सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कक्षात पूर्ण उमललेल्या कमळाचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘२६.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या कक्षात एक गुलाबी रंगाचे कमळ पूर्ण उमलले होते. सनातनच्या रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात हे कमळ सर्वांना पहाण्यासाठी ठेवण्यात आले होते. देवाच्या कृपेने माझ्याकडून या कमळाचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीमध्ये पूर्ण उमललेल्या कमळाची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

कु. मधुरा भोसले

१. कमळाचा रंग गडद गुलाबी होता. कमळाचा रंग आणि आकार यांकडे ५ टक्के इतके लक्ष्मीतत्त्व आकृष्ट होऊन ते कमळामध्ये कार्यरत झाले होते.

२. कमळाच्या सर्व पाकळ्या उमलल्या होत्या, म्हणजे कमळामध्ये कार्यरत असणारे लक्ष्मीतत्त्व पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले होते. कमळातील शक्ती आणि चैतन्य दशदिशांना प्रक्षेपित होतांना जाणवले.

३. कमळाकडे पहातांना त्यांतून तारक-मारक शक्ती, चैतन्य आणि आनंद यांच्या संमिश्र लहरी वातावरणात प्रक्षेपित होतांना जाणवल्या. त्यामुळे कमळाच्या सभोवतालच्या वातावरणाची शुद्धी होत असल्याचे जाणवले.

४. जेव्हा कमळामध्ये तारक शक्ती कार्यरत होती, तेव्हा वातावरणात गोड सुगंध दरवळत होता. जेव्हा कमळामध्ये मारक शक्ती कार्यरत होती, तेव्हा वातावरणात उग्र सुगंध दरवळत होता.

५. कमळाच्या अस्तित्वामुळे भोजनकक्षामध्ये श्री लक्ष्मीलोकाचे वातावरण सूक्ष्मातून निर्माण झाले होते आणि सर्वत्र श्री लक्ष्मीतत्त्वाचा गुलाबी रंगाचा दिव्य प्रकाश पसरला होता.

६. कमळाच्या मध्यभागावर अंगठ्याच्या उंचीइतके श्री लक्ष्मीदेवीचे सूक्ष्म रूप विराजमान झाल्याचे दिसत होते. गुलाबी रंगाचे कमळ हे लक्ष्मीदेवीचे आसन असल्यामुळे त्यामध्ये मला लक्ष्मीदेवीचे दर्शन झालेे. या देवीचा तोंडवळा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तोंडवळ्याप्रमाणे दिसत होता. कमळावर विराजमान झालेल्या देवीचे नाव ‘कमलविलासिनी महालक्ष्मी देवी’ असल्याचे मला जाणवले.

७. जेव्हा आश्रमावर सूक्ष्मातून वाईट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे चालू झाली, तेव्हा या कमळातून ‘पद्मास्त्र’ नावाचे अस्त्र प्रकट झाले. या अस्त्राचा पुढचा भाग तलवारीप्रमाणे धारदार होता आणि मागील भाग कमळाच्या पाकळ्या अन् देठ यांप्रमाणे आकार होता. श्री महालक्ष्मीदेवीने हे पद्मास्त्र सोडून साधकांवर अदृश्य रूपाने आक्रमणे करणार्‍या ५ व्या आणि ६ व्या पाताळातील वाईट शक्तींना विनाश केला.

८. कमळामध्ये प्रकट झालेल्या श्री महालक्ष्मीच्या अंगुष्ठामात्र लघुरूपाची संकल्पशक्ती कार्यरत झाल्यावर संपूर्ण आश्रमामध्ये गुलाबी रंगाचा प्रकाशझोत पसरला आणि या प्रकाशाने संपूर्ण आश्रमाला व्यापून टाकले. अशा प्रकारे सनातनच्या आश्रमाभोवती लक्ष्मीतत्त्वाची शक्ती आणि चैतन्य यांचे संरक्षककवच निर्माण झाले.

कृतज्ञता

‘हे भगवंता, तुझ्या लीला तूच उलगडून दाखवतोस आणि आम्हा पामरांना त्यांचा भावार्थ सांगतोस ! यासाठी आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०१९, रात्री ११)


Multi Language |Offline reading | PDF