतडण्याचा आवाज मोठ्याने येत होता.

१३. यज्ञामध्ये कार्यरत असणार्‍या शिवतत्त्वाच्या स्तरानुसार यज्ञज्वाला आणि धूर यांच्यावर झालेला परिणाम : यज्ञाच्या आरंभी सगुण शिवतत्त्व कार्यरत झाल्यामुळे यज्ञज्वाला मोठ्या होत्या आणि धगधगत होत्या अन् त्यांतून धूरही पुष्कळ होता. यज्ञाच्या शेवटी निर्गुण शिवतत्त्व कार्यरत झाल्यामुळे यज्ञज्वाला लहान आणि शांत होत्या अन् धूरही विरळ होता.

१४. यज्ञस्थळी एक संत आल्यामुळे यज्ञामध्ये शिवाचे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाले आणि साधकांना शिवाच्या निर्गुण तत्त्वाचा अधिक लाभ झाला.

१५. एका संतांचे शुभागमन झाल्यावर यज्ञभूमीचे कैलासामध्ये रूपांतर होणे : यज्ञस्थळी एका संतांचे शुभागमन झाले, तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यज्ञभूमीचे सूक्ष्मातून कैलासात रूपांतर झाले आणि सर्वत्र बर्फाने आच्छादलेली भूमी सूक्ष्मातून दिसू लागली. तेव्हा वातावरणात कापराचा सुगंध दरवळत होता.

१६. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी मृत्युंजय महादेवाला साधकांचे अपमृत्यूच्या संकटापासून रक्षण होण्यासाठी प्रार्थना केल्यावर वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी शिवाने साधकांना आशीर्वाद देऊन त्यांना शिवकवच आणि शिवकुंडले दिल्याचे जाणवले : विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी मृत्युंजय महादेवाला साधकांचे अपमृत्यूच्या संकटापासून रक्षण होण्यासाठी प्रार्थना केल्यावर शिव प्रसन्न झाला आणि त्याने संपूर्ण विश्‍वातील साधकांवर कृपा करून त्यांच्यावरील अपमृत्यूचे संकट दूर सारले, तसेच साधकांना शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्याचा कृपाशीर्वादही दिला. वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी शिवाने साधकांना आशीर्वाद देऊन त्यांना शिवकवच आणि शिवकुंडले दिल्याचे जाणवले. शिवकवचामुळे तेजतत्त्व, शिवकुंडलांमुळे (शिवाने दिलेल्या कुंडलांना ‘शिवकुंडले’, असे संबोधले आहे.) वायूतत्त्व आणि शिवकृपेमुळे आकाशतत्त्व यांच्या स्तरावरील चैतन्य साधकांना मिळाल्याने त्या त्या तत्त्वाच्या स्तरावरील वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून साधकांचे रक्षण होणार आहे.

१७. हरिहरांनी एकमेकांचा सन्मान करून एकमेकांशी एकरूप होणे : विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी मृत्युंजय महादेवाला पांढर्‍या कमळांची आणि शिवाने परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना निळ्या कमळांची माळ घातली. तेव्हा दोघांनाही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले आणि दोघेही एकमेकात विलीन झाले. तेव्हा ‘हरिहर नाही भेदाभेद, ते असतील एकरूप’, ही ओळ माझ्या मनात आली. (अशी अनुभूती साधकांना त्यांच्या भावामुळे येते. – संकलक)

१८. पूर्णाहुतीच्या वेळी साधकांना त्रास देणार्‍या पाताळातील काळ्या नागांची सूक्ष्मातून यज्ञकुंडात आहुती पडणे : पूर्णाहुतीच्या वेळी साधकांना त्रास देणार्‍या पाताळातील काळ्या नागांची सूक्ष्मातून यज्ञकुंडात आहुती पडली. त्यामुळे विषबाधा आणि नागबंधन यांपासून साधकांचे रक्षण झाले.

१९. शिवाच्या अंगावरील ९ नागांतून प्रकट झालेल्या नवनाथांनी साधकांना आध्यात्मिक उत्कर्षाचा आशीर्वाद देणे : पूर्णाहुतीच्या वेळी शिवतत्त्व पूर्णपणे प्रकट झाले. तेव्हा शिवाने देहावर धारण केलेले पिवळ्या रंगाचे ९ नाग डोलत होते. त्यांच्या नेत्रांतून प्रकाश बाहेर पडला आणि त्यांतून नवनाथांची निर्मिती झाली. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी नवनाथांना नमस्कार केल्यावर नवनाथांनी ‘साधक, धर्माभिमानी, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, तसेच संलग्न संस्था यांचा आध्यात्मिक उत्कर्ष होऊ दे’, असा कृपाशीर्वाद दिला.

२०. शिवाची आरती चालू असतांना आश्रमाच्या शेजारील रस्त्यावरून स्थुलातून एक बैल चालत जाणे आणि बैलाच्या रूपाने नंदीनेच साधकांना आशीर्वाद दिल्याचे जाणवणे : यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या शिवाची आरती करत असतांना सनातनचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझे यांनी नंदीचे स्मरण केले. तेव्हा आश्रमाच्या शेजारील रस्त्यावरून स्थुलातून एक बैल चालत गेला. तेव्हा ‘बैलाच्या रूपाने नंदीनेच साधकांना आशीर्वाद दिला आहे’, असे जाणवले.

कृतज्ञता : ‘भोलेनाथ भगवान शिव, तुम्ही आम्हा साधकांवर भरभरून कृपा करून आम्हाला आध्यात्मिक उन्नतीचा आशीर्वाद दिला, आमचे अपमृत्यूचे संकट दूर केले आणि वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी आम्हाला शिवकवच अन् शिवकुंडले दिलीत. यासाठी आम्ही सर्व साधक आपल्या पावन चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०१९)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF