अरुणाचल प्रदेशमध्ये संतप्त जमावाने उपमुख्यमंत्र्यांचा बंगला जाळला

भाजपच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा !

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या ६ आदिवासी समुदायांना स्थायी निवासी प्रमाणपत्र देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला २३ फेब्रुवारीला हिंसक वळण लागले. यातूनच २४ फेब्रुवारीला येथे संतप्त जमावाने राज्याचे उपमुख्यमंत्री चाव मेन यांचा बंगला जाळला. या घटनेनंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सैन्याला पाचारण केले. तसेच इटानगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. उपमुख्यमंत्री चाव मेन यांना नामसाई जिल्ह्यात हालवण्यात आले आहे. तेथे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

२३ फेब्रुवारीला आंदोलन करणार्‍या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात हिंसा चालू झाल्याने रात्रीपासून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच सैन्याला तैनात करण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत २१ आंदोलकांना कह्यात घेतले आहे. या परिसरात आंदोलकांनी जवळपास ५० गाड्या जाळल्या आणि १०० गाड्यांची हानी केली.


Multi Language |Offline reading | PDF