कुंभमेळा आणि त्याची आवश्यकता !

परात्पर गुरु पांडे महाराज

१. कुंभपर्व साजरे का करतात ?

अ. ‘समुद्रमंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडले. इंद्रपुत्र जयंत अमृतकलश घेऊन जात असतांना असुरांशी झालेल्या युद्धप्रसंगी कलशातील थोडे अमृत ४ दिवसांत ४ ठिकाणी पृथ्वीवर सांडले. त्या ४ ठिकाणी तेव्हापासून कुंभपर्व साजरे केले जाते. ती भारतातील ४ ठिकाणे आहेत हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक.

आ. देवांचे १२ दिवस, म्हणजे मानवाची १२ वर्षे होतात; म्हणून प्रत्येक १२ वर्षांनी त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. सूर्य, चंद्र आणि गुरु अमृतकुंभाचे रक्षण करण्याचे कार्य करत होते; म्हणून हे ग्रह जेव्हा विशिष्ट राशींमध्ये संयोग करतात, तेव्हा, म्हणजे बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.

२. कुंभ म्हणजे काय ?

कुंभ म्हणजे घडा, घट, घागर किंवा कलश ! देह आणि शरीर इत्यादींनाही ‘कुंभ’ असे संबोधले जाते. चराचर सृष्टीतील जीवमात्रसुद्धा घटाप्रमाणेच आहेत. त्यामध्ये चैतन्य आत्मस्वरूपाने कार्य करत असते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या वेळी तेथील गंगास्नानाने हा घट (कुंभ) पवित्र होतो.

विश्‍व हे कुंभाप्रमाणे एक मोठा घटच आहे. त्यामध्ये पंचमहाभूते समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे चराचरामध्ये त्याचे प्रतिबिंब आत्मरूपाने कार्य करतांना आढळते. कुंभमेळ्याच्या वेळी गंगेत स्नान केल्याने मनुष्य तिच्या चैतन्याने भारित होतो आणि त्याला आनंद मिळतो. त्याच्या प्रारब्धातील अनेक जन्मांची पापे नाहीशी होतात. कुंभमेळ्यातील स्नानाचे असे माहात्म्य आहे.

ज्योतिषशास्त्रात ‘कुंभ’ हा शब्द ‘राशी’ या अर्थाने वापरला जातो. कुंभपर्वाच्या संदर्भात याचा ज्योतिषशास्त्रीय अर्थच ग्राह्य धरला जातो.

३. कुंभमेळा म्हणजे काय ?

जेथे जीवनाचे सार अनुभवू शकतोे, जेथे जीवन सामर्थ्यवान बनवण्याचा मार्ग मिळतो, तो म्हणजे कुंभमेळा ! चैतन्याचे सामर्थ्य जाणण्याचे ठिकाण म्हणजे कुंभमेळा होय. नाहीतर हल्ली जत्रा-यात्रा म्हणजे केवळ करमणुकीसाठी आणि वेळ घालवण्यासाठी असलेला मेळावा असतो.

कुंभक्षेत्री मोठ्या प्रमाणात पुण्यकर्मासाठी जनसमुदाय उपस्थित रहातो. तो कुंभमेळा होय.

४. कुंभपूजनाचे (कलशपूजनाचे) महत्त्व

कुंभ म्हणजेच कलश ! पूजाविधीमध्ये प्रथम पंचमहाभूतांची पूजा केली जाते. त्यामध्ये कलशपूजनाला जलासह महत्त्व दिलेले आहे. कलशाच्या मुखस्थानी श्रीहरि विष्णूचा आणि कंठस्थानी रुद्राचा वास असतो, तसेच मूळस्थानी ब्रह्माचे स्थान असल्याचे सांगितले आहे. कुक्षस्थानी (उदर किंवा पोट यांमध्ये) सप्तद्वीपाचे अस्तित्व समाविष्ट झालेले असते, तर कलशामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचा अन् गायत्री, सावित्री अशा शांतीपुष्टी करणार्‍या देवींचा समावेश असतो. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी आणि गोदावरी अशा पवित्र नद्यांचे जल त्यात समाविष्ट होते.

५. कुंभमेळ्याच्या वेळी स्नानाला असलेले महत्त्व

कुंभमेळ्याच्या वेळी निर्माण होणार्‍या चैतन्याने भारित अशा सर्व पंचमहाभूतांचे आगमन त्या ठिकाणी होते. तेथे तीर्थरूपाने असलेल्या जलाचा आपल्याला लाभ होतो. यावरून ‘कुंभमेळ्याच्या वेळी स्नानाला महत्त्व का दिले जाते ?’, हे स्पष्ट होते.

५ अ. राजयोगी स्नान : कुंभमेळ्यात संत-महात्मे यांचे ‘राजयोगी’ स्नान मकारसंक्रांत, पौष पौर्णिमा, मौनी अमावास्या, वसंतपंचमी, माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्र या सहा तिथींना संगम तटावर होते. हिंदूंच्या देवताही अशा वेळी संगम तटावर येतात आणि स्वतः राजयोगी स्नान करून आपले व्रत पूर्ण करतात. हे सर्व पाहिल्यावर ‘या सर्वांना शक्ती देणारा भगवंतच आहे’, असे दिसून येते.

६. कल्पवास

येथे विविध भाषा, संस्कृती, पंथ आणि विविध विचारधारा असलेले भाविक एकत्र येतात, तसेच कैक जण तर मेळाव्याच्या ठिकाणी न्यूनतम चाळीस दिवस निवास, साधना, जप, तप आणि अनुष्ठान करतात. याला ‘कल्पवास’ म्हणतात.

