भगवान शिवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

उत्तम गुरुसेवक

शंकराची महाविष्णूवर फार श्रद्धा आहे. त्याने महाविष्णूच्या पायाखालची गंगा आपल्या मस्तकी धारण केली आहे.

महातपस्वी आणि महायोगी

सतत नामजप करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो. पुष्कळ तप केल्याने वाढलेले तापमान न्यून करण्यासाठी गंगा, चंद्र, साप यांसारख्या थंडावा देणार्‍या वस्तूंचा शिव वापर करतो, तसेच हिमाच्छादित कैलास पर्वतावर रहातो.

क्रोधी

स्वतः करत असलेले अखंड नामस्मरण शिवाने स्वतःच थांबवल्यास त्याचा स्वभाव शांतच असतो; मात्र नामस्मरणात कोणी विघ्न आणल्यास (उदा. मदनाने विघ्न आणले तसे), साधनेमुळे वाढलेले तेज तत्क्षणी (एकदम) बाहेर पडते आणि ते समोरच्या व्यक्तीला सहन न झाल्याने तिचा नाश होतो. यालाच ‘तिसरा डोळा उघडून भस्मसात केले’, असे म्हणतात. त्रास देणार्‍याला १०० टक्के त्रास झाला, तर शिवाला केवळ ०.०१ टक्के एवढाच त्रास होतो. त्या त्रासाने शिवाचा नाडीबंध सुटतो; पण आसन मात्र सुटत नाही. मग शिव पुन्हा बंध लावतो.

भुतांचा स्वामी

शिव हा भुतांचा स्वामी असल्याने शिवोपासकांस भूतबाधा बहुधा होत नाही.

देव आणि दानव दोघेही उपासक असलेला

क्षुद्रदेवता, कनिष्ठ देवता, स्वर्गलोकातील काही देवता, तसेच स्वतः श्रीविष्णु हे शिवाचे उपासक आहेत. (शिव हा श्रीविष्णूचा उपासक आहे.) केवळ देवच नाही, तर दानवही शिवाचे उपासक आहेत, हे शिवाचे वैशिष्ट्य आहे. बाणासुर, रावण इत्यादी दानवांनी श्रीविष्णूचे तप केले नाही किंवा श्रीविष्णूनेही कोणा दानवाला वर दिला नाही; पण त्यांनी शिवाची उपासना केली आणि शिवाने त्यांना वर दिला. त्याचा त्रास बर्‍याचदा त्याला अन् इतर देवांना झालेला आहे. श्रीविष्णूने प्रत्येक वेळी त्यातून मार्ग काढला आहे.

वैरागी

विषयभोगाची सामग्री जवळ असूनही चित्त अविकारी असणारा कूटस्थ ! पार्वती मांडीवर असतांनाही शिव निर्विकार असतो. त्याला कामवासना स्पर्शत नाही. तोच जितेंद्रिय होय.

दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिद्ध असलेला

समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष जगाला जाळीत होते. कोणताही देव त्याचा स्वीकार करण्यास पुढे येईना. शिवाने हालाहल प्राशन करून जगाला विनाशापासून वाचवले. विषप्राशनामुळे त्याचा कंठ काळा-निळा झाला आणि त्याला ‘नीलकंठ’ असे नाव मिळाले.

सहज प्रसन्न होणारा (आशुतोष) आणि प्रसन्न झाल्यावर काहीही देणारा

एकदा प्रसन्न होऊन शिवाने रावणाला आत्मलिंगही (आत्मा) दिले. (ते आत्मलिंग घेऊन रावणाला स्वतः शिव बनायचे होते.)

महाकालीचा आवेग शांत करणारा

‘दैत्यसंहार करतांना महाकाली सुसाट वादळासारखी भयंकर झाली. तिला आवरणे असंभव झाले. शंकराने प्रेतरूप घेतले. तिच्या कालनृत्याच्या वाटेत शिवाचे शव पडले. राक्षसांची प्रेते तुडवत ती कालरात्री शंकराच्या शवावर आली. शवाचा स्पर्श होताच तिच्या नृत्याचे भयंकर वादळ शांत झाले. हेच ते शिवत्व ! तेच परमतत्त्व !!’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

शिव उपासनेतील  भस्म

१. व्युत्पत्ती

‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे). ज्यामुळे आपली पापे नाश पावतात आणि आपल्याला ईश्‍वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.

२. व्याख्या

कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.

३. अर्थ

भस्म लावणे, याचा सांकेतिक अर्थ म्हणजे ‘दुष्कृत्यांचा नाश होणे’ आणि ‘ईश्‍वराची आळवणी करणे’ होय.

४. भस्माचे महत्त्व

भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्‍वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते.

४ अ. भस्माचा टिळा शिवभक्तीचे प्रतीक असणे : भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.

५. भस्म लावण्याचा उद्देश

आम्हाला आमचे देहतादात्म्य सोडून या जन्ममरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे आहे, याची आठवण म्हणून.

६. भस्माचा वापर

अ. भस्म हे सर्वसाधारणपणे कपाळावर लावतात. काही जण दंड आणि छाती इत्यादी भागांवरही लावतात. काही तपस्वी सर्वांगाला भस्म लावतात.

अ १. भस्म कपाळाला लावतांना पाळावयाचा दंडक : उपनिषदे एक दंडक पाळायला सांगतात, ‘भस्म कपाळाला लावतांना ‘महामृत्यूंजय मंत्रा’चा जप करावा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ॥ – ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२

अर्थ : कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.

आ. बरेच जण प्रत्येक वेळी चिमूटभर भस्मच वापरतात.

इ. पूजा म्हणून देवाला राखेने अभिषेक घालतात. त्या भगवत् स्पर्शाने पवित्र झालेली राख भस्म म्हणून वाटतात.

७. भस्मातील औषधी गुण

भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात. शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.

८. ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्‍वत

लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे ‘सत्य’ विद्यमान रहाते. – स्वामिनी विमलानंद

भस्माची शिकवण

१. मनुष्याने आपली आहुती देऊन भस्म होणे, म्हणजे आपल्या इच्छा-आकांक्षा, दोष, अज्ञान अन् अहं यांचा त्याग करणे आणि मनाची शुद्धता प्राप्त करणे

२. मानवी देह नश्‍वर असल्याने मरणानंतर देहाची जळून राख होणार आहे. त्यामुळे देहासक्ती बाळगू नये. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो. महत्प्रयासाने मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी आणि आपला प्रत्येक क्षण पवित्र अन् आनंददायी करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे भस्म सूचित करते. अर्थात यांतून साधनेचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखित होते.

शिवाचे कार्य

१. विश्‍वाची उत्पत्ती

‘शिव-पार्वतीला ‘जगतः पितरौ’, म्हणजे जगाचे आई-वडील म्हटले जाते. विश्‍वाच्या संहाराच्या वेळीच नवनिर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण शिव निर्माण करतो.

२. जगद्गुरु

‘ज्ञानं महेश्‍वरात् इच्छेत् मोक्षम् इच्छेत् जनार्दनात् ।’, म्हणजे शिवापासून ज्ञानाची आणि जनार्दनापासून (श्रीविष्णूपासून) मोक्षाची इच्छा करावी.

३. स्वतः साधना करून सर्वांची उत्तरोत्तर प्रगती करून घेणारा

शिव उत्तर दिशेला असलेल्या कैलास पर्वतावर ध्यान करतो आणि सर्व जगावर लक्ष ठेवतो. तो स्वतः साधना करून सर्वांची उत्तरोत्तर प्रगती करून घेतो.

४. कामदेवाचे दहन करणारा, अर्थात चित्तातील कामादी दोष नष्ट करणारा

एखाद्या चार-पाच वर्षांच्या मुलाने मोठ्या माणसाशी लढण्याचा प्रयत्न करण्याहून वासनांशी लढणे पुष्कळ कठीण आहे. कामदेवाला शिवानेच जाळले. यावरून शिवाचे सामर्थ्य आणि अधिकार लक्षात येतो.

