६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवडी, मुंबई येथील चि. नैवेद्या संदीप वैती (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नैवेद्या संदीप वैती ही एक आहे !

चि. नैवेद्या वैती हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

चि. नैवेद्या वैती

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(नैवेद्या महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बालसाधिका असून वर्ष २०१८ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती. – संकलक)

चि. नैवेद्या संदीप वैती हिचा माघ कृष्ण पक्ष नवमी (दासनवमी) या तिथीला, म्हणजे २७.२.२०१९ या दिवशी ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या वडिलांनी सांगितलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

१. जिज्ञासू वृत्ती असल्याने अनेक प्रश्‍न विचारून शंकानिरसन करून घेणे

‘नैवेद्याला प्रत्येक नवीन वस्तूविषयी जिज्ञासा असते. ती त्या वस्तूविषयी ‘का ? आणि कसे ?’ असे प्रश्‍न विचारून स्वतःचे शंकानिरसन करून घेते. तिला नवीन वस्तू हाताळून किंवा वापरून पहायची असते. तिला परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहायला फार आवडते. छायाचित्रे पहात असतांना ती विविध प्रश्‍न विचारते. त्यांची बालपणीची छायाचित्रे पहातांना ती गुरुदेवांना अचूक ओळखते.

२. उत्तम स्मरणशक्ती

अ. ‘एकदा मी नैवेद्याला ‘मानसपूजा कशी करायची ?’, याविषयी सांगितले. तिला एकदाच सांगितले असूनही तिने त्यातील मंत्रासहित ती मानसपूजा लक्षात ठेवली आहे.

आ. एकदा तिची आजी (आईची आई) ‘श्री महालक्ष्मी अष्टकम्’ हे स्तोत्र म्हणत होती. ते म्हणतांना तिचे काही श्‍लोक चुकत होते. नैवेद्याच्या ते लक्षात आले आणि तिने आजीला त्याची जाणीव करून दिली. त्या वेळी तिची आजी आश्‍चर्यचकित झाली. आम्ही घरी नवरात्रात आणि देवीच्या इतर उत्सवांत हे स्तोत्र मोठ्याने म्हणतो. त्या वेळी केवळ ऐकून नैवेद्याच्या ते अचूक लक्षात राहिले आहे.

३. कार्यपद्धतीचे पालन करणे

नैवेद्याला कार्यपद्धतीचे पालन केलेले पुष्कळ आवडते. ‘एखादी गोष्ट कशी करायची ?’ हे ती निरीक्षण करून जाणून घेते. एखाद्या वेळेस आमच्याकडून एखादी कृती करायची राहिल्यास ती त्वरित त्याची जाणीव करून देते आणि कार्यपद्धतीनुसार कृती होण्यासाठी आग्रह धरते.

४. मराठी भाषेविषयी प्रेम

नैवेद्याला मराठी भाषेविषयी पुष्कळ प्रेम आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी तिचा आग्रह असतो.

५. आजारी आजोबांची प्रेमाने काळजी घेणे आणि देवावरील श्रद्धा

नैवेद्याचे आजोबा आजारी असल्यास ती वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करते. आजीला विचारते, ‘त्यांना औषध दिलेस का ?’ त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय व्हावेत; म्हणून ती देवाला हात जोडून प्रार्थना करते आणि त्यांना म्हणते, ‘‘आता तुम्हाला देवाचे चैतन्य मिळेल आणि बरे वाटेल.’’ दत्तजयंतीच्या दिवशी तिचे आजोबा आजारी असल्याने विश्रांती घेत होते. त्या वेळी तिने दत्तगुरूंच्या चरणांशी वाहिलेले फूल आजोबांच्या उशाशी नेऊन ठेवले आणि म्हणाली, ‘‘यातून चैतन्य मिळून तुम्हाला बरे वाटेल.’’

६. साधनेचे गांभीर्य

६ अ. स्वतःच्या चुकांचे गांभीर्य : तिने तिच्या चुकांसाठी एक वही बनवली आहे. गेले काही दिवस ती तिच्याकडून झालेल्या चुका मला सांगते आणि त्या वहीमध्ये चुका लिहायला सांगते. तिच्याकडून गंभीर चूक झाल्यास आम्ही तिला कान पकडून उठाबशा काढायला सांगून क्षमायाचना करायला सांगतो. तेव्हा ती त्वरित ऐकते.