७. श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी साधूसंतांचे संघटन करून कुंभमेळ्याला संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून देणे

कुंभपर्व पौराणिक काळापासून जरी साजरे केले जात असले, तरी १० व्या शतकात श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी याचे संघटन केले आणि मेळ्याला संघटनात्मक स्वरूप आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुढे हे संमेलन परिपुष्ट होत जाऊन त्याला आजचे महत्त्व आणि कीर्ती प्राप्त होऊन त्याला विश्‍वस्वरूप प्राप्त झाले आहे; म्हणून या कुंभपर्वात सहस्रो साधू-संतांना दीक्षा दिली जाते, तर भ्रमाचारी साधूंना नागा दीक्षा दिली जाते.

आदि शंकराचार्यांनी सर्व साधू-संतांचे विविध आखाड्यांमध्ये विभाजन केले. मुहूर्ताच्या वेळी सर्व साधूंचे त्यांच्या आखाड्यानुसार मिरवणूक काढून वाजत-गाजत स्नान होते. आजही त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाजत-गाजत राजयोगी स्नान करण्याची प्रथा चालू आहे.

७ अ. धर्माचरणाच्या अभावी हिंदु धर्मीय आधुनिक भौतिक सुखाच्या मागे लागणे आणि ख्रिस्ती अन् इस्लाम पंथियांनी हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करणे : आजच्या काळात धर्माविषयीचे कार्य अत्यल्प प्रमाणात (जवळजवळ नाहीच) होत आहे. हिंदु धर्मातील लोकांना धर्माचरणाकडे वळवण्यासाठी आणि त्यांना सहज-सुलभ ज्ञान मिळवून देण्यासाठी सर्वत्र धर्मपिठांची स्थापना केली असती, तर ते आज धर्माचरण करून समृद्ध झाले असते. आज अशी धर्मपिठे उपलब्ध नसल्याने धर्माचरणाच्या अभावी हिंदु धर्मीय आधुनिक भौतिक सुखाच्या मागे लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे ख्रिस्ती आणि इस्लाम पंथीय मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. भारतातील ईशान्येकडील भाग हा मोठ्या प्रमाणात ख्रिस्तीमय झालेला पहावयास मिळतो. सध्याचे उदाहरण पाहिल्यास ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील १ लाख हिंदूंंचे (सिंधी लोकांचे) ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

८. कुंभमेळ्याच्या वेळी होणारे अन्नदान आणि त्याचे महत्त्व

अ. कुंभमेळ्याच्या वेळी अन्नदान करण्याचे महत्त्व जाणून साधू-संतांच्या हस्ते तेथे अव्याहतपणे आणि निःस्वार्थीपणाने अन्नछत्रे चालवली जातात. या वेळी जवळजवळ १० सहस्रांहून अधिक अन्नछत्रे चालू असल्याचे समजते.

येथे कोट्यवधीच्या संख्येने येणार्‍या जनसमुदायाला आपल्या पोटापाण्याची समस्या भेडसावत नाही. आजच्या महागाईच्या दिवसात केवळ मनामध्ये धर्माचरणाचे महत्त्व असल्यामुळे भगवंताच्या कृपेने अशा प्रकारे मोठ्या स्वरूपाची ईश्‍वरी सेवा होणे आश्‍चर्यकारक आहे. येथे अन्नपूर्णेचा प्रसाद घेण्यासाठी येणारे भक्तसुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सेवा करतात आणि कोणताही पंक्तीभेद न करतांना एकत्रित येेऊन प्रसाद घेतात.

आ. अन्नामध्ये चैतन्याचा साठा असतो. असे चैतन्यरूपी अन्न ग्रहण झाल्यावर भगवंतच या चैतन्याचे विभाजन करून अन्न ग्रहण करणार्‍यास शक्ती प्रदान करतो. त्यामुळे त्याला आत्मसंतुष्टता मिळते. या आत्मसंतुष्टीमुळे खाणार्‍याच्या आत्म्याद्वारे अन्नदान करणार्‍यावर भगवंताची कृपादृष्टी होऊन त्याला पुण्याचे श्रेय मिळते. हे अन्नदान करण्याचे महत्त्व आहे. हरिपाठात संत ज्ञानेश्‍वराने म्हटले आहे,

‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥’

जसे नामस्मरणाने पुण्य मिळते, तसेच हरिस्मरण करणारे, धर्माचरण करणारे, धर्मप्रसार करणारे धर्मप्रेमी आणि साधक यांना अन्नदान केल्यास पुण्य मिळते.

९. प्रयागक्षेत्राचे महत्त्व

अ. प्रयागक्षेत्री चालू असलेला कुंभमेळा गंगानदीच्या काठीच असल्यामुळे या तीर्थक्षेत्राला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गंगा नदी शिवाच्या जटेतून वहात असल्याने ती चैतन्याने भारित आहे. त्यामुळे तिचे माहात्म्य अगाध आहे. तिचे माहात्म्य एवढे आहे की, ‘केवळ तिच्या किनार्‍यापासून जवळजवळ पाच कि.मी. अंतरावरील क्षेत्रात मनुष्य आल्यास त्या मनुष्याचा उद्धारच होतो’, असा पुराणांमध्ये उल्लेख आहे.

आ. ‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे. माघ मासात सूर्य मकर राशीत आलेला असतांना सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या विद्युत् चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) तरंगांमुळे त्रिवेणीतील पाणी भारित होऊन त्याचे लाभ मिळतात. ‘ठराविक खगोलीय परिस्थितीत असे विद्युत् चुंबकीय तरंग सिद्ध होतात’, हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे आणि त्याच्या परिणामांचा अभ्याससुद्धा होत आहे’, हे बुद्धीप्रामाण्यवादी जीव लक्षात घेतीलच.’ (संकेतस्थळावरून)

(क्रमश:)

– (परात्पर गुरु) परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF