पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये ! – राज ठाकरे

पाकने गेली ७१ वर्षे प्रतिदिन त्याने सीमेवर आक्रमणे करून भारताशी छुपे युद्ध चालू ठेवले आहे. आतापर्यंत सहस्रो वेळा शस्त्रसंधी मोडणार्‍या पाकला छुपे युद्धच करायचे आहे. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच रहाते. पाक चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही, असेच जनतेला वाटते !

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये. पाकिस्तानची खरंच चर्चेची सिद्धता असेल, तर त्यासाठी पहिले पाऊल हे त्यानेच उचलायला हवे. त्यांनी वैमानिक अभिनंदन यांना तात्काळ सोडले पाहिजे आणि सीमारेषेवरचा गोळीबार त्वरित थांबलाच पाहिजे. जर या गोष्टी घडल्या, तरच म्हणता येईल इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत (आतंकवाद्यांना पोसणार्‍या पाकच्या पंतप्रधानांचा हेतू स्वच्छ असेल, असे भारतीय जनतेला वाटत नाही ! – संपादक) आणि तसे घडले, तर पंतप्रधान मोदींनी ही संधी गमावता कामा नये, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

भारतीय वायूसेनेने भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची विमाने पिटाळून लावल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी वरील आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेझ मुशर्रफ यांच्या काळात आली होती. युद्ध हे कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनताही भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारे नाही. (गेल्या ७० वर्षांत आतंकवादी आक्रमणांमुळे भारताची जी हानी झाली आहे, तीही परवडणारी नाही ! अशा पाकला कायमचा धडा शिकवणे, हाच भारतियांच्या संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF