कीर्तनकारांनी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणे, ही काळाची आवश्यकता ! – सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीक्षेत्र आळंदी येथे कीर्तनकार संमेलन

जय जय राम कृष्ण हरि !
हिंदु राष्ट्राची देऊ ललकारी !!

डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट आणि दीपप्रज्वलन करतांना ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी

श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे), १ मार्च (वार्ता.) – या देशात अल्पसंख्यांकांना घटनात्मक संरक्षण आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना ते नाही. शासनकर्ते आणि न्याययंत्रणा कुठल्याही अभ्यासाविना धर्मविषयक निर्णय घेतात. धर्मविषयक निर्णय घेतांना धर्माचार्यांचे मार्गदर्शन घेतले जात नाही. या जोडीलाच लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद, गोहत्या, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या असे विविध आघात हिंदु धर्मावर होत आहेत. रात्री १० च्या ठोक्याला कीर्तन बंद पाडले जाते, काही वेळा मशिदीसमोरून फेरी नेतांना टाळ-मृदुंग वाजवण्यावर बंदी घातली जाते. मदरशांना अनुदान दिले जाते; पण वारकरी शिक्षण संस्था, वेदपाठशाळा यांना ते मिळत नाही. ही बेगडी धर्मनिरपेक्षता आहे. निरर्थक लोकशाही हे याचे कारण आहे, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हा यावर उपाय आहे; म्हणूनच कीर्तनकारांनी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ मार्च या दिवशी देविदास धर्मशाळेमध्ये एक दिवसीय कीर्तनकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी उपस्थित होते. या एक दिवसीय संमेलनामध्ये ‘हिंदु राष्ट्र विषयक जागृतीमध्ये कीर्तनकारांचे योगदान’, ‘मंदिर सरकारीकरणाचे भयावह परिणाम’, ‘हिंदु धर्मावर आघात करणार्‍या ब्रिगेडी आणि पुरोगामी विचारांचे खंडण’, ‘कीर्तनामधून हिंदु राष्ट्राचा विषय मांडण्याची आवश्यकता’ आदी विषयांवर विचारमंथन करण्यात आले. हरिकथेच्या माध्यमातून संतविचारांचा प्रसार करणार्‍या कीर्तनकारांमध्ये हिंदु धर्मावरील आघात आणि हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता यांविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन करून संमेलनाला आरंभ करण्यात आला.

सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी हिंदु धर्मावरील ‘लव्ह जिहाद’ या संकटाविषयी जागृती करतांना सांगितले, ‘‘विविध माध्यमांतून हिंदु मुलींना फूस लावून धर्मांतरित केले जाते आणि त्यांचे पुढचे जीवन अतिशय खडतर बनते. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून संघटित होणे आवश्यक आहेे.’’ ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी ‘कीर्तनाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करा आणि दुष्ट प्रवृत्तींचे कसे निर्मूलन होईल, ते पहा’, असे मत व्यक्त केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ आध्यात्मिक दृष्टीकोनातून सांगितली.

संमेलनाला उपस्थित कीर्तनकार

या संमेलनाला हिंदुभूषण श्याम महाराज राठोड, ह.भ.प. निरंजनशास्त्री कोठेकर, राष्ट्रीय वारकरी सेनेचे श्री. माऊली महाराज मुरेकर, ह.भ.प. कैलास महाराज ढगे, राष्ट्रीय वारकरी सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ह.भ.प. बाळू महाराज पाटील, ह.भ.प. सुदाम महाराज नानेकर, ह.भ.प. सुरेश महाराज नानेकर, ह.भ.प. नवनाथ महाराज शिंदे, ह.भ.प. नितीन महाराज कदम यांच्यासह अनेक कीर्तनकार आणि भावी प्रवचनकार उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now