रामनाथी आश्रमात १२.२.१०१९ या दिवशी गुरुपादुकांची प्रतिष्ठापना होण्यापूर्वी ‘स्वहृदयात गुरुपादुका आहेत’, असा भावप्रयत्न केल्याने प्रतिष्ठापनेचा सोहळा पहातांना भावावस्थेत आलेल्या अनुभूती

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे हृदयात मानसरित्या स्थापन केलेल्या गुरुदेवांच्या पादुका !

१ अ. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून ‘प.पू. गुरुदेवांच्या पादुकांची हृदयात मानस स्थापना करण्यास सांगणे : ‘४.२.२०१९ या दिवशी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर प्रभु श्रीराम आणि भरत यांची एक कथा पाठवली होती. प्रभु श्रीरामाकडे जाऊन भरत श्रीरामाच्या पादुका मागतो आणि सिंहासनावर त्यांची प्रतिष्ठापना करतो. यावरून सद्गुरु पिंगळेकाकांनी संदेश दिला, ‘प.पू. गुरुदेवांच्या पादुकांची हृदयात मानसरित्या स्थापन करा.’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या हृदयात परात्पर गुरुदेवांच्या पादुकांची स्थापना करण्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना केली आणि मानस स्थापना केली.

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे

१ आ. नंतरच्या ७ दिवसांच्या कालावधीत ‘स्वहृदयात गुरुपादुका आहेत’, असा भावप्रयत्न होऊन भावावस्था अनुभवणे : सद्गुरु काकांनी ‘पादुका मागणे’, म्हणजे गुरुदेवांच्या चरणांवर डोके टेकणे, म्हणजेच संपूर्ण शरणागती’, असा भावार्थ सांगितला. त्याप्रमाणे ‘अखंड शरणागत स्थितीत रहाता यावे’, यासाठी माझ्याकडून प.पू. गुरुदेवांना पुष्कळ कळवळून प्रार्थना झाली. पुढील ७ दिवसांच्या कालावधीत ‘माझ्या हृदयात गुरुपादुका आहेत. माझ्या प्रत्येक कृतीला त्या साक्षी असून त्यांच्या साक्षीनेच मला प्रत्येक कृती करायची आहे. माझा प्रत्येक विचार आणि कृती परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी व्हायला हवी’, याची जाणीव रहाण्याचे प्रमाण वाढले. या काळात ‘परात्पर गुरुदेव माझ्या अंतरात आहेत’, अशी जाणीवही वाढली.

परात्पर गुरुदेवांनी सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून त्यांच्या पादुकांची मानस स्थापना आधीच करवून घेतली. यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

२. रामनाथी आश्रमात १२.२.१०१९ या दिवशी परात्पर गुरुदेवांच्या पादुकांची प्रतिष्ठापनेचा सोहळा पहातांना आलेल्या अनुभूती

२ अ. सकाळपासून गुरुदेवांचे स्मरण होऊन सोहळा पहातांना ‘हृदयात गुरुचरण आहेत’, असे अनुभवणे : या दिवशी सकाळपासूनच गुरुदेवांचे स्मरण होऊन माझा भाव जागृत होत होता. सोहळा चालू झाल्यापासून शेवटपर्यंत माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी माझे मन एका वेगळ्याच स्थितीत होते. ‘माझ्या हृदयात गुरुचरण आहेत’, असे मी अखंडपणे अनुभवत होते.

२ आ. श्री. विनायक शानभाग यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पाठवलेली प्रभु श्रीराम आणि भरत यांची कथा सांगितली. त्या वेळी आठवडाभरापूर्वीचा प्रसंग आठवून माझी भावजागृती झाली.

२ इ. सद्गुरुद्वयी गुरुपादुकांची पूजा करत असतांना सुगंध येणे : कार्यक्रमात ज्या वेळी श्री. विनायक शानभाग यांनी ‘चंदनाचा सुगंध येत आहे’, असे सांगितले, त्याच वेळी मलाही काही क्षण चंदनाचा सुगंध आला. नंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ पादुकांचे पूजन करत असतांना मला काही क्षण फुलांचा मंद सुगंध आला.

२ ई. परात्पर गुरुदेवांनी अन्य पादुकांना हस्तस्पर्श केल्यावर त्यांनी ‘सर्व साधकांच्या हृदयात पादुकांची प्रतिष्ठापना केली’, असे वाटणे : परात्पर गुरुदेवांनी अन्य आश्रमांत स्थापन करावयाच्या पादुकांना स्पर्श केला. त्या वेळी ‘त्यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून सर्व साधकांच्या हृदयात या पादुकांची प्रतिष्ठापना केली’, असे मला वाटले.

२ उ. आरतीच्या वेळी परात्पर गुरुदेवांचे विशाल रूपात दर्शन होणे : शेवटी श्री गुरूंची आरती चालू असतांना मला परात्पर गुरुदेवांचे विशाल रूपात दर्शन होऊन ‘जगभरातील सर्व साधक त्यांच्या चरणांशी उभे राहून त्यांची आरती करत आहेत’, असे दिसले.

२ ऊ. सद्गुरुद्वयींच्या डोळ्यांतून सर्व साधकांकडे चैतन्यकिरण आणि वात्सल्यलहरी प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे : आरती झाल्यावर सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदातार्ई यांनी सर्व साधकांना आरती घेण्यास दिली. त्या वेळी ‘त्यांच्या डोळ्यांतून सर्व साधकांकडे चैतन्यकिरण प्रक्षेपित होत असून साधकांना पुष्कळ शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवले. त्याच वेळी ‘त्यांच्या डोळ्यांमधून वात्सल्याच्या लहरीही सर्व साधकांकडे प्रक्षेपित होत आहेत’, असे दिसले.

२ ए. डोळ्यांसमोर सतत गुरुचरण आणि त्याभोवती ‘गुरु’शब्द दिसून भावावस्था अनुभवणे : या सोहळ्याच्या संपूर्ण कालावधीत माझ्या डोळ्यांसमोर सतत गुरुचरण दिसून त्याभोवती ‘गुरुस्मरण’, ‘गुरुचरण’, ‘गुरुसेवा’, ‘गुरुकार्य’, ‘गुरुसेवक’, ‘गुरुभक्ती’, ‘गुरुआज्ञा’ आणि ‘गुरुवाक्य’ असे शब्द दिसत होते. त्या वेळी ‘माझ्या मनाला अखंड एवढाच ध्यास राहो’, अशी प्रार्थना गुरूंच्या चरणी होत होती. नंतरही पुष्कळ वेळ मला भावावस्था अनुभवता आली.

परात्पर गुरुदेवांच्या कोमल चरणी या सर्व अनुभूती अर्पण करत आहे.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, मंगळूरू सेवाकेंद्र, कर्नाटक. (१४.२.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now