रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होणारे यज्ञ आणि पूजा यांसाठी फुले आणण्याची सेवा करतांना देवच विविध रूपांतून भेटून सेवेत साहाय्य करत असल्याविषयी कु. संगीता नाईक यांना आलेल्या अनुभूती !

‘महर्षींच्या आज्ञेप्रमाणे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात विविध यज्ञ आणि पूजा होत आहेत. सप्टेंबर २०१८ पासून यज्ञासाठी लागणारी फुले आणण्याची सेवा देवाच्या कृपेने मी करत आहे. ही सेवा करत असतांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. संगीता नाईक

१. गुलाबी रंगाची पाच कमळे

१ अ. दुचाकीने जात असतांना कुणीतरी हाक मारत असल्याचे ऐकू येणे, तेथे ओळखीचे कुणीही नसणे आणि तेथील कमळे पाहून जणूकाही तीच हाक मारून ‘आम्हाला आश्रमात ने’, असे सांगत असल्याचे जाणवणे : एके दिवशी मी दुचाकीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी जात होते. कवळे येथील शांतादुर्गा मंदिराच्या जवळ पोचल्यावर मला ‘संगीता, संगीता’ अशी कुणीतरी आर्ततेने हाक मारत आहे’, असे जाणवले. मला वाटले, ‘कुणीतरी साधक मला हाक मारत आहेत’, म्हणून मी गाडी थांबवून आजूबाजूला पाहिले, तर तेथे साधक किंवा माझ्या ओळखीचे कुणीच नव्हते. तेव्हा मी देवाला म्हणाले, ‘देवा, मला कुणी बरं हाक मारली ? मला तर येथे कुणीच दिसत नाही.’ त्या क्षणीच मला १० मीटरच्या अंतरावर एका ओहोळात सुंदर गुलाबी कमळे वार्‍यावर डोलतांना दिसली. जणूकाही तीच मला हाक मारत होती आणि सांगत होती, ‘आम्हाला आश्रमात घेऊन चल.’ तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला आश्रमात घेऊन जाईन हं !’

१ आ. चार दिवसानंतर यज्ञासाठी फुले हवी असल्याचा निरोप आल्यावर या कमळांची आठवण होणे आणि आश्रमात येण्यासाठीच देवाने या फुलांची निर्मिती केली असल्याची निश्‍चिती होणे : या प्रसंगानंतर ४ दिवसांनी सकाळी ७ च्या सुमारास सनातन पुरोहित पाठेशाळेतील श्री. सिद्धेश यांचा मला निरोप आला, ‘‘आश्रमात होणार्‍या यज्ञासाठी ५ गुलाबी कमळे आज सकाळी ९ वाजेपर्यंत हवी आहेत.’’ त्या वेळी मला वरील कमळांची तीव्रतेने आठवण आली आणि निश्‍चिती झाली, ‘आश्रमात येण्यासाठीच देवाने त्या फुलांना जन्माला घातले आहे आणि माझी कुठलीही पात्रता नसतांना त्या कमळांना आश्रमात घेऊन येण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे.’ या विचाराने माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. कवळे (आश्रमाच्या जवळील गाव) आणि फोंडा परिसरात गुलाबी रंगाची कमळाची फुले क्वचितच आढळतात. गुलाबी रंगाच्या कमळाचे ते एकच रोपटे आहे आणि बाकीची पांढरी कमळे आहेत. मी फुले आणायला जात असतांना माझ्या मनात एकच विचार येत होता, ‘महालक्ष्मीदेवीच्या चरणी समर्पित होण्यासाठी गुलाबी कमळे आपल्या आश्रमात येणार आहेत. ‘त्यांना सांभाळून घेऊन जाणे’, ही माझी सेवा आहे.’

