संभाजीनगर महापालिकेचा गलथान कारभार !

 नोंद

‘पंचायत राज’ व्यवस्था बळकट होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली असून याद्वारे ग्रामीण, तसेच शहरातील नागरिकांना नागरी सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचा मोलाचा वाटा असतो; मात्र हा सहभाग जनहिताच्या योजनांपर्यंतच मर्यादित असावा. बर्‍याच ठिकाणी हे लोकप्रतिनिधी प्रशासनात ढवळाढवळ करत असल्याचे आढळून येते. याचेच एक उदाहरण म्हणजे संभाजीनगर महानगरपालिकेच्या लेखा विभागातून विकासकामांच्या दोन धारिका गहाळ होणे. शिवसेनेच्या २ नगरसेवकांच्या अंतर्गत वादातून या धारिका गहाळ झाल्याची चर्चा आहे. पालिका आयुक्तांनी या प्रकरणी उपायुक्तांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता; परंतु ती अजूनही पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे या धारिका नव्याने बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. महानगरपालिकेच्या लेखा विभागात मासापूर्वी ज्योतीनगर-दशमेशनगर वॉर्डातील २ रस्त्यांच्या कामांच्या धारिका संमतीसाठी आल्या होत्या. या धारिकांवर मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर त्या धारिका लिपिकाच्या पटलावरून गहाळ झाल्या. याविषयी १४ जानेवारीचे सीसीटीव्हीचे छायाचित्रण पडताळण्यात आले. त्यात नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांचे दीर पंकज वाडकर हे लिपिकाच्या अनुपस्थितीत पटलावरून काही धारिका गुपचूप थैलीत टाकून नेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर महानगरपालिका पदाधिकार्‍यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘महानगरपालिकेतील धारिका गहाळ होणे, हे काही नवीन नाही. गहाळ झालेली धारिका नव्याने सिद्ध केली जाऊ शकते’, असे अजब उत्तर या पदाधिकार्‍यांनी दिले. या प्रकरणाची महानगरपालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त डी.पी. कुलकर्णी यांना चौकशी करण्याचा आदेश दिला; मात्र एक मास उलटूनही ही चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येथे काही प्रश्‍न निर्माण होतात, ते म्हणजे –

१. विकासकामांच्या धारिका हे सरकारी दस्तऐवज असतांना आणि त्या नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या हातात देऊ नयेत, असे आदेश असतांना त्या धारिका नगरसेविकेच्या दिराच्या हातात जातातच कशा ? कि लिपिकापासून आयुक्तापर्यंत काही अर्थव्यवहार झाला आहे ? याची चौकशी व्हायला हवी.

२. लिपिकाच्या अनुपस्थितीत पटलावरून कोणीतरी बाहेरची व्यक्ती येते आणि धारिका उचलून घेऊन जाते, याचा अर्थ महानगरपालिका कार्यालयात कोणतीही सुरक्षायंत्रणा नाही का ? आज कोणी धारिका घेऊन जातो, तर उद्या कोणी बॉम्ब ठेवून गेल्यास याला उत्तरदायी कोण?

३. उपायुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी एक मास उलटूनही का पूर्ण झाली नाही ?

या प्रश्‍नांची उत्तरे लोकप्रतिनिधी देणार आहेत का ?

– श्री. नीलेश पाटील, जळगाव

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now