नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील पेशवाईतील (शोभायात्रेतील) विदारक अनुभव आणि आखाड्यांची दुःस्थिती !

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर येथे वर्ष २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडला. भगवंताच्या कृपेने तो मला जवळून अनुभवता आला. कुंभमेळ्यात अनेक साधू-महंत, त्यांचे आखाडे, त्यांच्या कार्यपद्धती आणि त्यांचे कार्य कसे चालते, ते शिकता आले. काही दांभिकतेविषयी तिरस्कार असणारे आणि नि:स्पृह साधूही पहाता आले. अर्थात् ‘त्यांची संख्या पुष्कळच अल्प आहे’, हेही लक्षात आले.

कुंभमेळ्याच्या प्रारंभी पेशवाईचे आयोजन केले जाते. पेशवाई म्हणजे आखाड्यातील देवतांना मंडपात स्थानापन्न करण्यासाठी घेऊन जात असतांना काढलेली शोभायात्रा. या शोभायात्रेत संबंधित आखाड्याचे मुख्य महंत, त्यांचे भक्त आणि अनुयायी सहभागी होत असतात. असे सहस्रो लोक या शोभायात्रेत सहभागी होतात. राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रक्षेपित होणारे कार्यक्रम, विदेशी पर्यटक आणि भारतभरातून आलेले हिंदू हा सोहळा पहातात. या निमित्ताने संबंधित आखाड्याचे ऐश्‍वर्य आणि साधूंचे वागणे समाजासमोर येत असते. कुंभमेळ्याच्या वेळी त्र्यंबकेश्‍वर येथे १० आखाडे येतात. या प्रत्येक आखाड्याची पेशवाई, म्हणजे शोभायात्रा वेगवेगळ्या दिवशी निघते. यातील केवळ एका शोभायात्रेतील हे अनुभव आहेत. हिंदु धर्माचा पाया असणार्‍या अध्यात्मातील एका भव्य सोहळ्याची, म्हणजे कुंभमेळ्याची किती विदारक स्थिती आहे, हे समाजासमोर यावे, हाच या लेखाचा उद्देश आहे. कुंभमेळा ही हिंदूंंची महान परंपरा आहे; पण कलियुगातील रज-तमाच्या वातावरणाने त्यावर कसे सावट आणले आहे, त्याचा हा अल्पसा लेखाजोखा !

१. शोभायात्रेत कंत्राटदारांद्वारे आखाड्याचा रथ सिद्ध करून दिखावा केलेला असणे आणि त्याद्वारे आध्यात्मिक वातावरणाची वानवा अनुभवायला मिळणे

पेशवाईच्या निमित्ताने वारंवार एका आखाड्यात जाणे झाले. या शोभायात्रेत आखाड्याच्या महाराजांना सहभागी होण्यासाठी एकूण २० रथ बनवले होते. रथ म्हणजे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर भव्य सजावट करून त्यावर सिंहासन ठेवलेले असते. ट्रॅक्टरच्या मागे आणि पुढे त्या रथात बसणार्‍या महाराजांचे नाव आणि छायाचित्र लावलेले असते. हे सर्व रथ कंत्राटदारांद्वारे बनवण्यात आले होते आणि ते सर्व भाड्याचे होते. त्यावर फुलांचा वारेमाप वापर करण्यात आला होता. दुर्दैवाने रथात महाराज होते; पण त्यांच्यासमोर चालायला त्यांचे भक्त आणि अनुयायी हे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते. ही त्रुटी टाळण्यासाठी प्रत्येक रथासमोर बँड वाजवणारे पथक, ढोल पथक किंवा कर्णकर्कश आवाज करणारी ‘डॉल्बी’ ध्वनीक्षेपक यंत्रणा यांपैकी काहीतरी एक असायचे. ते सर्वजण पैसे देऊन बोलवण्यात आले होते. हे सर्व पाहून मन विषण्ण झाले की, महाराज केवळ विकतच्या देखाव्यावर उभे आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून शोभायात्रेत सहभागी झाल्यावर प्रसन्न वाटण्याऐवजी डोके जड होणे, पाय पुष्कळ दुखणे आणि काहीही न सुचणे, असे त्रास होत होते. एकंदरितच आध्यात्मिक वातावरणाची वानवा होती.

श्री. अभय वर्तक

२. नशा करून छायाचित्रकारांना विचित्र ‘पोज’ देणारे शोभायात्रेतील नागा साधू !

नागा साधू म्हणजे आद्य शंकराचार्यांचे लढाऊ सैन्य. हिंदूंचे रक्षण करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी निर्माण केलेली व्यवस्था. आज या साधूंचे वर्तन पाहिले की, किळस वाटते. ते साधू विवस्त्र असतात; म्हणून ते कुंभमेळ्याचे आकर्षण झाले आहेत. परिणामतः हिंदु धर्माचे एक विकृत चित्र समाजासमोर ते उभे करत आहेत. याची काही उदाहरणे पहाण्यास मिळाली. शोभायात्रेत काही नशा करणारे त्यांचे भक्त (?) सहभागी झाले होते. ते त्यांना महागड्या सिगारेट पेटवून द्यायचे आणि ते साधू त्या शोभायात्रेत ओढत होते अन् सर्व माध्यमांचे छायाचित्रकार त्यांची जवळून छायाचित्रे घेत होते. काही नागा साधू चिलीम ओढतांनाच्या ‘पोज’ देऊन छायाचित्रे काढून घेत होते. जणूकाही ‘नागा साधू म्हणजे नशा’, असे चित्र जगासमोर उभारण्याची चढाओढच लागली होती.