१ इ. ओहोळाच्या ठिकाणी गेल्यावर एका व्यक्तीने पाणी खोल नसल्याचे सांगणे, कमळे सहजतेने काढता येणे, कमळांना स्पर्श करतांना वेगळाच सुगंध येणे आणि यज्ञासाठी आवश्यक असलेली ५ कमळे मिळणे : ओहोळाच्या ठिकाणी गेल्यावर मला एक वयस्कर व्यक्ती भेटली. जणूकाही ती माझ्यासाठीच धावून आली होती. ती मला म्हणाली, ‘‘हे पाणी खोल नाही आणि कमळाच्या ठिकाणी चिखलही नाही. तू सहजपणे पाण्यात जाऊन कमळे आणू शकशील. ही फुले घेण्यासाठी अजून कुणाला विचारण्याची आवश्यकता नाही. मी इकडेच रहातो.’’ एवढे सांगून ती व्यक्ती गेली. मी ८ – १० पायर्‍या उतरून ओहोळाच्या पाण्यापाशी आले. तिथे एक जाड काठी उभी केलेली दिसली. जणूकाही ती काठी देवाने माझ्यासाठीच ठेवली होती. त्या काठीच्या साहाय्याने मी ‘पाणी किती खोल आहे आणि चिखल आहे का ?’, याचा अंदाज घेऊ शकले. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे पाणी गुडघाभर खोल होते आणि त्यात चिखलही नव्हता. काठीच्या साहाय्याने मी ४ – ५ मीटर अंतरावर पाण्यात गेले. त्या कमळाच्या फुलांना स्पर्श करतांना मला वेगळाच सुगंध आला आणि ती फुले माझ्या हातात सहजच आली. आश्रमातील यज्ञासाठी पाचच फुले हवी होती आणि तिथे पाचच फुले होती. एरव्ही कमळ उमलल्यावर १ – २ दिवसच ताजे रहाते; पण ही कमळे ४ दिवसांनंतरही ताजी होती.

१ ई. श्री शांतादुर्गा मंदिराच्या परिसरातच ही कमळे मिळाल्याने ‘ही फुले देवीनेच महालक्ष्मीच्या चरणी समर्पण होण्यासाठी निर्माण केली आहेत आणि तिला ती भक्तीभावाने द्यायची आहेत’, असे वाटणे, आश्रमाच्या मुख्य द्वारापाशी एका साधिकेने धावत येऊन कमळांविषयी विचारणे अन् ‘तिच्या रूपात महालक्ष्मीदेवी फुले स्वीकारत आहे’, असे वाटणे : आश्रमात फुले आणत असतांना वाटेत भेटणार्‍या लोकांनी मला विचारले, ‘‘तुला एवढी सुंदर कमळे कुठे मिळाली ? अशी कमळे आम्ही कुठे पाहिली नाहीत.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘कवळे येथील शांतादुर्गादेवीनेच ही फुले मला दिली.’’ त्या वेळी मला वाटले, ‘शांतादुर्गादेवीच्या मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर ही फुले उमलली, म्हणजे ही फुले देवीनेच महालक्ष्मीच्या चरणी समर्पण होण्यासाठी निर्माण केली आहेत.’

आश्रमात कमळे घेऊन येतांना मला जाणवले, ‘आश्रमाच्या मुख्य द्वारापाशी महालक्ष्मी आई साधकाच्या रूपात येऊन भेटणार आहे आणि तिला ही कमळे भक्तीभावाने द्यायची आहेत.’ मी आश्रमाच्या द्वाराशी येताच सौ. साक्षी जोशी आनंदाने धावतच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ‘‘ताई, ही फुले मला हातात धरायला देशील का ?’’ आणि तिने प्रेमाने ती फुले हातात घेतली. तिला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ‘साक्षीताईच्या रूपात महालक्ष्मीदेवी फुले स्वीकारत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर तिने ती फुले सनातन पुरोहित पाठेशाळेतील पुरोहितांकडे दिली.

२. पांढर्‍या रंगाचे एक कमळ

२ अ. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला वाहण्यासाठी पांढरे कमळ हवे असतांना एके ठिकाणी पांढरे कमळ दिसून ते ‘शिव, शिव’, असा नामजप करत असल्याचे जाणवणे आणि परात्पर गुरु शिव असून त्यांच्याकडे येण्यासाठीच ते कमळ शिवाचा नामजप करत असल्याचे जाणवणे : एका यज्ञाच्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला वाहण्यासाठी एक पांढरे कमळ हवे होते. मी एका सेवेसाठी फोंड्याला गेले असतांना मला एके ठिकाणी वहात्या पाण्यात एकच सुंदर कमळ दिसले आणि ‘ते गुरुदेवांसाठीच आहे’, असे मला वाटले. रस्त्यापासून २० ते २५ मीटर अंतरावर आतमध्ये ते एकच कमळ होते. एरव्ही मला एवढ्या लांबचे स्पष्ट दिसत नाही; पण ते कमळ मला व्यवस्थित दिसले आणि ते कमळ ‘शिव, शिव’, असा नामजप करत असल्याचे मला जाणवले. त्या वेळी मला वाटले, ‘परात्पर गुरुदेव शिव आहेत आणि त्यांच्याकडे येण्यासाठीच ते कमळ शिवाचा नामजप करत आहे.’

२ आ. एका व्यक्तीच्या माध्यमातून देवाने पाण्यातून ते कमळ आणून देण्यासाठी साहाय्य करणे : त्या वेळी मी साडी नेसलेली असल्याने पाण्यात जाऊ शकत नव्हते. ‘माझ्या साहाय्यासाठी देव कुणाला तरी पाठवील’, असा विचार माझ्या मनात येताक्षणीच एक धिप्पाड व्यक्ती माझ्यासमोर आली. मी तिला म्हटले, ‘‘काका, माझ्या देवासाठी मला ते कमळ हवे आहे.’’ माझे बोलणे ऐकताक्षणी ती व्यक्ती धावतच पाण्यात गेली आणि तिने ते कमळ मला आणून दिले.

२ इ. सूर्योदयाच्या वेळी उमलणारे कमळाचे फूल सायंकाळी पूजेच्या वेळी उमलणे आणि रात्री पूजा संपेपर्यंत टवटवीत रहाणे : त्या वेळी दुपारचा दीड वाजला होता. ही फुले दुपारनंतर मिटतात आणि दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी उमलतात. त्यानुसार ते कमळ दुपारनंतर मिटले; पण मला वाटत होते, ‘हे कमळ गुरुदेवाच्या चरणी अर्पण व्हायला आले आहे, तर रात्री उमलेल.’ खरोखरच ते कमळ सायंकाळी ७ नंतर पुन्हा उमलले. आश्रमातील यज्ञ संध्याकाळी चालू होऊन रात्री २ वाजता संपला. तोपर्यंत ते फूल ताजे आणि टवटवीत होते.

३. पुष्कळ वेगळी फुले

३ अ. मृत्युंजय यज्ञाच्या वेळी नेहमीपेक्षा सुंदर, टवटवीत आणि सात्त्विक फुले मिळणे : जानेवारी २०१९ मध्ये रामनाथी आश्रमात मृत्युंजय यज्ञ होता. त्या दिवशी पूजेसाठी पांढरी फुले आणि कमळे हवी होती. सप्टेंबर २०१८ पासून यज्ञाच्या सेवेसाठी फुले आणण्याची सेवा देवाच्या कृपेने माझ्याकडे आहे. यापूर्वी मी पांढरी फुले आणली आहेत; पण या यज्ञाच्या वेळी पुष्कळच सुंदर, टवटवीत आणि सात्त्विक फुले मिळाली. मी म्हापसा येथील बाजारातून फुले आणली. तो फुलवाला म्हणाला, ‘‘आजपर्यंत माझ्याकडे अशा दर्जाची फुलेे आली नव्हती. ही फुले पुष्कळ वेगळी आहेत.’’ फुले घेणार्‍या साधिका सौ. शकुंतला गडेकर यांनाही तसेच जाणवले आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनीही (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाही) ‘या वेळची फुले पुष्कळच छान आहेत’, असा निरोप दिला.

भाग २.

‘महर्षींच्या आज्ञेप्रमाणे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात विविध यज्ञ आणि पूजा होत आहेत. सप्टेंबर २०१८ पासून यज्ञासाठी लागणारी फुले आणण्याची सेवा कु. संगीता नाईक पहात आहेत. फुले आणण्याच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आपण कालच्या अंकात पाहिल्या. आज आपण उर्वरित भाग पाहूया.

३. पुष्कळ वेगळी फुले

३ आ. यज्ञासाठी लागणारी पांढरी कमळे आणण्यासाठी निघाल्यावर देवाने सांगितल्याप्रमाणे शांतादुर्गा मंदिरापासून पुढे जाणे, वाटेत एक व्यक्ती थांबलेली दिसणे, तिला पांढर्‍या कमळांविषयी विचारल्यावर तिने ३ मुले साहाय्याला देणे : यज्ञासाठी १५ पांढरी कमळे हवी होती. मी देवाला विचारले, ‘ही कमळे कुठे मिळतील ?’ तेव्हा देवाने उत्तर दिले, ‘श्री शांतादुर्गा मंदिरापासून पुढे जा.’ त्याप्रमाणे शांतादुर्गा मंदिरापासून पुढे जात असतांना वाटेत मला एक व्यक्ती दिसली. देवाने सांगितल्याप्रमाणे ‘ही व्यक्ती माझ्यासाठी थांबली असणार’, असा विचार करून मी दुचाकी थांबवली. मी त्यांना म्हटले, ‘‘काका, मला देवासाठी पांढरी कमळे हवी आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘मी तुला ३ मुले साहाय्याला देतो. ते तुला कमळे आणून देतील. तू येथेच थांब. पाण्यात मगरी असतात. तू एकटी जाऊ नकोस.’’ त्यांनी ३ मुलांना बोलावले आणि त्यांना ‘फुले कुठून आणायची ?’, हे सांगितले. त्या तीन मुलांनी १५ हून अधिक पांढरी कमळे मला आणून दिली. त्या मुलांनी मला विचारले, ‘‘ताई, तुम्हाला एवढी फुले पुरतील का कि अजून आणून देऊ ?’’ त्या वेळी त्या मुलांनाही पुष्कळ आनंद मिळाल्याचे मला जाणवले. या वेळी पुन्हा एकदा देवाने दाखवून दिले, ‘तो सर्वत्र आहे आणि विविध रूपांत प्रकट होऊन साहाय्य करत आहे.’

४. सूर्यनारायणांनी फुले मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे

४ अ. सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाशी बोलून सेवेला आरंभ करणे, पूजेला कमळे हवी असल्याचे कळल्यावर त्याविषयी सूर्यदेवाला विचारणे आणि त्या वेळी ‘प्रकाश, प्रकाश’ असा ध्वनी ऐकू येणे : प्रतिदिन सूर्योदयाच्या वेळी मी सूर्यनारायणाशी बोलते. मी त्याला माझा दिनक्रम सांगते आणि त्याचा आशीर्वाद घेऊन सेवेला आरंभ करते. त्या दिवशी आश्रमात पूजेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत कमळे हवी होती. मी सूर्यनारायणाला विचारले, ‘मी आज कमळे आणायला कुठे जाऊ ?’ तेव्हा मला ‘प्रकाश, प्रकाश’ असा ध्वनी ऐकू आला. तेव्हा मला वाटले, ‘आज प्रत्यक्ष सूर्यनारायणच मला फुले देण्यासाठी थांबला आहे आणि मला त्या दिशेने लवकर जायचे आहे.’

