पाकमधील आमची कारवाई आतंकवाद्यांच्या विरोधात ! – सुषमा स्वराज

वुझेन (चीन) – आम्ही पाकिस्तानच्या सैन्यावर आक्रमण केलेले नाही. हे युद्ध नाही. भारताच्या विरोधात पुन्हा आतंकवादी आक्रमणाच्या सिद्धतेत असलेल्या जैश-ए-महंमदला धडा शिकवणे, हा आक्रमणामागचा उद्देश होता. आम्ही पाकिस्तानला वारंवार सांगूनही त्याने आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागली. आम्हाला परिस्थिती आणखी चिघळवायची नाही. आम्ही यापुढेही दायित्वाने आणि संयमाने वागत राहू, असे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केले. त्या सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत. या वेळी त्यांनी पाकवर केलेल्या कारवाईविषयी चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली. या तिन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची येथे बैठक चालू आहे. चीनकडून सातत्याने पाकपुरस्कृत आतंकवादाची पाठराखण केली जात आहे. मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासही चीनने नकार दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या प्रतिनिधीने चीनमध्ये जाऊन जैशवरील कारवाईविषयी सांगणे महत्त्वाचे मानले जात आहे.

(म्हणे) ‘भारत आणि पाक यांनी संयम बाळगावा !’ – चीन

भारत आणि पाक दक्षिण आशियातील महत्त्वाचे देश असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होणे येथील शांततेसाठी आवश्यक आहे. दोन्ही देशांनी संयम पाळणे आवश्यक आहे. दोन्ही देश परिस्थितीची जाणीव ठेवत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी व्यक्त केली. ‘भारताने आंतरराष्ट्रीय सहकार्याने आतंकवादाच्या विरोधातील मोहीम चालूच ठेवावी’, असेही ते म्हणाले. (चीन यासाठी सहकार्य का करत नाही ? मसूद अझहर याला आतंकवादी ठरवण्यास तो संमती का देत नाही, यावर त्याने प्रथम सांगावे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF