सनातनच्या रामनाथी आश्रमातील कमलपिठाच्या ठिकाणी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या दीपस्थापना विधीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

कु. मधुरा भोसले

‘१८.२.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या परिसरात कमलकुंडातील कमलपिठावर दीपस्थापना केली. या विधीसाठी तीव्र शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉक्टर आठवले थोडा वेळ उपस्थित राहिले होते. या विधीचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करतांना डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. गणपति पूजन

कमलपिठाच्या स्थापना विधीमध्ये सूक्ष्म स्तरावर येणार्‍या अडचणींचे निवारण करण्यासाठी पूजनाच्या ठिकाणी श्रीगणेशाचे तत्त्व कार्यरत झाले. तेव्हा वातावरणात तांबूस रंगाचा प्रकाश पसरला होता आणि जास्वंदीच्या फुलांचा सूक्ष्म गंध येत होता. यावरून श्रीगणेशाचे तत्त्व अनुक्रमे तेज आणि पृथ्वी या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत झाल्याचे जाणवले.

२. संकल्प

महर्षींच्या आज्ञेनुसार कुंडामध्ये कमळे लावण्यात आली होते आणि त्याच्या मधोमध दीपाची स्थापना होणार होती. ‘दीपस्थापनेतून साधकांना हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीचे कृपाशीर्वाद लाभून आध्यात्मिक ऐश्‍वर्य आणि समृद्धी यांची प्राप्ती होऊ दे’, असा संकल्प सद्गुरुद्वयींनी केल्यावर पूजनाच्या ठिकाणी मयन महर्षि आणि भृगु महर्षि यांचे अस्तित्व जाणवले अन् त्यांनी ‘साधकांना श्रीमहालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल’, असा कृपाशीर्वाद दिला. त्यानंतर सद्गुरुद्वयींच्या मस्तकावर गुलाबी रंगाचा प्रकाशझोत पडलेला दिसला. या प्रकाशझोताच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीदेवीचे निर्गुण चैतन्य पूजनाच्या ठिकाणी कार्यरत झाले.

३. कुंडामध्ये वरुण देवतेचे आवाहन आणि पूजन करणे

३ अ. वरुण देवतेचे आवाहन करणे : श्री. वझेगुरुजींनी वरुण देवतेचे आवाहन केल्यावर कुंडामध्ये निळसर रंगाचा प्रकाशझोत पडला आणि त्यानंतर सूक्ष्मातून पाण्याची धार पडतांना दिसली. प्रथम वरुणदेवतेचे तेजतत्त्वरूपी तत्त्व आणि नंतर आपतत्त्वरूपी तत्त्व पूजनाच्या ठिकाणी आले.

३ आ. जलकुंडाकडे देवीतत्त्व आणि वरुणतत्त्व यांच्या लहरी आकृष्ट होणे : जलकुंडामध्ये मोगर्‍याचे सुगंधी जल घातले होते. या सुगंधी जलाकडे देवीतत्त्व आणि वरुणतत्त्व यांच्या लहरी आकृष्ट होऊन त्या एकत्रितपणे कार्यरत झाल्या.

३ इ. वरुण देवतेचे पूजन करणे : जेव्हा सद्गुरुद्वयींनी धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वरुणदेवतेचे पूजन केले, तेव्हा वरुणदेवता प्रसन्न झाली आणि तिने साधकांना आशीर्वाद दिला.

४. पूजनाच्या स्थळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आगमन होणे

ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर फुले उमलतात आणि ते सूर्याच्या दिशेने वळतात, त्याप्रमाणे पूजनाच्या स्थळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आगमन झाल्यावर कुंडातील कमळाची फुले परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या दिशेने वळली. यावरून चैतन्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते.

५. दिव्याची स्थापना करणे

सद्गुरुद्वयींनी अष्टदलकमळाच्या गुलाबी रंगाच्या रचनेच्या मधोमध तुपाच्या दिव्याची स्थापना केल्यावर दिव्याकडे दीपलक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट झाले आणि ते दिव्याच्या ज्योतींतून संपूर्ण वातावरणात पसरले. दीपाची स्थापना झाल्यामुळे दिव्याकडे लक्ष्मीतत्त्व आकृष्ट होऊन साधकांना श्रीमहालक्ष्मीदेवीचे कृपाशीर्वाद मिळाले. ‘प्रतिदिन या ठिकाणी दीपलक्ष्मी (तुपाचा दिवा) प्रज्वलित केल्यामुळे साधकांना आध्यात्मिक ऐश्‍वर्य आणि संपदा यांची प्राप्ती होणार आहे’, असे वझेगुरुजींनी सांगितले.

६. दीपप्रज्वलन करणे

अ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी कयपंजीला स्पर्श केल्यावर सद्गुरुद्वयींनी कयपंजीने दिवा प्रज्वलित केला. तेव्हा दिव्यामध्ये कयपंजीतील ज्योतीतून अवतारी चैतन्य आणि शक्ती संक्रमित झाली अन् दिवा दिव्य तेजाने उजळून निघाला.