४ आ. देवाने सांगितल्याप्रमाणे खडपाबांधला गेल्यावर दूरवर एका शेतात काही कमळे दिसणे : मी देवाला विचारले, ‘मी कुठल्या मार्गाने जाऊ ?’ तेव्हा ‘खडपाबांधला जा’, असा विचार माझ्या मनात आला. मी खडपाबांधला गेल्यावर मला दूरवर एका शेतात काही कमळे दिसली. तेव्हा मला वाटले, ‘कमळे आहेत, तर येथे सूर्यदेव असणारच.’ त्या शेतात गेल्यावर तेथे अंदाजे ५० वर्षांचे एक काका भाजीला पाणी घालत होते. मी त्यांना माझे नाव सांगितले आणि म्हटले, ‘‘बाबा, मला देवासाठी फुले हवी आहेत.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘बाळ, माझे नाव श्री. प्रकाश गावडे आहे.’’ त्या वेळी ‘ते काका नसून सूर्यदेवच आहे’, अशा भावाने मी त्यांच्याशी बोलले. या वेळी सेवेसाठी जातांना मी आश्रमातून प्रसाद घेऊन गेले होते. देवाने जणू मला प्रसाद नेण्याची पूर्वसूचना दिली होती. मी त्या काकांना प्रसाद दिला. त्या काकांनी दोन व्यक्तींच्या साहाय्याने मला कमळे तोडून दिली आणि ‘पुढे कधीही फुले हवी असतील, तर फुले न्यायला ये’, असे सांगितले. त्या वेळी ‘माझ्यापेक्षा प्रकाशकाकांनाच अधिक आनंद मिळाला’, असे मला जाणवले.

५. मुलांनी कमळे देणे

५ अ. कमळे आणण्यासाठी शेताच्या ठिकाणी गेल्यावर तेथे दूरवर २ लहान मुले हातात काहीतरी घेऊन बागडतांना दिसणे  आणि ‘संदीप-कृष्ण’ असा नामजप आतून चालू होणे : एके दिवशी आश्रमात पांढरी आणि गुलाबी कमळे हवी होती. मला कमळ आणण्याचा निरोप दुपारी मिळाला. दुपारच्या वेळी कमळे काढून द्यायला शेतात कुणीच नसते. ‘देवाकडून निरोप आला आहे, तर देव ती कमळे कुठूनही आणून देईल किंवा कुणीतरी ती कमळे अगोदरच काढून ठेवलेली असतील. आपण जाऊया’, असा विचार करून मी कमळे आणायला शेताच्या ठिकाणी गेले. त्या वेळी तेथे खरोखरच कुणी नव्हते. शेतात दूर अंतरावर दहा वर्षांची २ लहान मुले हातात काहीतरी (फुगे घेतल्याप्रमाणे) घेऊन बागडतांना दिसली. तेव्हा मला वाटले, ‘त्यांच्या हातात कमळेच आहेत.’ मी देवाला विचारले, ‘ही मुले कोण आहेत ?’ त्या वेळी माझा ‘संदीप-कृष्ण’ असा नामजप आतून चालू झाला.

मी त्या मुलांना हाक मारली. ती मुले माझ्याजवळ आली. तेव्हा त्यांच्या हातात कमळेच होती. मी त्यांना त्यांची नावे विचारली. त्यांतील एकाचे नाव संदीप आणि दुसर्‍याचे नीतेश होते. तेव्हा मला वाटले, ‘हे तर सांदीपनी ऋषि आणि कृष्णच आहेत.’ मी त्यांना विचारले, ‘‘एवढी फुले कुणासाठी काढली ?’’ ते म्हणाले, ‘‘आमची आई शेतात काम करत आहे. आम्ही दोघे तिच्या समवेत आलो आहोत. ‘आई काम करेपर्यंत कमळे काढूया’, असे आम्हाला वाटले.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘देवासाठी कमळे हवी आहेत. तुम्ही मला देऊ शकाल का ?’’ त्यांनी आनंदाने होकार देऊन त्यांच्या हातातील चांगली कमळे निवडून मला दिली. मी त्यांना आश्रमातून नेलेली चॉकलेट्स प्रसाद म्हणून दिली. त्या दिवशी मला विविध तातडीच्या सेवा होत्या. ‘त्या सेवा वेळेत पूर्ण व्हाव्यात; म्हणून देवाने आधीच कमळे काढून ठेवली आणि मला सेवांसाठी वेळ दिला’, असे मला जाणवले.

६. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना केसांत माळण्यासाठी सुगंधी फुलांचा गजरा देण्याची इच्छा एका साधिकेच्या साहाय्याने पूर्ण होणे

यज्ञाच्या वेळी मी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंना केसांत माळण्यासाठी गजरा द्यायचे; पण त्या गजर्‍यातील फुले सुगंधी नसायची. ‘त्यांना सुगंधी फुलांचा गजरा द्यायला हवा’, असे मला वाटायचे. एके दिवशी मला फोंडा येथील साधिका सौ. शकुंतला जोशी भेटल्या. माझ्या मनात गजर्‍याचा विचार नसतांनाही मी त्यांना सुगंधी फुलांचा गजरा मिळण्याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी फोंड्यातील एका फुलवालीकडून गोव्यात फुलणार्‍या पांढर्‍या कुंदाच्या फुलांचे गजरे आणले होते. त्या फुलवालीला विचारून मी तुला लगेच सांगते.’’ त्यांनी त्याच रात्री फुलवालीला विचारले असता त्या फुलवालीकडे गजरे उपलब्ध असल्याचे समजले. त्या दिवसापासून कुंदाचे सुगंधी गजरे सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना द्यायला मिळत आहेत. सद्गुरु बिंदाताईंनीही ‘गजरे सुंदर आहेत आणि आवडले’, असा निरोप दिला. माझ्या मनात आलेली इच्छा देवाने सहजच पूर्ण केली. ते गजरे सद्गुरुद्वयींच्या केसांत पहातांना मला वेगळाच आनंद जाणवतो.

७. फुले आणण्याची सेवा करतांना भेटलेल्या व्यक्ती सात्त्विक आणि देवाप्रती भाव असलेल्या असणे

फुले आणण्याची सेवा करतांना ‘जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती । चालविशी हाती धरोनिया ॥’, हे गीत मी सतत गुणगुणते आणि त्याप्रमाणे मला प्रचीती येते. मला भेटलेल्या व्यक्ती सात्त्विक आणि देवाप्रती भाव असलेल्या असतात. मला त्यांना पुष्कळ काही सांगावे लागत नाही. आम्ही पहिल्यांदा भेटत असलो, तरी त्या माझ्यासाठी अनोळखी नसतात आणि मी त्यांच्यासाठी अनोळखी नसते. ‘आमचे पूर्वीपासूनचे नाते आहे’, असे मला वाटते.

८. आश्रमातील एका साधिकेने स्वतःहून विचारून या अनुभूतींचे टंकलेखन करून देणे

फुलांची सेवा करतांना आलेल्या या अनुभूती मी सद्गुरु गाडगीळकाकूंना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘या अनुभूती आकाशतत्त्वाच्या संदर्भातील आहेत. समष्टीसाठी लगेच लिहून दे.’’ त्या वेळी मला वाटले, ‘डोळ्यांच्या त्रासामुळे मला संगणक हाताळायला कसे जमणार ?’; पण सद्गुरु काकूंनी सांगितले, तर होईलच.’ त्यानंतर १७.२.२०१९ या दिवशी ‘आज अनुभूती लिहून द्यायला हव्यात’, असा मी विचार करत असतांना आश्रमातील एका साधिकेने मला स्वतःहून ‘तुला काही साहाय्य हवे आहे का ?’, असे विचारले आणि तिने मला वरील अनुभूतींचे टंकलेखन करून दिले. या वेळीही ‘त्या साधिकेच्या माध्यमातून देवच माझ्या साहाय्याला आला’, याची मला पुन्हा एकदा अनुभूती आली आणि सद्गुरु काकूंच्या संकल्पामुळे मी वेळेत अनुभूती पाठवू शकले.’

– कु. संगीता प्रभाकर नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

(समाप्त)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now