५. आज्ञाचक्राचा अधिपती

आपल्या शरिरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा ही षट्चक्रे आहेत. कुंडलिनीशक्तीचा प्रवास या चक्रांतून झाल्यावर ती सहस्रारचक्रात प्रवेश करते. ही चक्रे विविध देवतांशी संबंधित आहेत, उदा. मूलाधारचक्र श्री गणपतीशी आणि स्वाधिष्ठानचक्र दत्ताशी संबंधित आहे. थोडक्यात ती ती देवता त्या त्या चक्राची अधिपती आहे.

शिव आज्ञाचक्राचा अधिपती आहे. शिव आदिगुरु आहे. गुरुसेवेत असलेल्या शिष्याचा ‘आज्ञापालन’ हा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. अशा दृष्टीने आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेले शिवाचे स्थान हे शिवाच्या गुरुत्वाचीच साक्ष देते. शिवाचा तृतीय नेत्र (ज्ञानचक्षू) असण्याचे स्थानही तेच आहे.

६. मृत्युंजय

महादेवाला ‘सोमदेव’ असेही म्हणतात. दक्षिण दिशेचा स्वामी यम. ही मृत्यूची देवता आहे, तर सोम (शिव) हा मृत्युंजय असून उत्तर दिशेचा स्वामी आहे. शंकराची पिंडीही नेहमी उत्तरेलाच ठेवतात. यम स्मशानातील स्वामी, तर स्मशानात राहून रुंडमाला धारण करणारा आणि ध्यानधारणा करणारा देव म्हणजे शिव. जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन र्ईश्‍वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

शिवमंदिराची वैशिष्ट्ये

१. शिव हा दांपत्यांचा देव ! ‘शक्त्यासहितः शंभुः ।’ असा आहे. शक्ती नसेल, तर शिवाचे शव होते. इतर देव एकटे असतात; म्हणून त्यांच्या मूर्तींत अल्प ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या देवळात थंडावा वाटतो, तर शिवाच्या देवालयात अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्याने शक्ती जाणवते.

२. शिव ही लयाची देवता आहे. त्यामुळे शिवाच्या जोडीला इतर देवतांची आवश्यकता नसते; म्हणून शिवाच्या देवळात इतर देवता नसतात. काही ठिकाणी देवळाच्या व्यवस्थापन समितीने भाविकांना एकाच वेळी विविध देवतांच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या हेतूने किंवा अन्य कारणास्तव शिवाच्या जोडीला अन्य देवतांची स्थापनाही शिवालयात केलेली आढळते.

३. शिवाची पूजा ब्राह्मणाने मोडायची नसते, म्हणजे निर्माल्य काढायचे नसते; म्हणून शिवाच्या देवळात गुरव असतात आणि पार्वतीच्या देवळात भोपे असतात. शिवपिंडीवरील निर्माल्य काढत नाहीत.

४. ब्राह्मण शिवपिंडीला वैदिक मंत्रांनी अभिषेक करतात; परंतु त्याच्या नैवेद्याचा स्वीकार मात्र करत नाहीत. पूजा करणारे ब्राह्मण पिंडदान विधीही करत नाहीत.

शिवाचा तिसरा डोळा !

१. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्त शक्तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्तीचे महापीठ आहे. यालाच ज्योतिर्मठ, व्यासपीठ इत्यादी नावे आहेत.

२. शिवाचा तिसरा डोळा हा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शिवाच्या चित्रातही तिसर्‍या डोळ्याचा आकार ज्योतीसारखा आहे.

३. शिवाने तिसर्‍या डोळ्याने कामदहन केले आहे.

(खर्‍या ज्ञानवंतावर झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात. एवढेच नाही, तर खरा ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाग्नीने कामनांना जाळून टाकतो.)

४. योगशास्त्रानुसार तिसरा डोळा म्हणजे सुषुम्ना नाडी.

५. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो.


Multi Language |Offline reading | PDF