सावित्रीबाई फुले रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा ! – अवधूत भाटये, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशन

पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त करतांना डावीकडून सर्वश्री अवधूत भाटये, किशोर घाटगे, मधुकर नाझरे आणि प्रसाद मोहिते

कोल्हापूर, २४ फेबुवारी (वार्ता.) – सर्वसामान्यांची आरोग्यवाहिनी असलेल्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. या संदर्भात ‘वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशन’ने गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करून रुग्णालयास नवसंजीवनी प्राप्त करून दिली. रुग्णालयास आतापर्यंत २५ लक्ष रुपयांहून अधिक निधी आणि वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी उर्वरित सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी माहिती ‘वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशन’चे श्री. अवधूत भाटये यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. प्रसाद मोहिते उपस्थित होते.

या वेळी श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘हे रुग्णालय आणखी सुस्थितीत आल्यास अधिकाधिक रुग्णांचा येथे ओढा वाढेल. कोल्हापुरातील नामांकित तज्ञ आधुनिक वैद्यांनी एक दिवस अथवा काही घंटे या रुग्णालयासाठी द्यावेत, असे आवाहन मी करतो.’’

या वेळी श्री. अवधूत भाटये म्हणाले,

१. इमारत दुरुस्तीसाठी पाठपुरावा करून इमारत पूर्ववत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

२. महात्मा फुले जनआरोग्य जीवनदायी आरोग्य योजनेसाठी ३७ सहस्र रुपयांची संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

३. मानद आधुनिक वैद्यांचे मानधन ५०० रुपयांवरून ५ सहस्र रुपये करण्यात आले. याच समवेत एका नामांकित आस्थापनाकडून ६० लक्ष रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे.

४. या संदर्भात तत्कालीन महापालिका आयुक्त, तसेच डॉ. संदीप नेजकर, विजयसिंह खाडे, ईश्‍वर परमार यांनीही वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा केल्याने मोलाचे साहाय्य झाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now