६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गुडगाव (हरियाणा) येथील कु. ईश्‍वरी जीवन तळेगावकर (वय १२ वर्षे) !

कु. ईश्‍वरी तळेगावकर

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ईश्‍वरी तळेगावकर ही एक आहे !

माघ पौर्णिमा, म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशी गुडगाव (हरियाणा) येथील बालसाधिका कु. ओवी जीवन तळेगावकर (वय ६ वर्षे) आणि कु. ईश्‍वरी जीवन तळेगावकर (वय १२ वर्षे) या दोघी बहिणींनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे एका सोहळ्यात घोषित करण्यात आले. या सोहळ्याच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हेही उपस्थित होते. यातील कु. ओवी जीवन तळेगावकर आणि कु. ईश्‍वरी जीवन तळेगावकर यांचा कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी (२२.११.२०१८) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस झाला.

वाढदिवसानिमित्त २६.२.२०१९ या दिवशी आपण कु. ओवी हिची तिचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज कु. ईश्‍वरी  हिची गुणवैशिष्ट्ये पाहुया.

‘६१ टक्के पातळीच्या कु. ईश्‍वरी आणि कु. ओवी जीवन तळेगावकर या दोघी दैवी बहिणींची जन्मतिथी दोघींत ६ वर्षांचे अंतर असूनही एकच आहे. हे एक आश्‍चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

१. जन्मापूर्वी

१ अ. संतांचा सत्संग लाभणे : ‘गर्भारपणात मी प्रतिदिन सेवेसाठी ठाणे सेवाकेंद्रात जात होते. तेव्हा मला नियमितपणे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा सत्संग लाभला.’ – सौ. स्वप्नजा जीवन तळेगावकर (आई), गुडगाव, हरियाणा.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ मास : ‘कु. ईश्‍वरी हिला वाईट शक्तींचा त्रास असल्यामुळे ती रडत असे. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केल्यावर ती शांत होत असे; मात्र नामजप थांबल्यावर ती पुन्हा रडत असे.

२ आ. वय १ ते ३ मास – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पहायला आवडणे : तिला जन्मतःच साधनेची ओढ आहे. तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पहायला आवडत असे. तिला ‘परात्पर गुरु डॉक्टर कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर ती डोळे वर करून त्यांच्या छायाचित्राकडे पहात असे.

२ इ. वय ३ मास ते १ वर्ष

२ इ १. साधनेची आवड : तिची आजी नामजप करतांना ती शांत बसून नामजप ऐकत असे. ती रडत असतांना नामजप केल्यावर शांत होत असे. ती प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत झोपत असे. ही भजने लावली नाहीत, तर ती झोपत नसे. तिचे पोट दुखत असतांना तिच्या पोटावर हात ठेवून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर ती शांत होत असे.

२ इ २. विविध स्पर्धांत पारितोषिके मिळणे : गाणे लावल्यावर ती त्या तालावर नृत्य करत असे. जणूकाही ती नृत्य करायला शिकली होती. ती ११ मासांची असतांना गणेशोत्सवात तिला सुदृढ बालक, ‘डान्सिंग डॉल’ आणि ‘क्युट बेबी’ या स्पर्धांत प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली होती.

२ ई. वय १ ते ४ वर्षे

२ ई १. देवाची ओढ : तिला श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि गीतेचे ४ अध्याय मुखोद्गत होते. तिला लहानपणापासूनच कृष्ण आवडतो. ती कृष्णाशी खेळत असे. ती कृष्णाच्या मूर्तीला सुंदर हार करून घालत असेे. ती त्याची बासरी रंगवत असे. ती त्याचे मडके छान सजवत असे. घरी लोणी काढल्यावर ती कृष्णाला लोणी भरवत असे. ती मूर्तीला तुळशीचे पान मंजुळेसहित वाहात असे.

२ ई २. प्रेमभाव : तिला सर्वांविषयी प्रेम वाटते. एखादी व्यक्ती तिला भेटल्यावर ती तिच्या तोंडवळ्यावरून हात फिरवून प्रेम व्यक्त करते. ती घरी आलेल्या पाहुण्यांचे प्रेमाने स्वागत करून त्यांना पाणी आणि सरबत देते.

२ उ. वय ४ ते १२ वर्षे

२ उ १. शिकण्याची आणि अभ्यासू वृत्ती : ती तिच्या वडिलांकडून संस्कृत श्‍लोक शिकते. तिची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. ती नुसते प्रश्‍नोत्तरे पाठ करत नाही, तर ती त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करते आणि तो लक्षात ठेवून उत्तर लिहिते.

२ उ २. जिज्ञासा : ती लहानपणापासूनच एखादी गोष्ट अनेक प्रश्‍न विचारून जाणून घेते आणि आचरणात आणते, उदा. स्वदेशी वस्तू का वापरायच्या ? वाढदिवसाला केक का कापू नये ? कपाळावर कुंकू का लावावे ?

