प्रयागराज येथील कुंभमेळ्यात प्रसारासाठी गेलेले सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी वसंतपंचमीच्या दिवशी अनुभवला श्री गुरुपरंपरेचा शुभाशीर्वाद !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात १०.२.२०१९ या वसंतपंचमीच्या शुभ मुहूर्तावर परात्पर गुरुदेवांचा ‘पादुका-धारण’ सोहळा झाला आणि १२.२.२०१९ या दिवशी पादुका-पूजनाचा सोहळा होता. त्या दिवशी आम्ही प्रयागराज येथे व्यस्त असल्याने संगणकीय प्रणालीद्वारे दाखवण्यात आलेला कार्यक्रम पाहू शकलो नव्हतो. नंतर हा सोहळा पाहिला, तेव्हा त्यात वसंतपंचमीच्या दिवशी गुरुपरंपरेचे आवाहन आणि आशीर्वाद मिळाल्याविषयी माहितीपट दाखवण्यात आल्याचे लक्षात आले. प्रत्यक्षात वसंतपंचमीच्या दिवशी ‘प.पू. भक्तराज महाराजच (प.पू. बाबाच) नव्हे, तर संपूर्ण गुरुपरंपराच कुंभक्षेत्रातील सनातन संस्थेच्या तंबूमध्ये सर्व साधकांना आशीर्वाद देण्यास येणार आहे’, असे वाटत होते.

श्री गिरिजानंद गिरि (उजवीकडे बसलेले) यांच्याशी वार्तालाप करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
स्वामी राम रसिकदासजी (उजवीकडे बसलेले) यांच्याशी वार्तालाप करतांना डावीकडून पू. नीलेश सिंगबाळ आणि मध्यभागी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. श्रीक्षेत्र द्वारका येथील तपस्वी श्री गिरिजानंद गिरि हे श्री अनंतानंद साईश (प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु) यांच्या रूपात आल्याचे जाणवणे आणि कधीही सत्कारादी उपचार करवून न घेणार्‍या तपस्वींनी सनातन संस्थेचा प्रेमळ आग्रह स्वीकारून सत्कार करवून घेणे

वसंतपंचमीच्या दिवशी सकाळी श्रीक्षेत्र द्वारका येथील तपस्वी श्री गिरिजानंद गिरि हे सनातन संस्थेच्या तंबूत आले होते. येथे येणार्‍या अन्य तपस्वींपेक्षा ते वेगळे वाटले. त्यांच्याकडे पाहून साक्षात श्री अनंतानंद साईश (प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु) आल्याचा भास होत होता. तेव्हा ‘द्वारकेचा राणा श्रीकृष्ण’ हाच श्री अनंतानंद साईश यांच्या रूपात साधकांना आशीर्वाद देण्यास आल्याचे आतून जाणवत होते. ते तपस्वी म्हणाले, ‘‘आज मी तिसर्‍यांदा येथे येत आहे. हे सर्व कार्य आवडल्याने मी पुनःपुन्हा येत आहे.’’

कु. कृतिका खत्री यांनी सत्काराचे साहित्य आणले, तेव्हा त्यांच्या समवेत असलेला भक्त म्हणाला, ‘‘गेल्या ३० वर्षांपासून मी त्यांना पहात आहे. महाराज सत्कारादी काहीच करवून घेत नाहीत.’’ मी त्यांना कुंकुमार्चन करण्यास जवळ गेलो, तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी असे काही करू देत नाही. या गोष्टीत अध्यात्म नसते.’’ त्यावर मी त्यांना प्रेमाने आग्रह करत म्हणालो, ‘‘मी तर या धर्मकार्याला आशीर्वाद द्यायला आलेल्या द्वारकेचा राजा कृष्णाचा सत्कार करत आहे, तुमच्या देहाचा नाही. ‘तुमच्या रूपाने सनातन संस्थेची गुरुपरंपरा आज येथे आली आहे’, असा आमचा भाव आहे. आज आमच्या प.पू. भक्तराज महाराजांचा प्रकट दिनही आहे.’’ त्यावर ते म्हणले, ‘‘ठीक आहे, तुम्ही कुंकुम लावा.’’ त्यांच्या समवेत असलेला भक्त आश्‍चर्यचकित झाला. त्यानंतर मी त्यांना हार घालू लागलो, तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे नको.’’ ‘नाही, नाही’, असे म्हणत त्यांनी हार घालून घेतला. नंतर त्यांनी त्यांची छायाचित्रे काढण्यासही अनुमती दिली.

त्यांचा भक्त म्हणाला, ‘‘गेल्या ३० वर्षांमध्ये मी महाराजांना ना सत्कार करून घेतांना पाहिले, ना छायाचित्रे काढू देतांना पाहिले. त्यांचे छायाचित्र माझ्याजवळसुद्धा नाही.’’ यावरून लक्षात आले, ‘आज सकाळी द्वारकेहून साक्षात भगवान श्रीकृष्ण ‘श्री अनंतानंद साईश’ यांच्या रूपात आला आणि त्याने संस्थेकडून पूजा स्वीकारून साधकांना आशीर्वादही दिला !’

२. अयोध्येचे स्वामी राम रसिकदासजी यांच्या रूपात ‘श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद’ (श्री अनंतानंद साईश यांचे गुरु) आल्याचे जाणवणे

वसंतपंचमीच्या रात्री अयोध्येचे स्वामी राम रसिकदासजी आले होते. त्यांनी येतांना लाडू आणले होते. त्यांनी येथील सर्व साधकांना लाडू वाटले. या आधीही ते २ – ३ वेळा सनातन संस्थेच्या तंबूत आले होते. प्रत्येक वेळी ते ग्रंथ निवडून खरेदी करून जात होते. वसंतपंचमीच्या आदल्या रात्रीही ते आले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘या देशात केवळ रामाची सत्ता आहे. आम्ही रामाची सत्ता मानतो. वर्तमान राज्यघटनेनुसार चाललेले राज्य आम्ही मानत नाही. ‘रामचरित मानस’ ही आमची राज्यघटना आहे. आमच्या राज्यघटनेप्रमाणे स्त्रीची छेड काढणार्‍याला ‘देहदंड’ हीच शिक्षा आहे. आपण ‘रामचरित मानसा’नुसार राज्यकारभार केला पाहिजे.’’ त्यांनी सनातन संस्थेवर आणि साधकांवर पुष्कळ प्रेम केले. वसंतपंचमीच्या दिवशी ते साधकांसाठी लाडू घेऊन आले. ‘प्रत्यक्षात त्यांच्या रूपात अयोध्येहून ‘प्रभु श्रीराम’च आले’, असे वाटले. त्यांच्या रूपात ‘श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद’ (श्री अनंतानंद साईश यांचे गुरु) आल्याचे जाणवले. पू. नीलेश सिंगबाळ आणि अन्य साधकांशी बोलतांनाही ‘आज वसंतपंचमीच्या दिवशी गुरुपरंपराच येत आहे’, असे वाटत होते.

३. विदर्भातील कौडण्यपूर या रुक्मिणीमातेच्या माहेरगावाहून श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी आणि राम राजेश्‍वराचार्य (माऊली सरकार) यांनी येऊन आशीर्वाद देणे आणि त्यांच्या रूपात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आल्या’, असे जाणवणे

वसंतपंचमीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी श्री रुक्मिणी विदर्भ पीठ (कौडण्यपूर, जिल्हा अमरावती), म्हणजे श्री रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौडण्यपूर येथील श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी आणि राम राजेश्‍वराचार्य (माऊली सरकार) आले होते. यांचा एक आश्रम बडवाह (मध्यप्रदेश) येथेही आहे. ते येण्यापूर्वी ‘आज प.पू. भक्तराज महाराज येणार असून येतांना ते श्री रुक्मिणीदेवीची शक्ती घेऊन येतील’, असे वाटले. ‘श्री गुरुदेव (परात्पर गुरुदेव (डॉ.) आठवले) ‘राम’ आणि ‘कृष्ण’ यांच्या स्थानांतून गुरुपरंपरेच्या रूपात आले, तर श्री रुक्मिणीदेवी पीठ स्वरूपात आदिशक्ती गुरुमाता सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आल्या’, असे वाटले.

४. ‘पादुका-धारण’ सोहळ्याचा कार्यक्रम २ दिवसांनी पाहिल्यावर त्यातही गुरुपरंपरेला आवाहन केलेले असणे आणि वरील अनुभूती आशीर्वादस्वरूप असल्याचे लक्षात येणे

आम्ही प्रयागराज येथील सेवेत व्यस्त असल्यामुळे १२.२.२०१९ या दिवशी झालेला ‘पादुका-धारण’ सोहळ्याचा कार्यक्रम २ दिवसांनी पाहिला. प्रत्यक्ष सोहळा पाहिल्यावर वरील अनुभूतींचे महत्त्व लक्षात आले. प्रत्यक्ष झालेल्या या सोहळ्यातही गुरुपरंपरेला आवाहन केले होते. त्या दिवशी श्री गुरुदेवांनी (परात्पर गुरुदेव (डॉ.) आठवले यांनी) श्री पादुका धारण केल्या होत्या. त्याच्याशी या अनुभूतींचा संबंध लक्षात आला. आशीर्वादस्वरूप या अनुभूती आल्या होत्या. तेव्हा हा ‘योगायोग’ नव्हे, तर ‘हा ‘योग’च होता’, हे लक्षात आले.

५. श्री गुरुदेवांनी ‘श्री गुरुपरंपरे’चा उलगडलेला अर्थ

त्या दिवशी ‘श्री गुरुपरंपरा’ या शब्दाचा अर्थही श्री गुरुदेवांनी सांगितला. तो पुढीलप्रमाणे – ‘श्री गुरुपरंपरा’ म्हणजे परावाणीतून मार्गदर्शन करणार्‍या अधिकारी मोक्षगुरूंनी स्थापिलेली परंपरा ! जोपर्यंत परावाणीतून मार्गदर्शन करणारे मोक्षगुरु देहधारी राहून मार्गदर्शन करतात, तोपर्यंत ‘श्री गुरुपरंपरा’ चालू रहाते. त्यानंतर ती हळूहळू लोप पावत जाते.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२१.२.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now