साधूंची जवळून ओळख करून देणारा कुंभ !

कुंभमेळ्याचे सजीव शब्दचित्रण करणारे सदर : कुंभदर्शन

– श्री. आनंद जाखोटिया, कुंभमेळा

विशेष प्रतिनिधी, दैनिक सनातन प्रभात

श्री. आनंद जाखोटिया

‘साधूसंत ! सध्या हा अनेकांच्या टिंगलटवाळीचा आणि टीकेचा शब्द असला, तरी कोट्यवधी हिंदूंसाठी हा श्रद्धेचाही भाग आहे. माध्यमांच्या अपप्रचारामुळे असेल किंवा धर्मविषयक अज्ञानामुळे असेल, आज साधूसंतांपासून लांब रहाणारे बहुतांश जण आहेत; पण आज असेही अनेकजण आहेत, जे संतांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाला आकार देत आहेत.

आज सर्वच क्षेत्रांप्रमाणे धर्मक्षेत्रातही पाखंड दिसून येतो; पण त्यासाठी सर्वच साधूसंतांना एका चष्म्यातून पहाणे, हे चुकीचे आहे. कुंभमेळ्यात संपर्क करतांना वेगवेगळ्या साधूसंतांविषयीचे  चांगले-वाईट अनुभव घेता आले.

समविचारी संतांची शोधमोहीम !

हिंदु राष्ट्राच्या कार्याशी समविचारी संतांना जोडणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे, यांसाठी कुंभक्षेत्रात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपर्क अभियान राबवण्यात आले. प्रतिदिन एकेक पंडालमध्ये जाऊन तेथील संतांना संपर्क करण्याचा आमचा दिनक्रम होता. संतसंपर्कात प्रतिदिन नवनवीन अनुभव आले. प्रथम संतांच्या पंडालमध्ये प्रमुख संत शोधणे, हे मोठे काम असायचे; कारण बाहेर फलकावर इतक्या संतांची छायाचित्रे असायची आणि त्या छायाचित्रांवरून उपस्थित संतांपैकी मुख्य संत ओळखणे, ही कसरत असायची. कारण अनेकांचे चेहरे एकसारखेच दिसत होते. काही इतके साधे रहायचे की, नुसत्या पहाण्याने ते मुख्य महंत आहेत’, हे ओळखणे कठीण आहे. एका पंडालमध्ये दारावर असलेल्या एका शिष्याला विचारले की, ‘महाराज कुठे आहेत ?’ त्यावर तो म्हणाला, ‘‘हर बात पर गुस्सा होनेवाले वो हमारे नरसिंह देखो वहां बैठे हैं !’’ त्या संतांकडे पाहिल्यावरही ते रागीटच दिसत होते; प्रत्यक्षात मात्र आम्हाला त्यांचे भरपूर प्रेम मिळाले. प्रत्येक संत मात्र अतिशय प्रेमाने बोलायचे. चहा-पाणी, प्रसाद यांशिवाय कोणीही सोडत नसे.

भाविकांचे माहेरघर असलेले संतांचे पंडाल !

