हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि अन्य उपक्रम यांना मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, राजकीय पक्ष आणि पोलीस यांच्याकडून होत असलेला विरोध !

  • हिंदूसंघटनाची नितांत आवश्यकता असतांना केवळ हिंदु जनजागृती समितीचे धर्मरक्षणाचे वाढते कार्य रोखण्याचा प्रयत्न करणे, हे धर्म आणि राष्ट्र कार्यात खोडा घालण्यासारखेच आहे ! ‘हिंदूंच्या मतांवर निवडून येणारे राजकीय पक्ष आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वरक्षणासाठी स्वतः काही करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?
  • ईश्‍वरी कृपेने हिंदु जनजागृती समितीची हिंदुत्वरक्षणाची तळमळ प्रामाणिक आहे, हे आता समाजाच्याही लक्षात आल्यामुळे कितीही विरोध झाला, तरी समितीच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा, आंदोलने, प्रांतीय अधिवेशने यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे ! हिंदु समाज हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अग्रेसर झाला आहे, हे समितीच्या कार्याचे फलित आहे !

हिंदु जनजागृती समिती ही धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण या पंचसूत्रींवर आधारित हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणारी संस्था आहे. याच अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येत आहेत. वास्तविक हिंदु जनजागृती समिती ही कोणतीही राजकीय संघटना नसून हिंदुत्वासाठी पद, पक्ष, संघटना विसरून हिंदु समाजाचे संघटन करणारी हिंदुत्वनिष्ठ संघटना आहे. असे असले, तरी काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदूंच्या मतांवर निवडून येणारे राजकीय पक्ष या सभांना विविध माध्यमांतून विरोध करत आहेत. धर्मरक्षणाच्या शुद्ध हेतूने आयोजित केलेल्या या सभांना हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍यांकडून साहाय्य मिळणे, तर दूरच उलट त्यांच्याकडून विरोध होत असल्याचा कटू अनुभव येत आहे. ‘काही अन्य संघटनांमधील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते समितीच्या कार्यात सहभागी होत असल्याचे दर्शवून माहिती काढत आहेत’, असाही अनुभव येत आहे. काही ठिकाणी पोलिसांकडून या सभांना विरोध होत आहे. ‘हा विरोध कशा प्रकारचा आहे’, हे वाचकांना समजण्यासाठी आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये आलेले कटू अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत. सर्व स्तरांतून कितीही विरोध झाला, तरी ‘हिंदु जनजागृती समितीच्या सभांना हिंदूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे’, हा समाजाचा समितीवरील दृढ विश्‍वास दर्शवतो !

१. साहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊन ऐनवेळी काढता पाय घेणारे आणि त्या माध्यमातून सभा अयशस्वी करण्याचा प्रयत्न करणारे हिंदुत्वनिष्ठ (?) !

१ अ. अनावश्यक चर्चा करून सभेच्या प्रसारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा अमूल्य वेळ वाया घालवणे : एका शहरात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने समितीचे कार्यकर्ते एका हिंदुत्वनिष्ठांकडे गेले होते. तेव्हा त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून कार्यकर्त्यांना १ घंटा त्यांच्याकडे बसवून ठेवले आणि त्यांचा वेळ वाया घालवला. ‘काही धर्मप्रेमींचे संपर्क देतो’, असे सांगूनही त्यांनी शेवटपर्यंत दिले नाहीत.

१ आ. ‘सभेसाठी विद्युतयंत्रणा, व्यासपीठ, ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून देतो’, असे सांगून त्यासाठी काहीच प्रयत्न न करणारे एका राजकीय पक्षाचे नगरसेवक ! : एका शहरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी ‘विद्युतयंत्रणा, व्यासपीठ आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून देतो’, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र त्या दृष्टीने त्यांनी नियोजन केलेले दिसत नव्हते. सर्वकाही अनिश्‍चित असल्याचे पाहून ‘सिद्धता होणार कि नाही’, असे समितीच्या कार्यकर्त्यांच्या मनात येत होते. कार्यकर्ते ‘मंडप डेकोरेटर कोण आहेत ? ते किती वाजता येणार ?’, असे नगरसेवकांना विचारत होते. तेव्हा ते नगरसेवक कार्यकर्त्यांना ‘तुम्ही काही काळजी करू नका. सर्वकाही व्यवस्थित होईल’, असे वारंवार सांगत होते; मात्र प्रत्यक्षात काहीच हालचाल करत नव्हते. त्यांच्या एकंदरित वागण्यावरून कोणतीच सोय होणार नसल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी एका परिचित पदाधिकार्‍यांना संपर्क केल्यावर ते त्या ठिकाणी आले. त्यांनी संबंधित नगरसेवकांना ‘यांना सर्व उपलब्ध करून द्या’, असे सांगितले. तेव्हा त्या नगरसेवकांनी सूची करून डेकोरेटर आणि विद्युतयंत्रणा पुरवणार्‍या व्यक्तीला भ्रमणभाष केले. यामुळे ‘ते नगरसेवक ‘सभा होऊ नये’, यासाठी प्रयत्नरत होते’, असे लक्षात आले.

२ आ. धर्मशिक्षणाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेविषयी द्वेष आणि आकस असणारे बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते ! : एका शहरातील सभेच्या वेळी बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या एका कार्यकर्त्याकडे समितीचे कार्यकर्ते सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने गेले असता ते चिडून म्हणाले, ‘‘कोण अभय वर्तक ? आम्ही अनेक वर्षांपासून कार्य करत आहोत. हा एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेविषयी काय काय बोलतो. काही कळते का ?’’ या वेळी हे कार्यकर्ते आक्रमकपणे बोलत होते. ते पुढे समितीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तुम्हाला काही कामधंदा नाही का ? येथील हिंदू जागृत आहेत. येथे जागृती करण्याची आवश्यकता नाही.’’

१ ई. ‘सभेचा प्रसार आणि प्रसिद्धी करण्यासाठी साहाय्य करू’, असे सांगून आयत्या वेळी सहभागी न होणे : एका शहरातील एका लहान गावात लहान हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या आयोजनाच्या बैठकीला काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मिळून ३ कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सर्वांनी ‘रात्री प्रसाराला समवेत येऊ. संपूर्ण परिसरात प्रसार आणि प्रसिद्धी करण्यास साहाय्य करू, तसेच शेवटच्या दिवशी २० व्यक्ती ध्वज घेऊन येतील’, असे सांगितले. कृती करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांचा सहभाग नव्हता. त्या गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा ठरल्यानंतर तेथील काही लोकांनी सांगितले, ‘‘या भागात काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहकार्यानेच सभा होऊ शकते. अन्यथा सभेला कुणी येणार नाही.’’

२. सभा अयशस्वी होण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करणे

२ अ. ‘सभेला कुणी येऊ नये’, यासाठी एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना ‘समितीच्या कार्यकर्त्यांनी केवळ सभा असलेल्या गावातच प्रसार करावा’, असे वाटत असणे : याच सभेचा प्रसार एका भागातील ३ क्रमांकाच्या भागात चालू होता. तेव्हा ‘हा सर्व परिसर एका संघटनेशी निगडित आहे. ‘तेथून सर्व जण येतील’, असे त्या संघटनेचे कार्यकर्ते सांगत होते. त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना ‘समितीच्या कार्यकर्त्यांनी केवळ या भागातच प्रसार करावा’, असे वाटत असल्याचे लक्षात आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी अन्य भागांतही प्रसार केला; मात्र त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना ‘केवळ त्या भागातच प्रसार करत आहोत’, असे सांगितले. सभेला अन्य भागांतूनही धर्मप्रेमी आले.

२ आ. ‘लोकांनी बसून वक्त्यांचे भाषण ऐकू नये’, असे वाटत असल्याने त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना ‘कनात लावू नये’, असे सांगणे : सभेच्या दिवशी सिद्धता करत असतांना एका संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, ‘‘या मैदानात कनात लावू नका. लोक उभे राहूनच वक्त्यांचे भाषण ऐकतील. वक्त्यांसमोर कोणी बसणार नाहीत.’’ त्यांना कनातीचे महत्त्व सांगून समितीच्या कार्यकर्त्यांनी कनात लावली. त्यामुळे धर्मप्रेमीही सभा ऐकण्यासाठी आत येऊन बसले.

