रथसप्तमी आणि माघ पौर्णिमा या दिवशी सूर्याचे दर्शन होण्याच्या माध्यमातून श्रीमन्नारायणाच्या सगुणातील लीलांचा अनुभवलेला अवर्णनीय आनंद !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. माघ पौर्णिमेच्या दिवशी रामनाथी आश्रमात विशेष सोहळा असणे, त्याच्या आदल्या रात्री देहली येथे पाऊस येणे, दुसर्‍या दिवशी सकाळी आकाशात काळे ढग असणे; मात्र अंघोळ करून आल्यावर तळपत्या सूर्याचे दर्शन होणे

‘माघ पौर्णिमा (१९.२.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात दुपारी एक विशेष सोहळा आयोजित केला होता. मी आदल्या रात्री १०.३० वाजता प्रयाग येथून नवी देहली येथे आलो. तेव्हा पाऊस चालू झाला होता. ‘वरुणदेवतेने आज कोणता आशीर्वाद दिला ?’, असा विचार माझ्या मनात आला. दुसर्‍या दिवशी सकाळी ढगाळ वातावरण होते आणि काळे ढग आले होते. मी सकाळी ८.२० वाजता अंघोळ करून बाहेर आलो. मी खिडकीच्या काचेतून आकाशाकडे पहात होतो. तेवढ्यात सर्व ढग बाजूला होऊन मला तळपत्या सूर्याचे दर्शन झाले.

२. ‘रामनाथी आश्रमात असलेल्या विशेष सोहळ्यानिमित्त सूर्यनारायणाने दर्शन देऊन शुभसंकेत दिला’, असे जाणवणे आणि साधकांनी सूर्याचे दर्शन घेतल्यावर २ मिनिटांनी सूर्य ढगाआड जाऊन अंधार होणे

मला लगेच आठवले, ‘आज रामनाथी आश्रमात विशेष सोहळा आहे.’ आजही सूर्यनारायणाने मला दर्शन देऊन शुभसंकेत दिला. मला आत्मस्वरूप सूर्याचे दर्शन झाले. मी सेवाकेंद्रातील साधकांना बोलावून त्यांना सूर्याचे दर्शन घ्यायला सांगितले. साधकांनी सूर्याचे दर्शन घेतल्यानंतर लगेचच २ मिनिटांनी सूर्य ढगाआड गेला आणि अंधार झाला.

३. ‘रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दिलेले अर्घ्य प्रत्यक्षात आदिशक्ती गुरुमाता सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वीकारले होते’, असे माघ पौर्णिमेच्या दिवशी जाणवणे

१२.२.२०१९ या रथसप्तमीच्या दिवशी रामनाथी आश्रमात सोहळा असतांना मी प्रयाग येथे होतो. मी गंगास्नान करून अर्घ्य देत असतांना सूर्य क्षितिजावर उदित होत होता. ‘त्या दिवशी लाल गोळ्यातील क्षात्रतेजाचे प्रतीक असलेल्या सूर्यनारायणाने अर्घ्य स्वीकारले’, असे मला जाणवले.प्रत्यक्षात ‘त्या दिवशी आदिशक्ती गुरुमाता सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ते स्वीकारले होते’, असे १९.२.२०१९ या दिवशी मला जाणवले.

४. माघ पौर्णिमेच्या दिवशी तळपत्या सूर्याचे दर्शन झाल्यावर ‘आदिशक्ती गुरुमाता सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आशीर्वाद दिला’, असे जाणवणे

१९.२.२०१९ या दिवशी सकाळी ८.२० वाजता मला तळपत्या सूर्याचे प्रकाशमान दर्शन झाले. त्या दिवशी आदिशक्ती गुरुमाता सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले. ‘दोन्ही प्रसंगांत परात्पर गुरुदेवांंनीच ही संधी उपलब्ध करून आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.

५. ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सूर्य अन् चंद्र यांच्या समान साधकांचे रक्षण करत असून त्यांच्याकडून साधना आणि गुरुकार्य करवून घेत आहेत’, असे स्वतःकडून साधकांना सांगितले जाणे

परवा प्रयाग येथे साधकांशी बोलतांना भगवंताने माझ्या मुखातून सांगितले, ‘‘सूर्य म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि चंद्र म्हणजे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ. दिवसा सूर्याच्या रूपात सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि रात्री चंद्राच्या रूपात सद्गुरु (सौ.) अंजलीताई साधकांचे रक्षण करत आहेत अन् त्यांच्याकडून साधना आणि गुरुकार्य करून घेत आहेत. (‘महर्षींनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सूर्यनाडी आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चंद्रनाडी आहे’, असे सांगितले आहे.’ – संकलक)  प्रत्यक्षात गुरुकार्य म्हणजेच गुरुधर्म आणि हरिधर्म होय. (‘महर्षींनी साधक करत असलेल्या गुरुकार्यासाठी ‘गुरुधर्म’ आणि ‘हरिधर्म’ हे शब्द वापरले आहेत.’ – संकलक) ’’