६ आ. साधनेत साहाय्य करणे : एकदा मी तिला माझे काही स्वभावदोष आणि चुका सांगितल्या अन् ‘चुका होत असतांनाच मला त्याची जाणीव करून दे’, अशी विनंती केली. नंतर ती वेळोवेळी माझी चूक होत असतांना ‘‘असे केलेले परम पूज्यांना आवडणार नाही’’, असे सांगून मला चुकीची जाणीव करून देते. कधीकधी चूक झाल्यावर ‘तुमचे नाव परम पूज्यांना सांगेन हं’, असे गमतीने म्हणते.

७. सात्त्विक कृतींची आवड

७ अ. सूर्याला अर्घ्य देणे : अंघोळ झाल्यानंतर ओलेत्या अंगाने ‘सूर्याला अर्घ्य कसे द्यायचे ?’ हे मी तिला शिकवले आहे. तेव्हापासून ती न कंटाळता अंघोळ झाल्यानंतर सूर्याला तसे अर्घ्य देते. थंडीचे दिवस असतांनाही ती अर्ध्य देते.

७ आ. श्री गणेशपूजन करणे : श्री गणेश चतुर्थीच्या काळात तिने ‘गणेशपूजा कशी करतात ?’, याचे व्यवस्थित निरीक्षण केले आणि नंतर खेळण्यातील वस्तूंंचा उपयोग करून त्याच पद्धतीने गणपतीची स्थापना, पूजाअर्चा, नैवेद्य इत्यादी सर्व केले. नंतर आम्हा सर्वांना दर्शन घ्यायला येण्याची विनंतीही केली.

७ इ. वैभवलक्ष्मीची पूजा करणे : तिची आजी मार्गशीर्ष मासातील गुरुवारी श्री वैभवलक्ष्मीची पूजा करते. ती पूजासुद्धा तिने पाहिली आणि खेळण्यातील वस्तूंच्या साहाय्याने अगदी त्याच पद्धतीने पूजेची मांडणी करून पूजा केली.

८. सूक्ष्मातील कळणे

८ अ. आवश्यक नामजप आणि मुद्रा सांगणे : मी नामजप करतांना प्राणशक्तीवहन उपायांनुसार मिळालेली आकाशदेवतेची मुद्रा करून नामजप करत होतो. त्या वेळी नैवेद्या मला म्हणाली, ‘‘तुम्ही ही मुद्रा करू नका.’’ तिने तर्जनी आणि अंगठा यांची टोके जुळवून स्वतः मुद्रा करून दाखवली आणि ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करायला मला सांगितले. मी तिला विचारले, ‘‘आता कोण चैतन्य देेत आहे ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘मारुतिबाप्पा.’’ मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले; पण दुसर्‍या दिवशी उपाय शोधतांना मला नैवेद्या सांगत असलेली मुद्राच उपाय म्हणून मिळाली. नंतरही एकदा तिने मला आकाशदेवतेचा नामजप करायला सांगितला आणि दुसर्‍या दिवशी उपाय शोधतांना मला तोच नामजप सापडला.

८ आ. श्री महालक्ष्मीदेवी या देवतेप्रती माझ्या मनात भाव आहे; परंतु मी याविषयी तिला कधी सांगितले नव्हते. एकदा बोलतांना तिने विचारले, ‘‘तुम्हाला लक्ष्मीदेवी आवडते ना ?’’

८ इ. चिडचीड होऊ लागल्यावर स्वतःभोवती त्रासदायक आवरण आल्याचे ओळखणे : एकदा उद्यानात खेळून झाल्यानंतर घरी परतत असतांना ती मला सांगू लागली, ‘‘माझ्याभोवती त्रासदायक आवरण आले आहे.’’ ती असे पहिल्यांदाच म्हणत होती. मी तिला विचारले, ‘‘तुला कसे कळले की, तुझ्याभोवती त्रासदायक आवरण आले आहे ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘माझी सारखी चिडचीड होत आहे.’’ मी तिला सांगितले, ‘‘खेळण्यापूर्वी देवाला प्रार्थना करायची, म्हणजे आवरण येणार नाही.’’ ती म्हणाली, ‘‘पुढील वेळी मी प्रार्थना करीन.’’

९. स्तोत्रे म्हणतांना देवतांचे दर्शन होणे

एकदा मी मारुतिस्तोत्र म्हणत असतांना ती आनंदाने हसत होती. याचे कारण विचारले असता ती म्हणाली, ‘‘स्तोत्र म्हणतांना मला कृष्णबाप्पा आणि मारुतिबाप्पा दिसत होते. त्यांना पाहून मला आनंद होत होता; म्हणून मी हसत होते.’’

१०. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अखंड अनुसंधानात असणे

१० अ. परात्पर गुरुदेव समवेत असल्याचे अनुभवणे : ती शाळेच्या बसने शाळेत जाते. ती सांगते, ‘‘बसमध्ये कधी कृष्णबाप्पा, तर कधी परम पूज्य (सूक्ष्मातून) माझ्या शेजारी बसतात आणि ‘शाळेतही माझ्यासमवेत परम पूज्य असतात.’’

१० आ. देवघरात विष्णुबाप्पा आहे’, असे सांगणे : गेले काही दिवस ती ‘देवघरात विष्णुबाप्पा आहे’, असे सांगत होती. नंतर परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्यात (महर्षींच्या आज्ञेनुसार) त्यांनी विष्णुरूपात दर्शन दिले. ८.५.२०१८ या दिवशी दैनिकात आलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे विष्णुरूपातील छायाचित्र पहातांना तिच्या तोंडवळ्यावर मोरपिशी आणि सोनेरी रंगाचे दोन दैवी कण आढळले.

१० इ. नामजप केल्यावर सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन होणे : एकदा तिने विचारले, ‘‘ नामजप कसा करायचा ?’’ मी म्हटले, ‘जय गुरुदेव.’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘परम पूज्य आले आहेत.’’ एकदा मी नामजप करत असतांना ती म्हणाली, ‘‘परम पूज्य आले आहेत. त्यांच्या पाया पडा.’’

१० ई. आशीर्वाद देणार्‍या हातात परात्पर गुरुदेव दिसणे : एकदा मी नामजप करत असतांना तिने मला विचारले, ‘‘बाप्पाकडून चैतन्य कसे मिळते ?’’ मी सांगितले, ‘‘देवबाप्पा त्याचा आशीर्वादाचा हात असा ठेवतो.’’ हे सांगत असतांना मी तिला आशीर्वादाचा हात करून दाखवला.

१० उ. मी झोपतांना रामरक्षा म्हणतो. त्या वेळी ती सांगते, ‘परात्पर गुरुदेव आपल्याला चैतन्य देत असल्याचे मला दिसते.’

११. ‘घर आश्रम आहे’, असा भाव

अलीकडे ती घराविषयी बोलतांना ‘घर’ न म्हणता ‘आश्रम’ म्हणते. ‘आश्रमातल्या खोलीत जाऊया’, अशा पद्धतीनेे बोलते. यामुळे ‘घर म्हणजे आश्रमच आहे, हा भाव ठेवायला हवा’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.

१२. अनुभूती

रात्री झोपतांना रामनाथी आश्रमात नेण्यासाठी प्रार्थना केल्यावर नैवेद्याला आश्रमात गेल्याची आणि परम पूज्य डॉक्टरांना भेटल्याची अनुभूती येणे

रात्री झोपण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करतो. मी नैवेद्याच्या वतीने प्रार्थना करतो. एकदा प्रार्थना करतांना माझ्याकडून ‘परात्पर गुरुदेव, स्वप्नात मला (नैवेद्याला) रामनाथी आश्रमात घेऊन जा’, अशी प्रार्थना झाली. नंतर दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ती मला म्हणाली, ‘‘काल रात्री मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेथे मला पूर्तीताई आणि ऐश्‍वर्याताई भेटल्या. आम्ही सर्वजणी खेळलो. सेवा केली आणि नामजपही केला. नंतर मला परम पूज्यही भेटले. मी त्यांना माझी चुकांची वहीसुद्धा दाखवली.’’

१३. नैवेद्याचे स्वभावदोष

हट्टीपणा, चिडचिड करणे आणि भ्रमणभाषविषयी आकर्षण असणे.

आमची काहीच पात्रता नसतांना अशा दैवी बालिकेचा सत्संग देऊन तिचे संगोपन करण्याची सेवा दिली, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. संदीप नरेंद्र वैती, शिवडी, मुंबई. (फेब्रुवारी २०१९)


Multi Language |Offline reading | PDF