२ इ. अन्य संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी वक्ते देत असलेल्या घोषणांना प्रतिसाद न देणे : सभेला उपस्थित असलेला पुरुषवर्ग जेथे बसला होता, त्या बाजूला मध्यभागी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे युवा कार्यकर्ते बसले होते. वक्ते देत असलेल्या घोषणांना ते प्रतिसाद देत नव्हते. (हात वर करून घोषणा देणे, इत्यादी) ते ‘भारतमाता की जय’ ही घोषणाही देत नव्हते. शेवटी ‘सर्वांनी जयजयकार करा’, असे वक्त्यांनी व्यासपिठावरून सांगितले.

२ ई. डेकोरेटर विनामूल्य साहित्य देण्यास सिद्ध असणे, एका पक्षाच्या माजी नगरसेवकांचा मुलगा डेकोरेटरना भेटल्यावर त्यांनी साहित्य विनामूल्य देण्यास नकार देणे : एका पक्षाच्या माजी नगरसेवकांचे चिरंजीव सतत ‘डेकोरेटरचे काय झाले ?’, अशी चौकशी करायचे. ते ‘प्रतिस्पर्धी पक्षाच्या नगरसेवकांकडून मोठी रक्कम घ्या’, असे सतत सांगायचे. वर्ष २००८ मध्ये तेथे हिंदु धर्मजागृती सभा झाली होती. त्या वेळी तेथील एका डेकोरेटरने सभेसाठी विनामूल्य साहित्य उपलब्ध करून दिले होते. तेच डेकोरेटर या वेळीही विनामूल्य साहित्य देणार होते. ही गोष्ट एका पक्षाच्या कार्यकर्त्याला समजल्यावर त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. ते लगेच तेथून निघून गेले. नंतर ते ५ मिनिटांनी पुन्हा येऊन समितीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘ते डेकोरेटरवाले मला भेटले. ते तुम्हाला विनामूल्य साहित्य देऊ शकत नाहीत.’’ तेव्हा समितीच्या कार्यकर्त्यांना वाटले, ‘आताच यांना डेकोरेटर कसे भेटले ? ते त्यांना ‘विनामूल्य साहित्य देऊ शकत नाही’, असे कसे म्हणाले ?’ प्रत्यक्षातही नंतर त्या डेकोरेटरने साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यास नकार दिला.

३. सभेच्याच दिवशी अन्य कार्यक्रमांचे आयोजन करून हिंदूंना सभेला उपस्थित रहाण्यापासून परावृत्त करणार्‍या स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या संघटना !

३ अ. हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या एका राजकीय पक्षाने नागरिकांना प्रलोभने दाखवून पक्षाच्या राजकीय कार्यक्रमासाठी नेणेे : एका जिल्ह्यातील एका शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या गावांत एक मास प्रसार करून नागरिकांमध्ये जागृती केली होती; मात्र हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या एका राजकीय पक्षाने लोकांना विकासकामे करण्याचे प्रलोभन दाखवून सभेच्याच दिवशी त्याच जिल्ह्यातील अन्य एका शहरात होणार्‍या कार्यक्रमासाठी नेले. ‘आम्ही गावात मंदिर बांधून देऊ किंवा पाण्यासाठी चर खणून देऊ’, असे सांगून राजकीय पक्षाने हिंदु राष्ट्र-जागृती सभेला येणार्‍या लोकांना राजकीय कार्यक्रमाकडे ओढल्याचे अनुभवायला आले. असे असले, तरी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला चांगली उपस्थिती लाभली.

३ आ. सभा रहित झाल्याचा, दिनांक आणि स्थळ पालटल्याचा सामाजिक माध्यमांवर खोटा प्रचार ! : ६.१.२०१९ या दिवशी एका शहरात हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. ही सभा यशस्वी होऊ नये, यासाठी काही संघटनांकडून अपप्रचार करण्यात आला. ‘सभा ६.१.२०१९ या दिवशी न होता ९.१.२०१९ या दिवशी आयोजित केली आहे’, तसेच ‘एका शाळेच्या मैदानावर सभा असतांना ती शहरातील अन्य ठिकाणी आयोजित केली आहे’, अशा प्रकारचा अपप्रचार सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून करण्यात आला. या परिसरातील गावांमधील युवकांवर सभेला न जाण्यासाठी दबाव निर्माण करणे, ‘या सभेला जाऊन काही लाभ होणार नाही’, असे युवकांना सांगणे, असे प्रकार झाले.

३ इ. अन्य ठिकाणी सभेच्याच दिवशी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे : काही संघटनांनी शेजारील अन्य एका शहरात सभेच्याच कालावधीत जाणीवपूर्वक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. जेणेकरून काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते शिबिराला गेल्यामुळे त्यांना सभेत सहभागी होण्यास आडकाठी होईल.

३ ई. सभेच्याच दिवशी इडली-चटणी बनवण्याचा कार्यक्रम ठेवून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विरोध करणार्‍या काही संघटना ! : ६.१.२०१९ या प्रत्यक्ष सभेच्या दिवशी एका गावात अकस्मात इडली-चटणी बनवण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. हा कार्यक्रम एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनी आयोजित केला होता. त्यामुळे तेथील महिला सभेसाठी येऊ शकल्या नाहीत. (हिंदु जनजागृती समितीच्या सभांना विरोध करण्यासाठी इडली-चटणीसारखे कार्यक्रम ठेवल्याने संबंधित संस्था हिंदुत्व सोडून किती खालच्या स्तराला जाऊन विरोध करत आहेत, हे लक्षात येते ! अशांकडून कधी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य होईल का ? – संपादक)

३ उ. सभेच्याच दिवशी अन्य शहरात कार्यक्रम आयोजित करणे : २७.१०.२०१७ या दिवशी एका जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी लहान हिंदु राष्ट्र-जागृती सभेेचे आयोजन करण्यात आले होते. त्या दिवशी गावात हिंदुत्वनिष्ठांचा पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा दिवस निश्‍चित झाल्यावर पुढील सिद्धतेसाठी साधक गेले असता सभेच्याच दिवशी ‘एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेने एक कार्यक्रम आयोजित केला आहे’, असे समजले. त्यामुळे नियोजित दिवशी सभा न घेता १२.११.२०१७ या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली.’

४. भ्रष्ट राजकारण्यांच्या सभांना नव्हे तर हिंदु राष्ट्र-जागृतीचे प्रामाणिक कार्य करणार्‍या सभांना विरोध करणारे पोलीस !

हिंदु जनजागृती समितीचे नाव आतापर्यंत कोणत्याही स्फोट प्रकरणात उच्चारले गेलेले नाही. असे असूनही कायद्याचे रक्षक म्हणवणार्‍या पोलिसांनीच असे वक्तव्य करणे, हे त्यांचा अत्यंत कलुषित दृष्टीकोन स्पष्ट करते. पोलिसांनाच न्यायप्रविष्ट प्रकरणांची माहिती नाही, तर इतरांची काय स्थिती असेल ?

४ अ. सभेसाठी सभागृह उपलब्ध करून देणार्‍या धर्मप्रेमींवर दबाव आणणारे हिंदुद्वेषी पोलीस ! : ‘एका शहरात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी सभागृह उपलब्ध करून देणार्‍या सभागृहाच्या मालकांना स्थानिक पोलिसांनी दमदाटी केली. पोलिसांनी सभागृहाच्या मालकांना ‘तुम्ही बॉम्बस्फोट करणार्‍या संस्थेला सभागृह का दिले ? तुम्हाला ठाऊक नाही का ?’, असे विचारून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सभेच्या दिवशी सभागृहात १२ पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी या वेळी ध्वनीचित्रीकरणही केले.

४ आ. सनातन संस्थेविषयी धादांत खोटी माहिती सांगून धर्मप्रेमींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे सनातनद्वेषी पोलीस ! : एका शहरात हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत काही धर्मप्रेमी आले होते. बैठकीनंतर पोलिसांनी धर्मप्रेमींना बोलावून सांगितले, ‘‘तुम्ही गुप्त बैठक घेतली का ? त्यात काय ठरले ? सनातन संस्था अशाच प्रकारे नंतर काही जणांना निवडते. माझा चुलतभाऊ अशाच प्रकारे गोवला गेला. त्याला शिक्षा झाली.’’

५. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती काढून त्याचा हिंदूसंघटनाच्या कार्यात खोडा घालण्यासाठी उपयोग करणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ (?) संघटना !