६. माघ पौर्णिमेच्या दिवशी रामनाथी आश्रमात होत असलेल्या विशेष सोहळ्याचे प्रक्षेपण पहात असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

६ अ. सोहळ्यात ‘तेजतत्त्व जागृती’ हे शब्द ऐकल्यावर ‘सकाळी आत्मस्वरूपी सूर्यदेवतेचे स्मरण होणे’, ही आदिशक्ती गुरुमाताद्वयींची कृपा असल्याचे लक्षात येणे : १९.२.२०१९ या दिवशीच्या सोहळ्यात ‘तेजतत्त्व जागृती’ हे शब्द ऐकल्यावर ‘सकाळी मला तेजस्वी सूर्याचे दर्शन घडले’, ही पूर्वसूचना होती; मात्र त्या वेळी मला ते समजले नाही. ‘सूर्य हा विश्‍वाचा आत्मा आहे’, असे सांगितल्यावर ‘आत्मस्वरूपी सूर्यदेवतेचे स्मरण होणे’, ही आदिशक्ती गुरुमाताद्वयींची माझ्यावर झालेली कृपा होती’, असे माझ्या लक्षात आले. परात्पर गुरुदेवांच्या माध्यमातून भगवंताच्या लीला अनुभवण्याचे हे प्रसंग अद्वितीय होते.

६ आ. सहस्र-दीपदर्शन सोहळा चालू असतांना ‘सर्वांसाठी आंतरिक सहस्रारातील दीपप्रज्वलनाचे सूक्ष्मातील कार्य प्रारंभ झाले असून ‘बाह्य सोहळा’ हे त्याचे प्रतीकमात्र आहे’, असे मला जाणवले.

६ इ. ‘गुरुदेव पृथ्वीवर दीप प्रज्वलित करून विश्‍वकुंडलिनी जागृत करत आहेत आणि चौदा भुवनांमध्ये दीपांचे प्रज्वलन होत आहे’, असे जाणवणे : १९.२.२०१९ च्या पहाटे मला ‘मूलाधारचक्राच्या ठिकाणी वाती पेटल्या असून (मशालीच्या असतात तशा) तो भाग तप्त होत आहे’, असे जाणवले. दीपप्रज्वलनाच्या वेळी मला जाणवले, ‘गुरुदेव पृथ्वीवर दीप प्रज्वलित करत आहेत, म्हणजे विश्‍वकुंडलिनी जागृत करत आहेत. परात्पर गुरुदेव दीपाला दीप लावून प्रज्वलित करत असतांना माझ्या मांड्यांपासून पायांपर्यंत शीतल अग्नी पसरत आहे. चौदा भुवनांमध्ये दीपप्रज्वलन होत आहे.’

६ ई. ‘सोहळ्यात कुलदेवता श्री रेणुकामातेची आरती म्हटली जाणे आणि आदिशक्तीस्वरूप गुरुमाताद्वयी अन् मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांची उपस्थिती असणे’, हे गुरुकृपायोगाच्या परमोच्च साध्याचे प्रतीक असल्याचे जाणवणे : सोहळ्यात श्री रेणुकामातेची आरती म्हणण्यात आली. ती आमची कुलदेवता आहे. ‘तिनेच आम्हाला गुरूंपर्यंत पोचवले’, असा भाव मी ठेवतो. या प्रसंगी ‘श्री रेणुकामातेची आरती म्हटली जाणे आणि आदिशक्तीस्वरूप गुरुमाताद्वयी अन् मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांची उपस्थिती असणे’, ही गुरुकृपायोगाच्या परमोच्च साध्याचे प्रतीक आहे’, असे मला जाणवले.

श्रीमन्नारायणाच्या सगुणातील लीलांचा आनंद अवर्णनीय आहे. परात्पर श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१९.२.२०१९)

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना !

‘एक मासापूर्वी मी सौ. वैदेहीला (मुलीला) आणि सौ. मधुवंतीला (पत्नीला) एक लघुसंदेश पाठवला होता. त्यात मी लिहिले होते, ‘आज अकस्मात वाटले, ‘लवकरच आपल्याला आदिशक्ती गुरुमातारूपी दोन परात्पर श्री गुरु लाभतील.’ त्याप्रमाणे १९.२.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केले.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१९.२.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 


Multi Language |Offline reading | PDF