देशाचे रक्षण करणार्‍या सैनिक कुटुंबाच्या पाठीशी उभे रहा ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते

ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते

पंढरपूर – कीर्तनकार आणि प्रवचनकार हे वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार करतात, तसेच कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजाचे प्रबोधन करतात. कीर्तनकारांनी अखंड हरिनाम सप्ताहात सैनिक कुटुंबांचा गौरव करायला हवा. सैनिकांची लहान मुले, वयस्कर माता-पिता यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगात आपण त्यांच्या समवेत आहोत, त्यांचा कुटुंबप्रमुख देशाच्या रक्षणासाठी दूर असला, तरी देशातील नागरिकांना याची जाणीव आहे, असा विश्‍वास निर्माण करण्यासाठी सर्व कीर्तनकार, प्रवचनकार आणि कथाकार यांनी समाजाला शिकवण द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी एका प्रसिद्धीपत्रकात केले.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, अनेक मठ, मंदिरे, देवस्थान यांनी सैनिकांना त्वरित साहाय्य केले, याविषयी त्यांचे अभिनंदन ! जनतेने सैनिकात नूतन भरती होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना मैदानी खेळ, साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. आमचा धर्म, राष्ट्र आणि सैनिक यांचे रक्षण व्हावे, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना ! हुतात्मा झालेल्या सर्व वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच त्यांच्या माता-पित्यांना वंदन ! सर्व हुतात्म्यांच्या ऋणांची जाणीव धर्मनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ यांच्या हृदयात आहे.


Multi Language |Offline reading | PDF