५ अ. समितीच्या कार्यकर्त्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे : ‘एका शहरातील एका भागात लहान हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काही संघटना आणि राजकीय पक्ष यांचे कार्यकर्ते प्रसार करणार्‍या समितीच्या कार्यकर्त्यांवर बारकाईने लक्ष ठेवत होते. ते समितीच्या कार्यकर्त्यांना ‘कुठे प्रसार केला ?’, हे नियमितपणे विचारून घेत होते. त्यांचा चुकीचा उद्देश लक्षात आल्याने सभेच्या प्रसारावर परिणाम होऊ नये, याकरता समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना माहिती सांगण्याचे टाळले, तरी ते प्रसाराच्या ठिकाणी फिरत होते. समितीचे कार्यकर्ते त्यांना माहिती देत नसूनही ते प्रसाराच्या ठिकाणी येऊन ‘बरे चालले आहे ना ?’, असे विचारून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते.

५ आ. सभेत सहभाग घेण्याच्या कारणाने समितीच्या कार्याची माहिती काढणे : एका शहरात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या वेळी एका संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी या सभेत सहभाग घेतला. त्या शहराच्या एका भागात त्या संघटनेचे कार्य चांगले आहे. सभेसाठी एका धर्मप्रेमींनी सभागृह, डेकोरेटर्सचे सर्व साहित्य, ध्वनीक्षेपक यंत्रणा असे सर्व उपलब्ध करून दिले. या वेळी त्या संघटनेचे कार्यकर्ते ‘येथे समितीचे कार्यकर्ते आहेत का ? कोठे रहातात ?’, असे प्रश्‍न विचारत होते.

५ इ. पोलिसांचे नाव घेऊन सनातन संस्थेविषयी खोटे सांगून विकल्प पसरवणे : सभेनंतर त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. ‘‘पोलिसांनी आम्हाला चौकशीसाठी बोलावले. ‘सनातन संस्था हिंदूंंना नंतर गुप्त प्रशिक्षण देते’, असे पोलीस सांगत आहेत.’’

समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ‘पोलीस ठाण्यात आम्ही तुमच्या समवेत येतो’, असे सांगितले. तेव्हा त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही येऊ नका. आम्ही आमच्या स्तरावर हे प्रकरण सोडवू’, असे सांगितले. नंतर त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याविषयी विचारल्यावर ‘आता पोलीस अन्वेषण चालू आहे. नंतर पाहू’,  असे त्यांनी सांगितले. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजनात सनातन संस्था नसतांना पोलिसांनी नाव घेतले आहे, तर सनातन संस्थेचे साधक अथवा समितीचे कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात जाणे आवश्यक होते, तरीही संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना समवेत घेणे जाणीवपूर्वक टाळले.

५ ई. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि प्रांतीय अधिवेशन होऊ नये’, यांसाठी प्रयत्नरत असणे : एका शहरातील अनधिकृत मशिदीच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. त्याचे नेतृत्व एक संघटना हळूहळू स्वतःच्या नियंत्रणात घेत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या एका समन्वयकांची जिल्ह्याच्या दौर्‍यात त्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी भेट झाली असता त्यांनी त्या प्रांतात ‘सभा अथवा प्रांतीय अधिवेशन यांचे आयोजन करू’, असे सांगितले; मात्र ‘सभा, अधिवेशन होऊ नये’, यासाठी त्या संघटनेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत’, असे लक्षात आले. प्रांतीय हिंदू अधिवेशनात त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याविषयी विचारल्यावर त्यांनी विषय योग्य प्रकारे आणि प्रभावीरित्या मांडू न शकणार्‍या कार्यकर्त्याला पाठवले. त्यामुळे विषयाचे गांभीर्य अल्प झाले.

५ उ. काही कार्यकर्ते बैठकीला उपस्थित धर्मप्रेमींचे संपर्क क्रमांक घेत असणे आणि त्यानंतरच्या बैठकीत धर्मप्रेमींची उपस्थिती अल्प होणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभेसंदर्भात स्थानिक हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेतांना किंवा अन्य वेळीही बैठकीला उपस्थित मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते समितीच्या कार्यकर्त्यांकडे धर्मप्रेमींचे संपर्क क्रमांक मागतात. काही जण बैठक संपल्यावर बाहेर उभे राहून धर्मप्रेमींचे संपर्क क्रमांक घेतात आणि चर्चा करतात. ‘मागील बैठकीला आलेले बरेचसे धर्मप्रेमी नंतरच्या बैठकीत आलेले नसतात किंवा त्यांचा सहभाग अल्प असतो’, असे लक्षात आले आहे. धर्मप्रेमींनी बैठकीत सकारात्मकता दाखवून धर्मकार्यांतर्गत काही दायित्व घेतलेले असते; पण नंतर ते टाळाटाळ करू लागतात किंवा दायित्व घेणे नाकारतात.

६. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी न होण्यासाठी मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा अन्य धर्मप्रेमींवर दबाव !

६ अ. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेल्या बैठकीच्या दिवशीच अकस्मात बैठक घेणे : एका शहरातील एक धर्मप्रेमी जून २०१८ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित होते. त्यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यात बोलावले. ऑगस्ट मासात समितीचे समन्वयक तेथे गेले. त्यापूर्वी त्या धर्मप्रेमींनी अनुमाने १२५ धर्मप्रेमींना संपर्क केले होते. ‘किमान ६० ते ७० धर्मप्रेमी बैठकीला येतील’, असा अंदाज होता. त्याच दिवशी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकस्मात दुपारी १ ते २ या वेळेत बैठक ठेवली. त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समितीच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी इच्छुक असलेल्या धर्मप्रेमींना त्यांच्या बैठकीसाठी बोलावून घेतले. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी बोलावलेल्या बैठकीला केवळ २० धर्मप्रेमी आले. त्यानंतरच्या ‘बैठकीत धर्मप्रेमींचा सहभाग अल्प होत आहे’, असे लक्षात आले.

६ आ. अधिवक्त्यांसाठीच्या प्राथमिक बैठकीला उपस्थित रहाणे; मात्र धर्मशिक्षणवर्गाला जाणीवपूर्वक प्रतिसाद न देणे : एका जिल्ह्यातील एका गावातील काही अधिवक्ते जून मासात रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात आयोजित केलेल्या अधिवक्ता अधिवेशनाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या गावात समितीचे कार्य चालू करण्यासाठी प्राथमिक बैठकीचे आयोजन केले होते. तेथील एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केेले होते. बैठकीला अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे स्थानिक पदाधिकारी आणि अन्य काही धर्मप्रेमी आले होते. बैठकीनंतर धर्मशिक्षणवर्ग घेण्याचा वार निश्‍चित केला. त्या दिवशी तेथे समितीचे कार्यकर्ते गेलेे असता भ्रमणभाष करूनही १ – २ धर्मप्रेमीच आले होते. त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा बैठकीचे आयोेेजन केल्यावर असेच अनुभवाला आले.

६ इ. बैठकीत धर्मप्रेमी आणि काही हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा अल्प सहभाग : एका जिल्ह्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने समितीने आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीपासूनच मागील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी साहाय्य करणारे धर्मप्रेमी आणि काही हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा सहभाग अल्प असल्याचे जाणवले.

६ ई. समितीच्या संपर्कात असलेल्या धर्मप्रेमींना मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने महत्त्वाचे पद देणे : एका शहरात २७.५.२०१८ या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यानंतर तेथील एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने धर्मप्रेमींसाठी विविध शिबिरांचे आयोजन केले होते. याची माहिती अन्य एका धर्मप्रेमींकडून समजली. त्या शिबिरांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्य कार्यकर्ते जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी समितीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ‘नेहमी उपस्थित असणारे धर्मप्रेमी येत नाहीत’, असे लक्षात आले. ते धर्मप्रेमी आता समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात फारसे नाहीत. समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या एका धर्मप्रेमींना एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने   एक पद देऊन त्यांच्या कार्याशी जोडून घेतले असल्याचे समजले.

६ उ. सभेला उपस्थित राहू इच्छिणार्‍या धर्मप्रेमींना धमकी मिळणे : एका शहरातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी धर्मप्रेमींना सभेला येण्याची आठवण करण्यासाठी भ्रमणभाष केला असता लक्षात आले, ‘येथून कुणी सभेला गेले, तर त्यांना आम्ही पाहून घेऊ’, असे सांगितले गेले आहे. त्यामुळे कोणाची सभेला येण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळे त्या गावातील धर्मप्रेमींचा प्रतिसाद अल्प होता. अन्य गावांत बैठकांना प्रतिसाद चांगला होता.

(क्रमशः वाचा पुढील रविवारी)

– एक धर्मप्रसारक, सनातन संस्था.


Multi Language |Offline reading | PDF