२ उ ३. सतत कार्यरत : तिला वेळ वाया घालवायला आवडत नाही. ती फावल्या वेळेत वाचन करते.

२ उ ४. धार्मिक आणि राष्ट्रपुरुषांवरील ग्रंथांच्या वाचनाची आवड : तिला रामायण, महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे ग्रंथ वाचण्याची आवड आहे. तिला महाभारतातील सर्व प्रसंग गोष्टीरूपात ठाऊक आहेत. तिला महाभारत आणि रामायण या विषयांवर कोणताही प्रश्‍न विचारला, तरी ती अचूक उत्तर देते.

२ उ ५. कलागुण

२ उ ५ अ. तिचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.

२ उ ५ आ. गायन : ती लहानपणी ‘विठोबा लागो तुझा हा छंद’ हे भजन म्हणत असे. ती ५ वर्षांची असतांना तिने तिच्या बहिणीच्या (ओवीच्या) नामकरण सोहळ्यात श्रीकृष्णाचा पाळणा म्हटला होता. आता ती शास्त्रीय गायन करते, तसेच राष्ट्रभक्तीपर गीते तालबद्ध गाते.

२ उ ५ इ. नृत्यकला : ती भरतनाट्यम् आणि कथ्थक हे नृत्यप्रकार सहजतेने करते. नृत्य सिद्ध करून ती ते उत्कृष्टपणे सादर करते, उदा. गणेशोत्सवात गणेशपूजनाचे नृत्य, नवरात्रात महिषासुरमर्दिनीचे नृत्य इत्यादी. तिला इतरांचेही नृत्य सहजतेने बसवता येते.

२ उ ५ ई. चित्रकला : ती श्रीकृष्ण, दुर्गादेवी, गुरुदेव यांची चित्रे, तसेच पू. उमाक्कांनी काढलेली चित्रे आणि रांगोळ्या अल्प वेळेत अन् सहजतेने काढते. ती हिंदु राष्ट्रातील चित्रे शीर्षकांसहित काढते.

२ उ ५ उ. विविध विषयांवर प्रात्यक्षिके (डेमॉन्स्ट्रेशन) सादर करणे : ती कोणत्याही विषयावर प्रात्यक्षिके (डेमॉन्स्ट्रेशन) सादर करते, उदा. आगाशीत लावलेल्या बगिच्याची ओळख, (तिने स्वतः चलत्चित्र (व्हिडीओ) सिद्ध करून सादर केला आहे.) दिवाळीत बनवलेला किल्ला इत्यादी

२ उ ५ ऊ. वक्तृत्वकला : ती आंतरशालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेते. ती कुठल्याही विषयावर अभ्यासपूर्ण आणि सर्वांना नीट समजेल, अशा प्रकारे बोलते.

२ उ ६. इतरांना आनंद देणे : ती इतरांच्या वाढदिवसाला सुंदर आणि सात्त्विक शुभेच्छापत्र बनवून सुंदर ‘पॅकिंग’ करून देते.

२ उ ७. धर्माचरणाची आवड आणि सात्त्विकतेची ओढ : ती कपाळाला कुंकू लावते. ती जेवणापूर्वी श्‍लोक म्हणते आणि संध्याकाळी स्तोत्र म्हणते. ती प्रतिदिन रांगोळी काढते. ती प्रतिदिन एक घंटा नामजप करते. तिला सात्त्विक रंग, कपडे आणि घरचे खाणे आवडते. तिला घराला आश्रम बनवायला, भाववृद्धी सत्संग ऐकायला आणि सेवा करायला आवडते. ती घरात सतत नाविन्यपूर्ण पालट करून घर व्यवस्थित ठेवते.

२ उ ८. ती भ्रमणभाषवर देवीकवच आणि आश्रमातील आरती लावते अन् ते म्हणत पूजा करते.

२ उ ९. सूक्ष्मातील जाणणे : तिला सात्त्विक व्यक्ती आणि घर ओळखता येते.

 २ उ १०. भाव

अ. नामजप लिहितांना ‘एकाच वेळी ३ वेळा नामजप होतो’, असा तिचा भाव असतो.

आ. तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एखादी गोष्ट आवडत नाही’, असे सांगितल्यावर ती गोष्ट ती कधीच करत नाही, उदा. केस मोकळे सोडणे, केक कापणे, बाहेरचे खाणे इत्यादी.

इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधक बनण्यासाठी काय करायला सांगितले ?’, हे विचारून ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करते.

ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी तिला कुणीही न सांगता तिने फुले तोडून आणून गुरुदेवांच्या चरणी वाहिली.

 ३. स्वभावदोष

भावनाशीलता आणि राग येणे’

– श्री. जीवन अन् सौ. स्वप्नजा तळेगावकर (आई-वडील), गुडगाव, हरियाणा आणि श्री. गणेश अन् सौ. छाया देशपांडे (आजोबा-आजी), संभाजीनगर (१४.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF