मुंबईला स्वच्छता सर्वेक्षणामध्ये ‘३ तारांकित’ शहरांच्या ऐवजी ‘२ तारांकित’ शहरांच्या पंक्तीत स्थान !

कचरा शुल्कवसुलीत पालिका अपयशी

मुंबई – केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’तील स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मुंबईला ३ तारांकित शहरांच्या ऐवजी २ तारांकित शहरांच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे. मुंबई महापालिकेला हे केंद्रीय गृह आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने कळवले आहे.

कचरा वर्गीकरण आणि कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्याचे आवाहन करूनही मुंबईकरांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे ३ तारांकनाच्या निकषांची पूर्तता करता आलेली नाही. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात आणि कचराभूमीचा प्रश्‍नही सोडवण्यात पालिका अपयशी ठरली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरूद मिरवणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे स्थान मिळवलेल्या मुंबईला देशातील २ तारांकित शहरांच्या पंक्तीत बसण्याची नामुष्की ओढवली आहे.

केंद्रीय गृह आणि नागरी मंत्रालयाच्या निकषांनुसार शहरातील ८० टक्के घरांमधून कचरा गोळा करणार्‍या, ५० टक्के कचरा वर्गीकरण करणार्‍या, ५० टक्के कचराकुंड्या असलेल्या आणि ५० टक्के कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत असलेल्या शहराला २ तारांकित शहरांच्या सूचीत स्थान देण्यात येते. आपल्या शहराचे स्थान १ ते ७ तारांकनात निश्‍चित करण्याचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात आले होते. कचरा गोळा करण्यासाठी रहिवाशांकडून किती शुल्क वसूल करण्यात येते, अशीही विचारणा निकषांमध्ये करण्यात आली होती; मात्र कचरा गोळा करण्यासाठी मुंबईकरांकडून शुल्कवसुली करण्यात येत नसल्यामुळे ही अट मुंबईसाठी शिथिल करावी अन्यथा मुंबईला या सर्वेक्षणातून बाहेर पडावे लागेल, असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केंद्रीय गृह आणि नागरी व्यवहार मंत्रालयाला पत्राद्वारे कळवले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now