साधू समवेत सेल्फी काढतांना एक भक्त

३. अध्यात्मशास्त्राच्या विपरीत वागणे असलेली महाराज मंडळी !

३ अ. भक्तांच्या नव्हे, तर सुरक्षारक्षकांच्या (‘बॉडीगार्ड’च्या) घोळक्यात वावरणारे महाराज ! : एका महाराजांनी त्यांच्या शिष्यांना त्यांचे नाव आणि छायाचित्र असलेले ‘टी-शर्ट’ परिधान करण्यास दिले होते. ते ‘टी-शर्ट’ परिधान केलेली मंडळी रथाच्या खाली नाचत होती. रथामध्ये महाराजांच्या शेजारी काळे सफारी कपडे घातलेले ५ – ६ सुरक्षारक्षक उभे होते आणि ते भूषणावह असल्याप्रमाणे महाराज वावरत होते. हे पाहून सर्वसामान्य हिंदूंच्या मनात आले असेल की, हे संत आहेत कि राजकारणी ?

३ आ. एखाद्या सिनेतारकांप्रमाणे वावरणार्‍या साध्वी ! : शोभायात्रेतील एका साध्वींकडे पाहून एक हिंदु महिला म्हणाली, ‘‘या तर आताच ‘फेशिअल मसाज’ आणि ‘आय ब्रोज’ (भुवया कोरणे) करून आल्या आहेत. या कसल्या साध्वी ?’’ सर्वसामान्य हिंदु महिलेची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या डोळ्यांतून पाणीच आले. यावरून ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे किती सर्वश्रेष्ठ आहेत’, ते लक्षात आले. परात्पर गुरूंनी ‘दांभिकता आणि खरे अध्यात्म कसे ओळखायचे ?’, हे लक्षात आणून दिल्यामुळे त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

४. शोभायात्रेत सहभागी झालेल्या महाराजांपैकी केवळ एक-दोन महाराजांकडेच पहावेसे वाटणे

शोभायात्रेत सहभागी झालेल्या महाराजांच्या चेहर्‍यावरच अहंकार आणि दिखाऊपणाच्या छटा सहजपणे दिसत होत्या. ‘त्यांच्या चेहर्‍याकडे पाहू नये’, असे वाटत होते. केवळ एक-दोन साधूच असे होते की, जे निर्विकारपणे रथावर बसले होते किंवा इतरांकडून नामजप करवून घेत होते.

५. शोभायात्रेची आयोजनशून्यता आणि पोकळ दिखावा !

शोभायात्रा सकाळी ९ वाजता चालू होण्याऐवजी ती ११ वाजता चालू झाली. ती ठरवलेल्या मार्गाप्रमाणे न जाता लांबच्या मार्गाने गेली. परिणामतः शोभायात्रा सायंकाळी ४.३० वाजता संपली. त्या वेळी जमलेल्या लोकांना पुष्कळ भूक लागलेली होती. त्या सर्वांना भोजन न देताच शोभायात्रेची सांगता झाली.

– श्री. अभय वर्तक, धर्मप्रसारक, सनातन संस्था

ती संपल्यावर एका दीन साधूने आयोजकांकडे भोजनाची मागणी केली. त्यावर आयोजकांनी त्यांच्यावर खेकसून सांगितले, ‘‘रात्री ८ वाजता भोजन मिळेल !’’ हे ऐकून तो साधू काही न बोलताच गेला. ‘मोठा दिखावा आतून कसा पोकळ आहे ?’, हे जवळून अनुभवता आले.

६. कंत्राटी माणसांनी जागा अस्वच्छ करणे

त्या आखाड्याच्या भल्या मोठ्या प्रांगणात शोभायात्रेची सांगता झाली. तेथे सर्वांना प्लास्टिकच्या पेल्यात चहा देण्यात आला होता आणि थोड्या जणांना भजी खाण्यासाठी द्रोण वाटले होते. त्या सर्वांनी खाऊन झाल्यावर द्रोण आणि चहाचे पेले हे दोन्ही प्रांगणातच फेकून दिले. शेकडो लोकांनी द्रोण आणि पेले जागेवरच फेकल्याने ‘कचर्‍यात लकलकणारा आखाडा उभा आहे’, असे चित्र निर्माण झाले होते.

७. आखाड्यांची दुःस्थिती !

