औषध विक्रीच्या माध्यमातून चाललेली लूट रोखा !

‘मी एकदा दातांच्या तपासणीसाठी चिकित्सालयात गेलो होतो. दंतचिकित्सकाने (‘डेन्टिस्ट’ने) मला औषध विक्रेत्याकडून औषधाच्या ३ गोळ्या घेण्यास सांगितल्या होत्या; परंतु औषध विक्रेत्याने मला १० गोळ्या घेण्यास सांगितले. मी त्याला म्हटले, ‘‘डॉक्टरांनी मला ३ गोळ्या सांगितल्या आहेत, तर मी अधिकच्या गोळ्या का घेऊ ?’’ तेव्हा त्याने ‘‘आम्ही तसेच देतो. तुम्हाला हव्या असतील, तर घ्या, नाहीतर वैद्यांच्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडून घ्या !’’, असे उर्मटपणे उत्तर दिले. त्यावर मी त्याला ‘‘तुम्ही १० गोळ्या का देत आहात ? असे कुठे लिहिले आहे का, तसे दाखवा !’’, असे विचारले. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यातून औषध विक्रेते हे ग्राहकांना कशा पद्धतीने फसवत आहेत, हे लक्षात येते.’ – श्री. नीलेश सुर्वे, डोंबिवली, ठाणे. (डिसेंबर २०१८)

‘अशा प्रसंगात औषध विक्रेत्यांच्या विरोधात पुढील कार्यवाही करावी –

१. ग्राहकांची लूट करणार्‍या औषध विक्रेत्यांची तक्रार करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी झालेले संभाषण भ्रमणभाषमध्ये ध्वनीमुद्रित (ऑडिओ रेकॉर्ड) करावे.

२. (शक्य असल्यास) त्या प्रसंगाचे ध्वनीचित्रीकरणही करता येईल.

३. त्या आधारे ‘अन्न आणि औषध प्रशासना’कडे तक्रार करावी. डॉक्टरांनी दिलेल्या ३ गोळ्यांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’ची प्रत त्यासमवेत जोडावी; तसेच जर त्या दुकानदाराच्या दबावामुळे तुम्हाला ‘प्रिस्क्रिप्शन’हून अधिक गोळ्या घ्याव्या लागल्या, तर त्याच्या देयकाची प्रतही त्यासह जोडावी.’

– अश्‍विनी कुलकर्णी, आरोग्य साहाय्य समिती

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF