सीमेवरील तणाव आणि राज्याची सुरक्षितता यांसाठी विधीमंडळाचे अधिवेशन संस्थगित !

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचा एकमताने निर्णय !

मुंबई येथे १७ जूनला पुढील अधिवेशन !

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर येथे चालू असलेले विधीमंडळाचे अधिवेशन २८ फेब्रुवारीला संस्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या सर्वानुमते घेण्यात आला आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात घोषित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला याविषयीचा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. ‘अधिवेशन संस्थगित करण्यामागे कोणतीही भीतीची भावना नाही. राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण वाढू नये आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध व्हावे, या कारणामुळे अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. पुढील अधिवेशन मुंबई येथे १७ जूनपासून चालू होणार आहे.

अधिवेशन स्थगित करण्याविषयीचा प्रस्ताव मांडतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुलवामा आणि भारतीय वायूसेनेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशा घटनानंतर गेल्या २ दिवसांपासून सीमेवर तणावाचे वातावरण आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असल्याने येथे सुरक्षितता अबाधित ठेवणे आवश्यक आहे. विधीमंडळाचे अधिवेशन चालू झाल्यानंतर अधिवेशनाच्या सुरक्षिततेसाठी जवळपास ६ सहस्र पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. इतर आंदोलनाच्या वेळीही पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यामुळे राज्याचे अधिवेशन चालू असतांना नेहेमीच सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण येत असतो. भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मुंबई आणि राज्यातही अतीदक्षतेची चेतावणी (हाय अलर्ट) देण्यात आली होती. या संदर्भात पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, गुप्तचर विभागातील पोलीस अधिकारी यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या बैठकीत सर्व परिस्थिती कथन केली. त्यानंतर पोलिसांना मोकळीक देण्याच्या उद्देशाने अधिवेशन संस्थगित करण्याचा विचार केला. अधिवेशन संस्थगित केल्यास पोलिसांना मोकळीक मिळून अधिकचे बळ उपलब्ध होईल. याविषयी विचार करण्यासाठी २७ फेब्रुवारीला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर विरोधी पक्षांचे नेते आणि गटनेते यांची बैठक पार पडली. राज्यात सुरक्षेविषयी अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असल्यानेच अधिवेशनाचे कामकाज आटोपते घ्यावे, असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा न होता विरोधी पक्ष नेत्यांनी पटलावर भाषणाची प्रत ठेवली !

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अन् सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाला पाठिंबा घोषित केला. कामकाज सल्लागार समितीने ठरवलेल्या कामकाजानुसार २ मार्चपर्यंत चालणार होते. अंतरिम अर्थसंकल्प, राज्यातील दुष्काळ अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांवर आज विधानसभेत चर्चा होणार होती; मात्र अधिवेशन संस्थगित केल्याने या विषयांवर चर्चा न करता राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वतःच्या भाषणाची प्रत पटलावर ठेवली. या वेळी विधानसभा अध्यक्षांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या भाषणावर लेखी स्वरूपात उत्तर देण्यास सांगितले.

अधिवेशनाच्या काळात सुरक्षिततेसाठी ६ सहस्र पोलिसांचा अधिक बंदोबस्त का लागतो ? – जयंत पाटील

राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की, सीमेवरील तणावाच्या अनुषंगाने पोलिसांना मोकळीक देण्यासाठी अधिवेशन संस्थगित करण्यात आले; मात्र अधिवेशनाच्या काळात सुरक्षिततेसाठी ६ सहस्र पोलिसांचा एवढा अधिक बंदोबस्त का लागतो ?, याची मुख्यमंत्र्यांनी मला नंतर माहिती द्यावी. आम्ही सर्व विरोधक भारतीय सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सद्यस्थितीत जनतेला सुरक्षितता महत्त्वाची आहे. राज्यात काहीच झालेले नाही. त्यामुळे अशा प्रसंगी कोणतेही राजकीय वळण लागू नये.

पाकिस्तानने कह्यात घेतलेल्या भारतीय पायलटला सोडावे ! – मुख्यमंत्री

पाकिस्तानच्या कह्यात असलेला भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडून द्यावे, तसेच पाकिस्तान करत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन त्वरित थांबवावे याविषयीचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांचा हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी घोषित केले.

अदृष्य पत्रकारांनी ‘भीतीदायक स्थिती आहे’, असे वृत्त देऊ नये ! – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विधानसभेतील पत्रकार कक्षातील ‘अदृष्य’ असलेल्या पत्रकारांनी वृत्त सिद्ध करत असतांना ‘राज्यात भीतीदायक स्थिती आहे’, असे वृत्त देऊ नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now