७ अ. कंत्राटदारांवर विसंबून साधू आणि आखाड्यात सेवा करणारा वर्गच संपुष्टात येत असल्याचे जाणवणे : पेशवाईच्या निमित्ताने वारंवार एका आखाड्यात जाणे झाले. तेथे सेवा करणारे साधू किंवा शिष्य अभावानेच पहायला मिळायचे. खरेतर आखाडे म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे एक आदर्श उदाहरण डोळ्यांसमोर येणे अपेक्षित होते; पण वास्तव फारच विदारक होते. जेवण बनवण्यापासून तंबू किंवा कुटी सिद्ध करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कंत्राटदार राबत होते. पेशवाईसाठी लागणार्‍या गाड्या सजवण्यासही कंत्राटदाराची माणसे राबत होती. ते पाहून वाईट वाटले. त्या वेळी जाणवले की, हिंदु धर्माची महान परंपरा असणार्‍या आखाड्यात सेवा करणारा वर्गच संपुष्टात येत चालला आहे. केवळ आदेश देणारा म्हणजे स्वत:च्या अहंकारात बुडलेला एक व्यक्ती देखावा करून कार्य करत असल्याचे चित्र समोर दिसत होते.

७ आ. आखाड्याचे वातावरण पंचतारांकित हॉटेलप्रमाणे असणे : आखाड्याची सर्व सजावट कंत्राटदारानेच केली होती. त्याने त्या आखाड्याच्या दर्शनी भागात एक विदूषक (कृत्रिम दिव्यांनी चमकणारा) उभा केला होता. त्यामुळे ‘आपण आखाड्यात आलो आहोत कि सर्कस पहायला ?’, असा प्रश्‍न निर्माण होत होता. आखाड्याच्या संपूर्ण वास्तूस बरीच रोषणाई केली होती. ‘जणूकाही आपण एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आलो आहोत’, असे वातावरण होते. कंत्राटदारांच्या लोकांचा राबता सर्व ठिकाणी होता. जणूकाही काही एखाद्या श्रीमंताच्या घरचे लग्न असावे आणि आपले कोणीच नाही, असे वातावरण होते. केवळ पैसे देऊन आणलेल्या नोकरांची गर्दी ! हे सर्व पाहून मन अक्षरश: हळहळले. कोट्यवधी रुपये आहेत; पण शिष्यभावाची वानवा आहे.

७ इ. अव्यवस्थितपणाचे टोक दर्शवणारी काही उदाहरणे : आखाड्यातील साधूंच्या खोल्यांत जाण्याची काही वेळा संधी मिळाली. तेथे नवीन गाद्या होत्या, नवीन इमारत होती; पण अव्यवस्थितपणाचा कळस होता. सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कोणाचा कोणाला मागमूस नव्हता. त्यांच्या मंदिरातही अशीच स्थिती होती. शोभायात्रेत ज्यांचे फलक त्या रथाला लावले होते, तेही अजागळपणे बांधलेले होते. स्वतःच्या गुरूंचे छायाचित्रही आपण नीट बांधू न शकणार्‍या शिष्यांची काय अवस्था असेल, याची कल्पना येते. अर्थात तो फलक शिष्यांनी बांधलेला असेल तरच !

८. शोभायात्रेतील दिलासादायक घटना !

८ अ. एका साधूने उपस्थितांकडून जयघोष करून घेणे : या संपूर्ण शोभायात्रेत केवळ एक साधू स्वतःच्या रथात बसून सर्वांना ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्यास सांगत होते. त्यांच्याकडे पाहून थोडासा दिलासा वाटला आणि ‘अद्यापही या परंपरेत काहीतरी ईश्‍वरी अंश शिल्लक आहे’, असे जाणवले.

८ आ. आखाड्याच्या साधूंनी कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या २ खर्‍या साधूंची नावे सांगणे : एका आखाड्याच्या साधूंना भेटायला गेलो असता त्यांना विचारले, ‘‘या कुंभमेळ्यात आखाड्यांचे सहस्रो साधू येतील; पण त्यातील आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असे कोणी असेल, तर आम्हाला त्यांची नावे द्याल का ?’’ त्यांनी लगेच २ साधूंची नावे सांगितली. त्यांनी सांगितले, ‘‘येथे सहस्रो येतील; पण खर्‍या अर्थाने हे दोघे जणच साधू आहेत. ते या सर्व अवडंबरापासून दूर असतील. ते येतील, स्नान करतील आणि निघून जातील. कोणाला कळणारसुद्धा नाही. त्या वेळी मला जाणवले की, ‘अशा खर्‍या साधूंमुळेच आज हिंदु समाज जिवंत आहे.’

– श्री. अभय वर्तक, धर्मप्रसारक, सनातन संस्था

(प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि स्वतःच्या साधनेत मग्न असलेल्या साधूंचा खरा परिचय समाजाला होतच नाही. केवळ दिखाऊपणा करणार्‍यांचे नाव आणि छायाचित्र समाजासमोर जाते. या खर्‍या साधूंची ओळख समाजाला व्हावी, यासाठी सनातन संस्था प्रयत्नरत आहे. – संकलक)


Multi Language |Offline reading | PDF