आ. दीपप्रज्वलन चालू असतांना सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे मंगलाष्टके म्हणत होते. त्यामुळे सद्गुरुद्वयींमध्ये सुप्तावस्थेत असणारे लक्ष्मीतत्त्व प्रकट होऊन कार्यरत झाले आणि त्यांच्या देहातून दोन प्रकाशझोत प्रक्षेपित झाले. एक प्रकाशझोत दिव्याच्या दिशेने प्रक्षेपित होऊन दिव्यामध्ये दीपलक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत झाले आणि दुसरा प्रकाशझोत वातावरणात प्रक्षेपित होऊन संपूर्ण वातावरणात मंगलकारी शक्ती अन् सात्त्विकता यांच्या लहरी कार्यरत होऊन वातावरणाची शुद्धी झाली.

इ. दीपप्रज्वलनाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले डोळे मिटून बसले होते. तेव्हा त्यांच्या आज्ञाचक्रातून प्रकाशाचा झोत दिव्याच्या दिशेने जाऊन त्याच्याभोवती निर्गुण चैतन्याचे संरक्षककवच निर्माण झाले. त्यामुळे पाताळातून होणार्‍या मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणापासून कुंडात स्थापन केलेल्या दिव्याचे रक्षण होणार आहे.

ई. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मध्ये अनुक्रमे श्रीदेवी आणि भूदेवी यांचे तत्त्व कार्यरत होऊन ते कुंडातील कमळ आणि दिवा यांनी ग्रहण केले. त्यामुळे कमळामध्ये आणि दिव्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत झाले. तेव्हा वातावरणात गुलाबाचा मंद सुगंध दरवळत होता.

७. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या ठिकाणी शेषावर पहुडलेल्या श्री महाविष्णूचे दर्शन होणेे आणि त्याच्या नाभीतून कमळ उमलतांना दिसणे

कमलपिठाच्या ठिकाणी दीपस्थापनेचा विधी संपत आला, तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या ठिकाणी शेषावर पहुडलेल्या महाविष्णूचे दर्शन झाले आणि त्याच्या नाभीतून कमळ उमलतांना दिसले. नाभीस्थित कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाने दोन्ही हात जोडून श्रीमन्नारायणाला भावपूर्ण नमस्कार केला. हे दृश्य पहातांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या श्‍वेत कांतीचे रूपांतर नीलकांतीमध्ये झाले आणि सर्वत्र श्रीविष्णूला प्रिय असणार्‍या गुलाबाचा सुगंध दरवळत होता. या सुगंधामुळे वातावरणाची शुद्धी होऊन उपस्थित साधकांची प्राणशक्ती वाढली.

(तिरुपती बालाजीलाही गुलाबाचा हार वाहण्यात येणे : वर्ष २०१७ मध्ये मला मिळालेल्या ज्ञानाच्या एका धारिकेमध्ये श्री महालक्ष्मीदेवीला ‘गुलाब, झेंडू आणि गुलाबी कमळ ही फुले प्रिय असतात’, अशी माहिती मिळाली होती. यावरून श्रीविष्णूलाही लक्ष्मीप्रमाणे गुलाब प्रिय आहे, असे वाटते; कारण गुलाबामध्ये लक्ष्मी आणि विष्णु ही दोन्ही तत्त्व आकृष्ट होतात. त्यामुळे तिरुपती बालाजीलाही गुलाबाचा हार वाहिला जातो. – कु. मधुरा (२०.२.२०१९))

८. सद्गुरुद्वयींनी दीपलक्ष्मीचे षोडशोपचार पूजन करणे

सद्गुरुद्वयींनी कमलपिठामध्ये स्थापन केलेल्या दीपलक्ष्मीचे (दिव्याचे) षोडशोपचार पूजन केले. तेव्हा दिव्यामध्ये आकृष्ट झालेले दीपलक्ष्मीचे तत्त्व आवश्यकतेनुसार पंचमहाभूतांच्या स्तरावर सगुण आणि निर्गुण स्तरांवर कार्यरत झाले. त्यामुळे साधकांना साधना करतांना त्याचा व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर लाभ होणार आहे.

कृतज्ञता

‘हे महालक्ष्मी माते, तू आम्हा सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या रूपात दर्शन दिलेस अन् दिव्याच्या माध्यमातून दीपलक्ष्मीदेवीच्या रूपात दर्शन दिलेस, यासाठी आम्ही साधक तुझ्या सुकोमल चरणी कृतज्ञ आहोत. ‘तुझी कृपादृष्टी आम्हा साधकांवर सदैव अशीच अखंड राहू दे’, अशी तुझ्या श्रीचरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०१८)

(कमलपिठाच्या जलकुंडात लावलेली कमळे ही मूळ कमळे नसून तो कमळाचा एक प्रकार ज्याला ‘वॉटर लिलि’ म्हणतात, तो आहे.- संकलक)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF