(म्हणे) ‘भारताने निर्जनस्थळी बॉम्ब फेकले !’ – पाक सैन्य

निर्जनस्थळावर टाकलेले बॉम्ब ही पाकला चेतावणी आहे, असे त्याने समजावे ! जर पाकला असे वाटते की, भारताने निर्जनस्थळी बॉम्ब फेकले असतील, तर तो भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा का करत आहे ?

इस्लामाबाद – भारतीय वायूदलाच्या विमानांनी पाकच्या सीमेमध्ये घुसखोरी केली आणि बॉम्ब फेकले; पण भारताने टाकलेले बॉम्ब निर्जन ठिकाणी पडले, त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच इतर कोणतीही हानी झाली नाही. या वेळी पाकच्या वायूदलाने भारताला तातडीने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे निर्जन ठिकाणी बॉम्ब टाकून भारताची विमाने माघारी पळाली. भारताने आक्रमण करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असा पोकळ दावा पाकच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल गुफूर यांनी भारताच्या कारवाईनंतर ट्वीट करून केला. तसेच त्यांनी यासमवेत काही छायाचित्रेही पोस्ट केली. यात निर्जनस्थळी बॉम्ब फेकल्याने पडलेले खड्डे दिसत आहेत. भारताच्या आक्रमणानंतर पाक सैन्याने सीमेवर अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे.

पाकच्याच विमानांची माघार !

गुफूर यांच्या या विधानावर भारतीय वायूदलाच्या सूत्रांनी उत्तर देतांना म्हटले की, ‘मिराज २०००’ची क्षमता आणि संख्या पाहून पाकच्याच विमानांनी माघार घेतली.

पाक सैन्याकडून बालाकोटची स्वच्छता चालू

भारताच्या आक्रमणानंतर पाक सैन्याने बालाकोटला घेराव घातला असून तेथे झालेल्या कारवाईचे सर्व अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. यातून ‘येथे काहीच झाले नाही’, असे दाखवण्याचा पाकचा प्रयत्न आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळीही पाकने असेच केले होते आणि तेथे विदेशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नेऊन तेथे काहीच घडले नसल्याचे दाखवले होते.

बालाकोटमध्ये ४२ आत्मघाती आतंकवादी सिद्ध केले जात होते !

बालाकोट प्रशिक्षण केंद्रात ४२ आत्मघाती आतंकवादी सिद्ध केले जात होते. याची माहिती भारतीय गुप्तचरांना मिळाल्यानेच हे केंद्र वायूदलाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आले.

पाकच्या संसदेत इम्रान खान यांच्या विरोधात घोषणा

भारताच्या कारवाईनंतर पाकमध्ये विरोधी पक्ष आणि जनता पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर संतप्त झाली आहे. पाकच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षांनी संसदेचे संयुक्त सत्र बोलावण्याची मागणी केली. ‘देशात युद्धासारखी परिस्थिती आहे. संसदेला एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा’, असे विधान पाकिस्तान पिपल्स पार्टीचे खासदार खुर्शिद शाह यांनी केले.

‘निवांत झोपा, पाकिस्तानी वायूदल जागे आहे !’

आक्रमणाच्या साडेतीन घंट्यांपूर्वी पाकच्या संरक्षण खात्याचे ट्वीट !

भारताच्या कारवाईच्या साडेतीन घंटे आधी म्हणजे रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी ‘पाकिस्तान डिफेन्स’ नावाच्या ट्विटर खात्यावरून ‘निवांत झोपा; कारण पाकिस्तानी वायूदल जागे आहे’, असे ट्वीट करण्यात आले होते. या ट्विटर खात्याच्या विश्‍वासार्हतेविषयी शंका असली, तर याच्या माहितीमध्ये ‘डिफेन्स डॉट पिओके’ या संकेतस्थळाचा उल्लेख करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये पुढे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ हा ‘हॅशटॅग’ही वापरण्यात आला. या ट्वीटनंतर म्हणजे पहाटे साडेतीन वाजता भारतीय वायूदलाने पाकमध्ये घुसून आतंकवादी तळावर कारवाई केली. या कारवाईनंतर ‘पाकिस्तान डिफेन्स’ची ट्विटरवर खिल्ली उडवण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF