सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या अतिथी कक्षामधील कमळ पुष्कळ दिवस टवटवीत आणि तजेलदार रहाणे (संतांच्या वास्तूतील चैतन्याचे महत्त्व)

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या अतिथी कक्षामध्ये शेषशायी विष्णूच्या प्रतिमेसमोर ठेवलेले कमळ ५ दिवस उमललेल्या आणि टवटवीत स्थितीत राहिले. ‘सद्गुरूंच्या कक्षात ठेवलेल्या कमळावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीचे स्वरूप

कमळाच्या पुढील दिवशी काढलेल्या छायाचित्रांद्वारे ही चाचणी करण्यात आली.

अ. पूर्ण उमललेल्या कमळाचे २६.१.२०१९ आणि २९.१.२०१९ या दिवशी काढलेले छायाचित्र

आ. कोमेजलेल्या कमळाचे ३०.१.२०१९ या दिवशी काढलेले छायाचित्र

१५.२.२०१९ या दिवशी वरील तिन्ही छायाचित्रांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

२. कमळाच्या छायाचित्रांच्या केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

१. २६.१.२०१९ आणि २९.१.२०१९ या दिवशी काढलेल्या कमळाच्या छायाचित्रांत ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२. ३०.१.२०१९ या दिवशी काढलेल्या कोमेजलेल्या कमळामध्ये वरील दोन्ही प्रकारच्या नकारात्मक उर्जा निर्माण झाल्याचे लक्षात आले. कमळामधील ‘इन्फ्रारेड’ उर्जेची प्रभावळ ३ मीटर, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ उर्जेची प्रभावळ १.३८ मीटर होती.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. तीन वेगवेगळ्या दिवशी काढलेल्या कमळाच्या छायाचित्रात असलेल्या सकारात्मक ऊर्जेची स्थिती पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. पूर्णतः उमललेल्या कमळाच्या २६.१.२०१९ या दिवशी काढलेल्या छायाचित्राच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४.६१ मीटर होती.

२. त्यानंतर ३ दिवसांनी (२९.१.२०१९ या दिवशी) कमळाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत २.३९ मीटरने वाढ झाली.

३. कोमेजलेल्या कमळाचे ३०.१.२०१९ या दिवशी काढलेल्या छायाचित्रामध्ये सकारात्मक उर्जा आढळली नाही.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून ती व्यक्ती वा वस्तू यांची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. पूर्णतः उमललेल्या कमळाच्या २६.१.२०१९ या दिवशी काढलेल्या छायाचित्राची एकूण प्रभावळ ८ मीटर होती. याचा अर्थ सामान्य वस्तूच्या एकूण प्रभावळीच्या तुलनेत या कमळाची एकूण प्रभावळ ७ मीटर अधिक होती.

२. तीन दिवसांनी (२९.१.२०१९ या दिवशी) कमळाच्या एकूण प्रभावळीत १.४९ मीटरने वाढ झाली.

३. कोमेजलेल्या कमळाच्या ३०.१.२०१९ या दिवशी काढलेल्या छायाचित्राच्या एकूण प्रभावळीत ५.४६ मीटरने घट झाली.

३. निष्कर्ष

अ. कमळ हे अत्यंत सात्त्विक पुष्प असल्याने त्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

आ. फुलांचे जीवन अगदी अल्प, म्हणजे साधारण १ – २ दिवसांचे असते. त्यानंतर ती कोमेजतात. कोमेजलेल्या फुलांमध्ये सात्त्विकता टिकून रहात नाही. असे असतांनाही ३ दिवसांनी (२९.१.२०१९ या दिवशी) कमळाच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या कक्षातील वातावरणही चैतन्यमय झाले आहे. तेथील सात्त्विकतेचा कमळावर सकारात्मक परिणाम झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि एकूण प्रभावळ यांमध्ये वाढ झाली.

इ. ३०.१.२०१९ या दिवशी कमळात नकारात्मक ऊर्जा आढळली. याचे कारण कोमेजलेल्या फुलामध्ये चैतन्य टिकून रहात नाही. फूल कुजण्याची प्रक्रिया चालू झाल्याने कमळामध्ये नकारात्मक स्पंदने निर्माण झाली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.२.२०१९)

ई-मेल : [email protected]

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now