अनेक संतांचे प्रेमही अनुभवता आले. कुंभ ही संन्यासी लोकांसाठी पर्वणी असली, तरी गृहस्थींसाठीही एक पर्व आहे. पर्व अशासाठी की, सुख-दुःखाच्या गटांगळ्या खात संसाराचा गाढा हाकणार्‍या संसारी लोकांना येथे आनंदाचा अनुभव घेता येतो. जो आनंद परिस्थितीवर अवलंबून नाही, अनुकूलता किंवा प्रतिकूलतेवर अवलंबून नाही, असा हा आनंद त्यांना केवळ भारताचे सर्वश्रेष्ठ वैशिष्ट्य असलेल्या गुरु-शिष्य परंपरेमुळे घेता येतो. दूरदूरचे कोट्यवधी भाविक जे भारताच्या चारही दिशांतून येथे एकत्र होतात, ते काही केवळ सरकारच्या भरवशावर नाही, तर त्या त्या प्रांतातील आखाडे, खालसा, संप्रदाय यांतील साधूसंतांच्या भरवशावर ! उदाहरणच बघायचे झाले, तर सरकारने ४० हून अधिक ‘रैन बसेरा’ म्हणजे मोठ्या पंडालमध्ये रहाण्यासाठी अत्यल्प शुल्कात ‘कॉट’ची व्यवस्था केली आहे; पण तेथे पांघरूणच नाही. प्रशासनाकडून असा पाट्याटाकूपणा चालू असला, तरी भाविकांची काळजी संत घेत असल्याचे आम्ही पाहिले. माहेरी गेलेल्या मुलीवर जी माया माहेरचे लोक लावतात, तसेच प्रेम साधूसंतांकडून त्यांच्या भक्तपरिवाराला मिळत असते. रेल्वे स्थानकातून भक्तांना आणणे-सोडणे, कुंभकाळात भक्तांना यज्ञ, विविध अनुष्ठान, नामजप यांत सहभागी करून त्यांची साधना घडवून आणणे, त्यांच्या खाण्या-पिण्याची चिंता करणे आदी सर्वांमध्ये जसे घरातील ज्येष्ठ लक्ष घालतात, त्याप्रमाणे हे साधूसंत करत असतात. हे प्रेम निरपेक्ष असते. त्यांच्या या प्रेमामुळे घरातील वृद्धांपासून बालकांपर्यंत सर्वांना या कुंभक्षेत्री येऊन आपल्या घराप्रमाणे रहाता येते आणि सेवा-साधना करता येते. वृद्धांच्या तीर्थदर्शनाच्या अपेक्षा पूर्ण होतात, तर नवपीढीवर या वातावरणात धर्माचे संस्कार होतात. गंगेतील स्नानानंतर पापशुद्धी झाल्यावर अनेकजण जीवनात काही ना काही नवीन संकल्प घेण्याचा विचार करतात. त्या वेळी त्याची प्रेरणा त्यांना संतांचे सत्संग-प्रवचन यांतून मिळते.

आज आधुनिकतेमुळे पंडालमधील चित्रही पालटत आहे. जेवणापासून अनेक गोष्टींचे ठेके दिले जात आहेत. भक्तांची व्यवस्था होत असली, तरी त्यातील ‘प्रोफेशनल’ व्यवस्थेमुळे प्रेम कमी झाले, असे म्हणता येणार नाही. प्रेमाचा ओलावा तेथे आजही दिसतो.

संतांचा समाज आणि त्यांची आपसांतील बांधीलकी !

एका संतांना संपर्कासाठी गेलो असता ते झोपले होते. नंतर लक्षात आले की, ते दिव्यांग आहेत. दोन तरुण युवक त्यांची अत्यंत तत्परतेने सेवा करत होते. आम्हाला गेल्या-गेल्या त्यांनी खजूर द्यायला सांगितले. नंतर दोन आखाड्यांतील दोन साधू त्यांना भेटायला आले. त्यांचे क्षेमकुशल विचारून त्यांनी भक्तांना स्वतःसाठी आणलेल्या च्यवनप्राशची बाटली त्या साधूंना द्यायला सांगितली. एका साधूने बोलतांना सांगितले की, साधूसंत हाच आमचा समाज आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांची काळजी घेतो. कुंभच्या काळात आखाड्यांतील सर्व साधूंना जेवण असते. त्या वेळी साधू एकमेकांच्या आखाड्यात जातात. प्रत्येकाला त्याच्या स्थानानुसार १०० पासून २००० रुपयांपर्यंत दक्षिणा दिली जाते. यातून एकमेकांशी बांधीलकी कायम ठेवली जाते.

बाह्यजगताची अद्ययावत माहिती ठेवणारे साधू !

एका पंडालमधून आत गेल्यावर एका पत्र्याखाली ४-५ साधू मध्यभागी धुनी पेटवून बसले होते. ते सर्व नागा साधूंसारखे दिसत होते. पहिल्यांदा वाटले की, आपण चुकीच्या ठिकाणी आलो; पण नंतर लक्षात आले की, तो एक वेगळा अनुभव होता. प्रथम त्यांनी आम्हाला चप्पल त्यांच्या एका सीमारेषेच्या बाहेर काढायला सांगितली, त्यानंतर प्रेमाने बसवून चहा मागवला. नंतर ते बोलू लागल्यावर कळले की, ते पूर्वी गुप्तचर विभागात होते. पुढे नोकरी सोडून त्यांनी संन्यास घेतला. त्यांना देशाचा इतिहास आणि वर्तमान यांचे पुरेपूर आकलन होते. त्यांच्याकडे पाहून ते इतके ‘अपडेटेड’ असतील, असे कोणीही म्हणणार नाही. पायाने अपंग असल्याने अधिक कुठे जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

बोलता बोलता आखाड्यांतील परंपरेविषयी बोलणे झाल्यावर त्यातील एका साधूने त्याच्या पिशवीवरील पितळेचा शिक्का दाखवला. बसमधील वाहकाच्या गणवेशावर असतो, तसा त्या पिशवीवर कोतवाल, आखाड्याचे नाव आणि राजमुद्रा असलेला बक्कल होता. या आणि अशा काही उदाहरणांमुळे आखाड्यांची अंतर्गत रचनाही असल्याचे लक्षात आले.

संतभक्ताच्या वेशात गुप्तचर ?

अजून एका संतांना भेटायला गेल्यावर बाहेर दोन-तीन भक्त पेपर वाचत बसले होते. महाराजांची वाट पहात आम्ही त्यांच्याशी बोलत असतांना त्या दोघांनीही सांगितले की, आम्ही गुप्तचर शाखेत कार्य करत होतो. आता गंगास्नानासाठी आलो आहोत. नाशिक कुंभच्या वेळी भिकारी आणि साधू यांच्या वेशात प्रशिक्षित पोलीस कुंभक्षेत्रात वावरत असल्याचे वृत्त होते. त्यामुळे आता हे खरंच गंगास्नानासाठी आले होते कि त्यांच्या सेवेत कार्यरत होते ? हे त्यांनाच ठाऊक; पण एरव्ही ऐकीव माहितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने आम्हाला त्याचा अधिक आनंद झाला.

साधूंची आर्थिक गणिते !

असे काही चांगले अनुभव असले, तरी काही कटू अनुभवही ऐकले. जसे अनेक संतांनी सांगितले की, ‘‘तुम्ही तुमच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी १०० पासून १००० रुपयांपर्यंत दक्षिणा ठेवा, बघा तुमच्याकडे कशी गर्दी लागते ते ! १००० रुपये दक्षिणा देणार असाल, तर प्रयाग मधून गेलेले साधूही परत येतील !’’ काही कार्यक्रमात गर्दी दिसावी, या साठी अशाच प्रकारे दक्षिणा आणि जेवणाच्या अटीवर कल्पवासासाठी आलेले साधू येत असल्याचे कळाले. अनेक संत-महंत कुंभकाळात कल्पवासींच्या रहाण्याची व्यवस्था करण्याच्या नावाखाली पुष्कळ पैसे कमवतात. अनेकांकडून एकाच दिवशीच्या अन्नदानाचे अर्पण घेऊन एकत्रच अन्नदान केले जाते. प्रत्येकाला वाटते की, आज माझ्या वतीने अन्नदान होत आहे; पण संत-महंतांनाच ठाऊक असते की, नेमके किती जणांनी त्या दिवसासाठी अर्पण दिले आहे. कल्पवासी जातांना बर्‍याच गोष्टी अर्पण करतात. याकडे एक मोठी मिळकत म्हणून अनेक संत-महंतांचे लक्ष असते. असे अनेकजण कल्वासींची व्यवस्था करण्याच्या नावाखाली स्वत:चा स्वार्थ साधून घेतात.

धर्मकार्याच्या संदर्भात निराशेच्या गर्तेत गेलेले संत !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केलेले अनेक संत संपर्क करतांना भेटले. त्यांपैकी काही जण आता काहीही करण्याच्या किंवा ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांचा वापर करून त्यांना अडचणींच्या वेळी साहाय्य न केल्याने किंवा अडचणीत आणल्याने त्यांचा कल आता व्यष्टी साधनेकडे झुकला आहे. धर्माचे कार्य न करता नंतर त्यात राजकारण आणले जात असल्यानेही अनेक साधूसंत नाराज होते. त्यांची ही निराशा  पराकोटीची होती. सर्वांच्या बोलण्याचा आशय होता की, ‘‘कलियुग आहे. धर्महिताचे काहीही होऊ शकत नाही. जे काही करेल, ते देवच आता करेल. ज्यांच्याकडे गाड्या, पैसा आदी वैभव आहे आणि राजकारण्यांशी साठ-गाठ आहे, त्यांनाच आज समाजात महत्त्व आहे.’’

साधूंचा आक्रस्ताळेपणा !

कथा करणार्‍या एका महंतांना आम्ही धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट देण्याची प्रार्थना केली. तेथे येईपर्यंत ते अतिशय छान बोलत होते. त्यांच्यासमवेत आणखी एक साधू आले होते. प्रदर्शन पहायला प्रारंभ करण्यापूर्वीच प्रवेश करताच ते साधू एकदम चिडून म्हणू लागले, ‘हे काय दाखवायला आम्हाला बोलवले आहे. हे पाहून आम्ही काय करणार ?’ महंत शांततेत प्रदर्शन पहात होते. दुसर्‍या साधूचा आक्रस्ताळेपणा पाहून त्यांचीही भूमिका लगेचच पालटली. ते प्रत्येक फलकामध्ये त्रुटीच (नसलेल्याही !) काढायला लागले. दोघांनीही गुटखा खाल्ला होता. त्यातील साधूंचे डोळे लाल झाले होते. ते काहीही ऐकण्याच्या सिद्धतेत नव्हते. देवाच्या कृपेने कसेबसे ५ मिनिटांनंतर ते गेले. हा शिष्टाचाराचा अभाव होता कि अनिष्ट शक्तींचा त्रास  होता, हे देवच जाणे !

कुंभाच्या प्रारंभीच साधूंच्या रौद्ररूपाचे दर्शन !

प्रयागराज अर्धकुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या फलक प्रदर्शनासाठी रस्त्यावरील होर्डिंग लावण्याची सेवा आमच्याकडे होती. या सेवेसाठी चौकात योग्य जागा पहात असतांना एका संतांच्या फलकावरील रिकाम्या जागेत फलक लावण्यासाठी आम्ही अभ्यास करत होतो; पण तो खांब तकलादू असल्याने आम्ही आसपास अन्य जागा पाहू लागलो. तितक्यात एका आखाड्यातील एक तरुण साधू तेथून जात होते. त्यांना वाटले की, ‘आम्ही त्यांच्या गुरूंचा फलक काढून आपला लावण्यासाठी जागा केली.’ त्यांना नम्रपणे आम्ही ‘त्या फलकाला हातही लावलेला नाही’, असे सांगूनही ते ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते. आम्ही त्यांच्या समाधानासाठी तो फलक वर लावून देण्याचीही सिद्धता दाखवली; पण तेही ते ऐकून घ्यायला सिद्ध नव्हते. तावातावाने भांडत होते. ‘पोलिसांना बोलावतो’, असे म्हणू लागले. त्यानंतर त्यांनी ३-४ भक्तांना घेऊन काठ्या आणून आम्हाला मारण्याची सिद्धता केली. तेथे उभा असणारा पोलीसही बघ्याची भूमिका घेत होता. त्यानंतर भक्तांना आमच्यावर पाळत ठेवायला सांगून ते गाडी घेऊन आले. गाडी आणून मला आणि एका साधकाला गळ्याला ढकलून गाडीत बसवून ते आम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ लागले. पोलीस ठाण्यात जाणे, हाच त्यांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग होता. तितक्यात त्यांचे २ गुरुबंधू तेथे आले. त्यांनी गाडीत येऊन जोरजोराने ओरडायला प्रारंभ केला. ‘तुमच्या संतांना फोन लावून द्या’, असे म्हणाले. संतांशी बोलून झाल्यावर दम देऊन आम्हाला सोडले. हा प्रसंग चालू असतांना एका साधकाने अन्य साधकांना कल्पना दिल्यावर संत आणि साधकही घटनास्थळी आले. त्यांनीही त्यांना विनंती केली. त्यानंतर त्यांच्या तावडीतून सुटका झाली. अशा प्रकारे कुंभ सेवेच्या प्रारंभीच साधूच्या रौद्ररूपाचे दर्शन झाले. त्या साधूंचा हेकेखोरपणा असला, तरी गुरूंच्या कृपेने शांतपणे आणि न घाबरता या प्रसंगाला सामोरे जाता आले. त्यांची क्षमायाचना केल्याने प्रसंगाची तीव्रता वाढली नाही. नंतर वाटले की, ‘संन्यासी कसेही असो; पण त्यांची गुरुभक्ती शिकण्यासारखी होती.’

अशा विविध प्रसंगांतून गुरुदेवांनी पुष्कळ काही शिकवले. संतांच्या भेटीत हे सर्व आकलन करता येणे, हीच मोठी गुरुकृपा आहे. प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांनी दिलेल्या शिकवणीविषयी कृतज्ञता व्यक्त होत होती. समाजाच्या सद्य:स्थितीत विविध गुणांनी युक्त अशा (सनातनच्या) अनेक संतांची निर्मिती करणार्‍या गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे.

(श्री. आनंद जाखोटिया हे राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयकही आहेत.)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now